पी. चिदम्बरम
परधर्मीयाचा उत्सव उधळण्याचे प्रकार, द्वेषयुक्त भाषणे, दुर्भावनापूर्ण अॅप्स यापैकी एकाही गोष्टीवर पंतप्रधान मोदी हे निषेधाचा एक शब्दही काढत नाहीत, कारण ‘हिंदूत्ववाद्यांचा एकमेव नेता’ हे स्थान त्यांना डळमळीत होऊ द्यायचे नाही. त्यांचे समर्थक तर आता परधर्मीयांचा विरोध विकासालाच असल्याचाही अपप्रचार करू लागले आहेत..
आधी ते कम्युनिस्टांसाठी आले,
तेव्हा मी बोललो नाही,
कारण मी कम्युनिस्ट नव्हतो.
मग ते समाजवाद्यांसाठी आले,
तेव्हाही मी बोललो नाही,
कारण मी समाजवादी नव्हतो.
मग ते कामगारांसाठी आले,
पण मी बोललो नाही,
कारण मी कामगार नव्हतो.
मग ते यहुद्यांसाठी आले,
पण मी बोललो नाही, कारण मी ज्यू नव्हतो.
मग ते माझ्यासाठी आले,
.. पण तोपर्यंत
माझ्यासाठी बोलायला कोणीच उरले नव्हते.
– मार्टिन निमोलर,
जर्मन धर्मशास्त्रज्ञ (१८९२-१९८४)
शनिवार, २५ डिसेंबर रोजी सगळीकडे ख्रिसमस साजरा होत होता. मध्यरात्री त्याची उत्सवी धामधूम संपण्याआधीच काही ठिकाणी, येशू ख्रिस्ताने एकेकाळी ज्याविरुद्ध उपदेश केला होता, त्या सर्व वाईट गोष्टींनी डोके वर काढले. वर्षांचा शेवट या कटू गोष्टींनी झाला असे म्हणायचे असेल तर नव्या वर्षांची सुरुवातही अशुभ गोष्टीनेच झाली असे म्हणता येईल. घटनाच अशा घडत आहेत की गेले दोन आठवडे ख्रिश्चन आणि उदारमतवादी या दोघांसाठीही आव्हानात्मक होते.
२०२१ या वर्षांने फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू पाहिला. तमिळनाडू या ख्रिश्चन धर्मप्रचारकाने आपले संपूर्ण आयुष्य ओडिशातील आदिवासी लोकांसाठी वाहून घेतले होते. फादर स्टॅन यांच्यावर दहशतवादी कारवाया केल्याचा (माझ्या मते खोटा) आरोप होता. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले. तिथे त्यांना अमानुष वागणूक दिली गेली, ते आजारी असतानाही त्यांना जामीन नाकारला गेला. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या वर्षअखेरीची दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ला (मदर तेरेसा यांनी स्थापन केलेली धर्मादाय संस्था) कथित किरकोळ लेखा उल्लंघन केले असे कारण दाखवून परदेशी निधी मिळवण्याचा अधिकार नाकारला गेला. या निधीमधून या संस्थेच्या समाजोपयोगी कामाला हातभार लागत असे.
