पी. चिदम्बरम
भाजपला हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाखेरीज गत्यंतरच दिसत नसल्याने अत्यंत विखारी प्रचार सुरू आहे. विरोधी पक्षीयांबद्दल सत्ताधारी खालच्या पातळीची विधाने करीत आहेत. प्रत्येक बेजबाबदार वक्तव्याबरोबर भाजप लोकशाहीतील सुसंस्कृत आचरणाच्या शिडीवरून एकेक पायरी खाली घसरलेला असेल..
जून २०१५ मधील ती घटना मला अजून आठवते, अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या आधीचा तो काळ तेथील प्रचाराचा होता. त्या वेळी एका उमेदवाराने विखारी प्रचार आरंभला होता- ‘जेव्हा मेक्सिको त्यांचे लोक अमेरिकेत पाठवतो तेव्हा ते काही त्यांच्याकडचे कुशल किंवा बुद्धिमान लोक नसतात. ज्या लोकांबाबत काही समस्या आहेत असेच लोक मेक्सिकोतून अमेरिकेत पाठवले जातात. ते येताना अमली पदार्थ, गुन्हेगारी घेऊन येतात, ते बलात्कारी आहेत.’
त्या उमेदवाराच्या या वक्तव्याने अमेरिकेतील सुज्ञ व लोकशाहीप्रेमी मतदारांची भावना ही संतापाचीच होती, पण तरी नोव्हेंबर २०१६ मध्ये ६८,९८४८२५ मतदारांनी या उमेदवाराला कौल दिला.
नंतर जानेवारी २०१७ मध्ये अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून याच व्यक्तीने शपथही घेतली, जगातील श्रीमंत व शक्तिशाली देशाची सूत्रे त्यांच्या हाती आली. या उमेदवाराचे नाव अर्थातच डोनाल्ड ट्रम्प.
हे सारे येथे सांगण्याचे कारण एवढेच की, भारतात सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे असलेले अनेक उमेदवार आहेत. ते कदाचित या निवडणुकीत यशस्वीही होतील. या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये अनेक बेजबाबदार विधाने या नेत्यांनी व उमेदवारांनी केली. त्यातून द्वेष व अतिरेकाची नवी उंची गाठली गेली. आता निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येऊ लागला आहे, तसे या द्वेष व विखाराच्या राजकारणाला आणखी धार चढत जाईल.
या निवडणुकीत कुणी काय गरळ ओकले हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. याची सुरुवात तुलनेने सौम्य असलेल्या खासदार साक्षी महाराजांनी केली. त्यांचे शब्द होते- ‘यापुढे २०२४ मध्ये निवडणुका होणार नाहीत. मी संन्यासी आहे व मला पुढचे चांगले दिसते. देशातील ही शेवटची निवडणूक आहे.’ २०१९च्या लोकसभा निवडणुकीची ही असली ‘शुभ सुरुवात’ साक्षी महाराजांनी या बेताल वक्तव्याने केली.
अपशब्द व हीन उपहास
अपशब्दांचा यथेच्छ वापर हे प्रचारातील पहिले साधन होते. त्याचे काही निवडक नमुने खाली देत आहे.
१८ मार्चला केंद्रीय मंत्री महेश शर्मा म्हणाले की, ‘पप्पू म्हणतो की त्याला पंतप्रधान व्हायचे आहे, तशीच इच्छा मायावती, अखिलेश यादव यांनीही व्यक्त केली आहे व आता पप्पूची पप्पीही आली आहे.’ यात ‘पप्पी’ प्रियंका गांधी यांना उद्देशून म्हटले आहे.
२४ मार्चला भाजपचे बलियातील खासदार सुरेंद्र सिंह यांनी जीभ सैल सोडली- ‘राहुल यांची आई (सोनिया गांधी) इटलीत ‘त्या’ व्यवसायात होती, पण त्याच्या वडिलांनी तिला आपलेसे केले. आता राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबाची परंपरा पुढे चालवावी, सपनाला (सपना चौधरी) आपलेसे करावे.’
यापुढे आणखी टोक गाठले गेले; त्यात महेश शर्मा २० मार्चला मायावतींना लक्ष्य करताना म्हणाले की, ‘मायावती रोज नट्टापट्टा करतात, तरुण दिसण्यासाठी केस काळे करतात.’
धमक्या
धमक्या हेही प्रचारात वापरले जाणारे नेहमीचे हत्यार आहे.
इटावातील भाजप उमेदवार रामशंकर कठेरिया यांनी २३ मार्चला असे सांगितले की, ‘आम्ही राज्य व केंद्रात सत्तेत आहोत. आमच्याकडे जे कुणी बोट दाखवतील त्यांची बोटे छाटून टाकू.’
