पी. चिदम्बरम
बेरोजगारी, शेतक ऱ्यांची दुरवस्था, कर्जबाजारीपणा यावर ते बोलत नाहीत. शेतीमालाच्या पडत्या किमतींबाबत, पीक विमा योजनेच्या अपयशाबाबत ते बोलत नाहीत. महिला, दलित, अनुसूचित जाती-जमाती, शिक्षणतज्ज्ञ, विद्वान, पत्रकार, स्वयंसेवी संस्था यांच्या मनात जी भीती आहे त्यावर मोदी गप्प आहेत..
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना ‘अच्छे दिन..’चे आश्वासन दिले होते. तो भूलभुलैयाच होता; पण हे पाच वर्षांनंतर आता आपण ठामपणे म्हणू शकतो. हा लेख लिहीत असताना माझ्यासमोर ‘दि इंडियन एक्स्प्रेस’चा १ मे रोजीचा अंक आहे. त्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीबाबतच्या वेगवेगळ्या बातम्या मी वाचतो आहे. त्यात, ‘लोकसभेत विरोधी पक्षनेताच नसलेल्या पक्षाला सत्तेची स्वप्ने -मोदी’ अशा आशयाचा एक मथळा आहे. त्यात मोदी यांच्या लखनऊ व मुझफ्फरपूर येथील भाषणांची सविस्तर माहिती आहे.
उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्य. सर्वच राजकीय पक्षांसाठी कुरुक्षेत्र. भाजपसाठी उत्तर प्रदेशचे महत्त्व २०१९ मध्ये अनन्यसाधारण असेच आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. ८० पैकी ७१ जागा त्यांना २०१४ मध्ये मिळाल्या होत्या. आता हे यश टिकवण्याची अवघड जबाबदारी त्यांच्यावर आहे. याच ७१ जागांनी भाजपची सत्तासोपानाकडची वाटचाल सोपी झाली होती. त्यांना लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळण्यात या ७१ जागांचा मोठा वाटा होता. या वेळी भाजपने उत्तर प्रदेशातील निम्म्या जागा गमावल्या तरी त्यांना स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदी जास्तीत जास्त वेळ प्रचारासाठी देत आहेत. त्यात काही चुकीचे आहे असे मी तरी म्हणणार नाही; पण एक खटकणारी गोष्ट म्हणजे तेथील प्रत्येक भाषणागणिक ते अधिकाधिक अतिशयोक्त दावे करत चालले आहेत. हे सगळे करताना भोळसटपणाचा आवही आणत आहेत. शाळेत गेलेल्या किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या सरासरी मतदार मुलाच्या बुद्धिमत्तेलाही ते आव्हान देत सुटले आहेत.. सत्यापलाप करताना किती स्वातंत्र्य घ्यावे याची मर्यादा त्यांनी केव्हाच ओलांडली आहे. मोदींनी केलेले दावेच आता पाहू.
‘बॉम्बस्फोट झाले नाहीत’
दहशतवादविरोधातील कारवाईत अकार्यक्षमता दाखवल्याबाबत नेहमी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना मोदी यांनी सांगितले, की गेल्या पाच वर्षांत तुम्ही मंदिरे, बाजारपेठा, रेल्वे व बस स्थानके येथे बॉम्बस्फोट झाल्याचे ऐकले आहे का, बॉम्बस्फोट थांबले की नाही- यावर तेच उत्तर देतात, हे बॉम्बस्फोट मोदी यांच्या भीतीमुळेच थांबले आहेत.
याआधीही त्यांनी पाच वर्षांत बॉम्बस्फोट झाले नसल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. दुर्दैवाने गेल्या पाच वर्षांत अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. मोदींनी ज्या दिवशी हा चुकीचा दावा केला त्या दिवशीही बॉम्बस्फोट झाला होता. यादीच खाली देत आहे:
ऐतिहासिक धडे
मोदी यांचा आणखी आवडता विषय म्हणजे ‘लक्ष्यभेद हल्ले’. उरी येथील हल्ल्यानंतर ‘पाकिस्तानविरोधात आम्हीच पहिल्यांदा लक्ष्यभेद हल्ला केला’ असे ते छाती फुगवत सांगत सुटले आहेत. ते एवढय़ावर थांबलेले नाहीत, ‘यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने लक्ष्यभेद हल्ले केले नाहीत किंवा तसे हल्ले करण्याची परवानगी त्यांनी भारतीय लष्करास दिली नाही, पाकिस्तानी हद्दीत घुसून हल्ले करण्याचे धाडस दाखवले नाही’ असे त्यांचे म्हणणे आहे. मला वाटते मोदी इतिहास विसरून गेले आहेत. १९६५ व १९७१ मध्ये लष्कराने जे काही केले ते काय होते हे वेगळे सांगायला नको, पण मोदी यांनी ते कधी ऐकले किंवा वाचले नसावे. भारतीय लष्करी दलांनी पाकिस्तानात घुसल्याशिवाय १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र केला का, असा प्रश्न यात साहजिकच उपस्थित करावासा वाटतो. आता या वादात लष्कराच्या धुरीणांनीही मोदी यांचा दावा खोटा ठरवला आहे व भाजपच्या राजवटीतील हल्ले हे देशाच्या इतिहासातील पहिले हल्ले नव्हते व शेवटचेही असणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. भारताने अलीकडच्या काळातही सीमेपलीकडे अनेक वेळा मोहिमा राबवल्या आहेत, त्याची काही उदाहरणे :