ख्रिसमसला बट्टा
‘देवा, ते काय करतात, ते त्यांना माहीत नाही, त्यामुळे त्यांना माफ कर,’ असे म्हणणाऱ्या येशूचे अनुयायी असलेल्या ख्रिश्चन समुदायाची आपल्याविरुद्ध खोडसाळपणा करणाऱ्यांनाही क्षमा करण्याची मानसिक तयारी झालेली असते. असे असले तरीही ख्रिसमसच्या दिवशी जे घडले ते अक्षम्य होते. अलीकडे घडलेल्या घटना बघा :
‘चर्च ऑफ द होली रिडीमर’ हे हरियाणामधील अम्बाला येथे असलेले चर्च १८४० मध्ये बांधलेले आहे. २५ डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास चर्च बंद झाल्यानंतर दोघा इसमांनी आत घुसून येशू ख्रिस्ताचा पुतळा पाडला आणि सांताक्लॉजच्या प्रतिमा जाळल्या. दोन दिवसांपूर्वी हरियाणातील गुरुग्राममधील पटौडी येथील एका चर्चमध्ये एका गटाने प्रवेश केला आणि ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत प्रार्थना उधळून लावली.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मिशनरी महाविद्यालयांसमोर सांताक्लॉजचे अनेक पुतळे जाळण्यात आले. बजरंग दलाच्या सरचिटणीसांनी या तोडफोडीचे समर्थनच केले. ते म्हणाले, ‘‘ते सांताक्लॉजने दिल्या आहेत असे सांगून आमच्या लहान मुलांना भेटवस्तू देतात आणि त्यांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करून घेतात.’’ गेली अनेक दशके मिशनऱ्यांच्या महाविद्यालयांनी ‘आमच्या हजारो मुलांना’ नि:स्वार्थपणे शिक्षण दिले हे सांगायला मात्र ते विसरले.
ख्रिसमसच्या रात्री आसाममधील कचर जिल्ह्यातील सिल्चर गावात ‘प्रेस्बिटेरियन चर्च’मध्ये भगव्या पोशाखात असलेल्या दोन व्यक्ती शिरल्या आणि त्यांनी तिथे असलेल्या सर्व हिंदूंना तिथून निघून जाण्यास फर्मावले. त्या रात्री ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रार्थना सुरू होत्या. तिथे जाऊन काही जणांनी ‘मिशनरी मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या.
आता मुख्य प्रवाहात
२०२१ या सालापर्यंत अनेक राज्यांनी, विशेषत: कर्नाटकने, धर्मातरविरोधी विधेयक मंजूर केले तर काहींनी त्याचा मसुदा तयार केला. त्यातही त्यांचा रोख ख्रिश्चन समुदायावर होता. वास्तविक इतर धर्माच्या लोकांचे, विशेषत: हिंदूंचे ख्रिश्चन धर्मात धर्मातर होत असल्याचे फार कमी पुरावे आहेत. पण तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित इतर संघटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या उजव्या विचारसरणीच्या कट्टर प्रतिनिधींचा ख्रिश्चन समुदाय लक्ष्य आहे, हे तर उघडच आहे. हे लोक आता कुंपणावर बसलेले लोक राहिलेले नाहीत तर ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला आहे.
विविध ‘द्वेषपूर्ण भाषणां’चे लक्ष्य आजवर मुस्लीम असत, आता ख्रिश्चनही त्यांचे लक्ष्य आहेत. हिंदूू नसलेल्यांविरुद्ध, बिगरहिंदूंविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी ही द्वेषयुक्त भाषणे केली जातात. सहा महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये ‘सुली डील्स’ तर काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘बुली बाई’ नावाचे अॅप आले. या अॅप्सवर मुस्लीम महिलांचे चेहरे नावानिशी डकवले आहेत आणि या महिलांना लिलाव करायचा आहे असे म्हटले आहे. ‘बुली बाई’ चा प्रचार करणाऱ्या ट्विटर हँडलवर ‘खालसा सुप्रिमासिस्ट’, ‘जितदर सिंग भुल्लर’ आणि ‘हरपाल’ यांसारखी शीख वाटतील अशी नावे वापरली आहेत. याचाच अर्थ द्वेषाचा बाजार मांडणाऱ्या व्यापाऱ्यांचे पुढचे लक्ष्य कदाचित शीख समुदाय असू शकतो.