केंद्रीय मंत्री मेनका गांधीही यात मागे राहिल्या नाहीत. त्यांनी १२ एप्रिलला मुस्लीम समाजाच्या सभेत सांगितले की, ‘मी लोकसभा निवडणूक जिंकणारच आहे; पण जर तुमच्या पाठिंब्याशिवाय जिंकले तर मला ते बरे वाटणार नाही. तसे झाले व तुम्ही पाठिंबा दिला नाही तर नंतर गोष्टी बिघडत जातील. जेव्हा तुम्ही मुस्लीम लोक कामे घेऊन माझ्याकडे याल तेव्हा मी त्यावर, जाऊ द्या कशाला करा यांची कामे असाच विचार करेन, नाही तरी मी तुमच्या पाठिंब्याशिवाय निवडून आलेली असेन..’
भाजप नेते रणजित बहादूर श्रीवास्तव यांनी ९ एप्रिलला असे विधान केले की, ‘गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांचे नीतिधैर्य खच्ची केले आहे. जर मुस्लिमांचा वंशच उखडून टाकायचा असेल तर मोदींनाच मते द्या.’ हे असे विधान करताना त्यांना जराशीही लाज वाटली नाही.
इतरही धमकीवजा विधाने करण्यात आली. ती खालीलप्रमाणे :
महाराष्ट्रातील मंत्री पंकजा मुंडे २१ एप्रिलला असे म्हणाल्या, ‘विरोधकांना लक्ष्यभेदी हल्ले म्हणजे काय ते माहीत नाही, असे तेच सांगतात. जर असे असेल तर राहुल गांधी यांना बॉम्ब बांधून दुसऱ्या देशात पाठवले पाहिजे, मग विरोधकांना लक्ष्यभेद हल्ले म्हणजे काय ते समजेल.’
त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत बेजबाबदार विधान केले. ते म्हणाले की, ‘पाकिस्तान नेहमी अण्वस्त्रे असल्याच्या फुशारक्या मारतो, पण मग आमच्याकडे काय आहे असे त्यांना वाटते. आमची अण्वस्त्रे काही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत.’ मोदी यांच्या आधी कुठल्याही पंतप्रधानाने अण्वस्त्रांचा उल्लेख करून अशी बढाईखोर, विचारहीन वक्तव्ये केली नव्हती. जागतिक पातळीवरही उत्तर कोरियाचे नेते किम वगळता कुणाही नेत्याने १९४५ मधील जपानवरील संहारक अणुहल्ल्यानंतर अशी वक्तव्ये केलेली नाहीत.
द्वेषमूलक वक्तव्ये
१९ एप्रिलला भोपाळमधील भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असेच बेताल वक्तव्य केले. त्यात त्या म्हणाल्या, ‘मुंबईतील तुरुंगात माझा छळ करण्यात आला, त्या वेळी मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल असा शाप दिला होता आणि घडलेही तसेच. हेमंत करकरे हे दहशतवाद्यांशी लढताना मारले गेले.’ (करकरे हे पोलीस अधिकाऱ्यांमधील नायक होते व ते देशासाठी हुतात्मा झाले होते, याची आठवण लोकांना असली, तरी संबंधित उमेदवारास ती होती का?)
भाजपने मुस्लीम समाजाबाबत द्वेष निर्माण करणे हे शस्त्रच निवडले आहे, याचे कारण म्हणजे आताचा प्रचार हा विकासाच्या मुद्दय़ांवरून हिंदू-मुस्लीम द्वेषभावनेकडे वळला आहे. त्यातून भाजपने दोन्ही समुदायांत ध्रुवीकरण आरंभले आहे. हिंदू-मुस्लीम तेढ वाढवणारी जी विधाने करण्यात आली त्याबाबतचे काही नमुने खाली देत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ ९ एप्रिलला असे म्हणाले, ‘जर काँग्रेस, सप, बसप यांची ‘अली’वर श्रद्धा असेल तर आमची ‘बजरंग बली’वर श्रद्धा आहे.’
कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी १ एप्रिलला असे सांगितले की, ‘आम्ही कर्नाटकात मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही, कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही.’
११ एप्रिलला अमित शहा असे म्हणाले होते : ‘बौद्ध, हिंदू व शीख वगळता आम्ही प्रत्येक घुसखोराला काढल्याशिवाय राहणार नाही.’ या विधानात मुस्लीम घुसखोरांना भाजप लक्ष्य करणार आहे हे सूचित होते.
यंदाच्या निवडणूक-प्रचारात विरोधकांनी आक्षेपार्ह विधाने केलीच नाहीत, असे मी म्हणणार नाही; पण त्यांची विधाने ही भाजप नेत्यांनी केलेल्या द्वेषमूलक, धमकीवजा व अपशब्दांची लाखोली असलेल्या विधानांच्या जवळपासही जाणारी नाहीत.
अजून निवडणुकीत मतदानाच्या तीन फेऱ्या व १९ दिवस बाकी आहेत. यात प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचलेली असेल. उमेदवार व प्रचारक अनेक शब्दमौक्तिके उधळण्यात हयगय करणार नाहीत. प्रत्येक बेजबाबदार वक्तव्याबरोबर भाजप लोकशाहीतील सुसंस्कृत आचरणाच्या शिडीवरून एकेक पायरी खाली घसरलेला असेल. यात लोकशाहीच धोक्यात येत आहे असे मला वाटते.
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in
ट्विटर : @Pchidambaram_IN