२१-१-२००० नडाला एन्क्लेव्ह – नीलम नदी
१८-९-२००३ बरोह क्षेत्र- पूँछ
१९-६-२००८ भट्टल क्षेत्र – पूँछ
३०-८ २०११ शारदा क्षेत्र – नीलम नदीपल्याड
६-१-२०१३ सावन पात्रा छावणी
२७-७-२०१३ नझापीर क्षेत्र
६-८-२०१३ नीलम खोरे
नरेंद्र मोदी हे केवळ राजकीय पक्षाचे नेते व प्रचारक नाहीत, पण हे भान त्यांनी केव्हाच सोडले आहे. आपण देशाचे पंतप्रधान आहोत हे विसरून ते वारंवार खोटे का बोलत आहेत याचे लोकांना आश्चर्य वाटत आहे. हा स्मरण कमी होत असल्याचा प्रकार असू शकत नाही, कारण मोदी वारंवार तेच बोलत आहेत. आमच्या काळात बॉम्बस्फोट झाले नाहीत, उलट आम्ही पहिल्यांदा लक्ष्यभेद केले, हे त्यांचे सर्व दावे त्या-त्या वेळी संबंधितांनी खोडूनही काढले आहेत तरी ते हे दावे सोडायला तयार नाहीत. सारखे खोटे ऐकून मतदार संतापले आहेत, मोदींच्या या सगळ्या वागण्याची मुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत.
वास्तव प्रश्नांवर मौन
मी चहावाला होतो, त्या परिस्थितीतून नंतर पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलो, किंबहुना ती सगळी सहानुभूती मिळवणारी कहाणी मी कधी ऐकवलेली नाही. तसेच, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी असल्याचे कधी म्हटलेले नाही असे आता मोदी सांगत सुटले आहेत. हे सगळे पाहून मला धक्काच बसला, आता यात थोडेसे संशोधन केले तरी ते पूर्वी काय म्हणाले होते हे शोधता येते. हे थोडेसे संशोधन करताना मोदी यांनी विविध तारखांना केलेली विधाने मी तपासली. त्यातील सर्वात जुने विधान त्यांनी २८ सप्टेंबर २०१४ मध्ये केले होते. त्यानंतर त्याचे त्यांनी पालुपदच लावले होते. मी मागासवर्गीयातून पुढे आलो हे त्यांनी सांगितल्याची दोन उदाहरणे आहेत. २५ मार्च २०१८ व १८ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी मागासवर्गीय असल्याची अलीकडची विधाने केली. त्यांची नेमकी विधाने येथे उद्धृत करावीशीही वाटत नाहीत, कारण ते पंतप्रधान आहेत. या पदाला एक प्रतिष्ठा आहे. तीच या विधानांनी घालवली असे मला वाटते. अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक भाषणाची अशी चिरफाड करून त्यातील विरोधाभास लगेच लोक वेशीवर टांगतात, मोदी सुदैवी आहेत; त्यांच्याबाबतीत असे कुणी फारसे करीत नाही.
आता हे विषय सोडले तर पंतप्रधानांनी बोलावे तरी काय अशातला भाग नाही. त्यांना बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत. लोक काही मुद्दय़ांवर त्यांची मते, त्यांची बाजू ऐकून घेण्यास उत्सुक आहेत, पण नेमके ते विषयच मोदींनी बासनात गुंडाळून ठेवून दिले आहेत कारण ते अडचणीचे आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांची दुरवस्था, कर्जबाजारीपणा यावर ते बोलत नाहीत. शेतीमालाच्या पडत्या किमतींबाबत, पीक विमा योजनेच्या अपयशाबाबत ते बोलत नाहीत. महिला, दलित, अनुसूचित जाती-जमाती, शिक्षणतज्ज्ञ, विद्वान, पत्रकार, स्वयंसेवी संस्था यांच्या मनात जी भीती आहे त्यावर मोदी गप्प आहेत. कारण ते कटू वास्तव आहे, ते पचवणे सोपे नाही हे त्यांनाही कळून चुकले आहे. २०१४ मध्ये विकासाच्या मुद्दय़ांवर निवडणूक लढवली गेली. आज तो विकास दूर आहे व त्याची जागा राष्ट्रवादाने घेतली आहे. मोदी यांनी गेल्या निवडणुकीत लोकांना ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवून भुलवले, आता त्यावर ते ढोंगीपणा करीत आहेत. ‘अच्छे दिन’ ज्याला म्हणतात ते केव्हाच आले आहेत, असे त्यांनी हळूच जाहीर करून टाकले आहे. पण सत्यापुढे सगळे दावे फिके पडतात. ‘अच्छे दिन’ अजून कैक कोस दूर आहेत हे लोकांनाही माहिती आहे. तेच ते खोटे ऐकून लोक संतप्त आहेत. सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत सत्याचे डोस पाजण्याची तयारी लोकांनी केली आहे, त्याचा परिणाम लवकरच दिसेल.
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in
ट्विटर : @Pchidambaram_IN