या देशामधले हिंदू जितके भारतीय आहेत, तितकेच या देशामधले मुस्लीम, ख्रिश्चन आणि शीखदेखील भारतीय आहेत. त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. तुम्ही राज्यघटनेचे २५ वे कलम वाचले असेल तर तुम्हाला समजेल की या कलमाने त्यांना त्यांच्या धर्माचा प्रचार करण्याचाही अधिकार दिलेला आहे. कट्टर उजव्या विचारसरणी त्यांच्या धर्माचे पालन करण्याच्या घटनादत्त मूलभूत अधिकारालाच आव्हान देत आहेत. ही घटनेतील तत्त्वांची पायमल्ली आहे.
मोदींचा अजेंडा
हिंदूत्ववादी विचारसरणीच्या समूहाच्या प्रतिनिधींच्या आत काय चालले आहे, त्याची झलक हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेत बघायला मिळाली. तिथे झालेल्या भाषणामधला एक उतारा बघा..
एक भाषण म्हणते, ‘‘तुम्हाला त्यांना संपवायचे असेल तर त्यांना मारून टाका.. हे युद्ध जिंकण्यासाठी आम्हाला असे १०० सैनिक हवे आहेत जे त्यांच्यापैकी २० लाखांना (म्हणजे मुस्लीम) मारतील’’
तर दुसरे एक भाषण म्हणते ‘‘मारायला तयार व्हा किंवा मारले जा, दुसरा पर्याय नाही.. म्यानमारमध्ये झाली तशी ‘स्वच्छता’ आपल्याला इथेही करायची आहे. त्यात प्रत्येक हिंदूने, अगदी पोलीस, लष्कर, राजकारण या क्षेत्रांमध्ये असलेल्या हिंदूंनीदेखील सहभागी व्हावे.
हे फक्त द्वेषयुक्त भाषण नाही तर त्यापेक्षाही भयंकर आहे. खरे तर हे नरसंहाराला आवाहन आहे.
ही वेडय़ा, मनोविकृत माणसांनी केलेली आगपाखड नाही. वरवर पाहाता वेडगळ वाटणारी ही वक्तव्ये पद्धतशीरपणे अधिकाधिक हिंसक होताहेत. मोदींनी भाजपच्या अजेंडाची पुन्हा का आणि कशी पुनर्व्याख्या केली याविषयी हिलाल अहमद यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’, या वृत्तपत्रात ६ जानेवारी २०२१ रोजी लिहिलेल्या लेखात मांडणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोविड आपत्ती, शेतकऱ्यांची चळवळ आणि वाढत्या आर्थिक संकटांमुळे ‘हिंदूत्ववाद्यांचा एकमेव नेता’ हे आपले स्थान अधिक बळकट करण्याची मोदींवर वेळ आली आहे. यापुढच्या काळात हिंदूत्व आणि विकास दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळय़ा काढल्या जाणार नाहीत. आणि त्यासाठीच उजव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांनी हिंदू धर्माखेरीज अन्य धर्म हे फक्त हिंदूत्वाचेच नाही तर विकासाचेदेखील विरोधक आहेत असे चित्र रंगवायला सुरुवात केली आहे.
त्यामुळेच ख्रिसमसच्या उत्सवात व्यत्यय आणणे, द्वेषयुक्त भाषणे करणे आणि दुर्भावनापूर्ण अॅप्स आणणे अशा गोष्टी घडूनसुद्धा पंतप्रधानांकडून निषेधाचा एक शब्दही काढला गेला नाही. हे सगळे चित्र बघितले तर आता असेच म्हणावे लागते की भविष्यासाठी तयार राहायची वेळ आली आहे. हा सगळा कट्टरवाद यापुढच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढत जाणार आहे. त्याविरोधात आपण आज बोललो नाही, तर उद्या आपल्यासाठी बोलायला कोणीही नसेल.
‘आता ख्रिश्चनांकडे मोर्चा वळला आहे’असे सांगणारे हे अम्बाला येथील सत् सिंग यांनी टिपलेले छायाचित्र एका वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरून
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in
ट्विटर : @Pchidambaram_IN