|| पी. चिदम्बरम
मोदी यांचे कुठलेही भाषण ऐका, त्यात खोटी विधाने केली जातात. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला थेट मुद्दय़ांनिशी उत्तर देण्याची धमक त्यांच्यात नाही. मोदी त्यांच्या भाषणात भाजपच्या जाहीरनाम्यातील एकही मुद्दा मांडण्याची हिंमत दाखवत नाहीत, त्याऐवजी ते काल्पनिक कथांची भुते तयार करून त्यांना बडवत बसले आहेत..
आपल्या देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये नेहमीच दोन राष्ट्रीय पक्ष समोरासमोर असले तरी प्रत्येक निवडणूक अद्वितीय असते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त अन्य राजकीय पक्ष त्यांच्या बाजू प्रत्येक निवडणुकीत बदलत असतात.
या निवडणुका नेहमीच वेगळ्या असण्याचे आणखी एक कारण म्हणजे प्रमुख प्रतिस्पध्र्यामध्ये मूलभूत स्थित्यंतर आलेले असते. भले ते चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी हा भाग निराळा. प्रत्येक वेळी पक्षाचा निवडणूक रिंगणातील प्रवेशावेळचा अवतार आधीच्या निवडणुकीपेक्षा वेगळा असतो. २०१९ मध्ये तेच घडते आहे. २०१४ मध्ये सत्तेवर असलेला काँग्रेस हा आता प्रमुख आव्हानकर्ता पक्ष आहे, तर २०१४ मध्ये आव्हानकर्ता असलेला भाजप आता सत्तेत आहे. २०१४ मधील भाजप हा रचनात्मक राजकीय पक्ष होता. आता २०१९ मधील भाजप हा एकाच व्यक्तीच्या नियंत्रणाखाली दबलेला असून ‘वन मॅन शो’ आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या आतापर्यंतच्या सर्व पक्षांतर्गत यंत्रणा गुंडाळून खुंटीवर ठेवल्या आहेत व ते स्वत:च पक्ष बनले आहेत. ‘मोदी म्हणजे भाजप’ असा आता या पक्षाचा संकुचित अर्थ आहे. भाजप हा व्यक्तिकेंद्री व संकुचित पक्ष बनला असल्याने आताच्या निवडणुकीतील लढाईच्या सीमारेषा या वेगळ्या आहेत. २०१४ मध्ये ‘भाजप विरुद्ध काँग्रेस’ अशी लढत होती; २०१९ मध्ये ती ‘मोदी विरुद्ध काँग्रेस’ अशी बनली. हेही चित्र पुढे बदलले. कसे ते पाहू.
सत्ता व पैसा
पैसा, सत्ता, राजकीय एकाधिकारशाही या आयुधांचे मिश्रण मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आता पैशाचेच सांगायचे तर मोदी यांच्या एका सभेसाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च होतो. अशा तीन ते चार सभा ते दिवसातून घेतात. हा खर्च निवडणूक खर्चात गणला जात नाही.. किंबहुना हा खर्च मंचावरील प्रत्येक उमेदवाराच्या खर्चात गणला जायला हवा, तसे होताना दिसत नाही. राजसत्ता हे शक्तिशाली साधन आहे. मोदी यांनी संबंधित मंत्र्यांना न विचारता कारभार केला, सत्तेवर त्यांचेच एकटय़ाचे नियंत्रण होते. गुप्तचर, गृहमंत्रालय, महसूल विभाग, चौकशी संस्था हे सगळेच मोदींच्या ताब्यात होते. त्यांच्या मर्जीप्रमाणे या संस्थांचे काम चालत होते. राजकीय एकाधिकारशाही हा त्यांचा स्थायीभाव आहे. युत्या करणे, उमेदवार निवडणे, निवडणूक डावपेच ठरवणे, नेमके काय संदेश समाजात गेले पाहिजेत याची आखणी या सगळ्या बाबीत मोदींचाच वरचष्मा राहिला आहे, ‘मोदी म्हणजे भाजप – बाकी सगळे शून्य’ असा अर्थ यातून ध्वनित होत गेला.
पैसा व सत्ता यात काँग्रेस आता भाजपच्या पासंगालाही पुरणार नाही हे तर ठळकपणे सामोरे आलेले चित्र आहे. असे असले तरी काँग्रेसने नव्या कल्पना मांडून मतदारांना साद घातली आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या सुमारास काँग्रेसला हे जाणवले होते की लोकांना आता गोंगाट, कर्णकर्कशता नको आहे; त्यांना सुरक्षा, रोजगार हवे आहेत, शेतकऱ्यांची दुरवस्था संपली पाहिजे, गरिबांचे कल्याण झाले पाहिजे. या लोकांच्या अपेक्षा आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात या सगळ्या अपेक्षांची दखल घेतली आहे. काँग्रेसने जनतेचा आवाज ऐकला, म्हणूनच काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा झाली. भाजपचा जाहीरनामा केव्हा विस्मरणात गेला हे समजलेही नाही. लोकांचा जो आवाज होता तीच काँग्रेसच्या जाहीरनाम्याची खरी प्रेरणा होती. भारतीय राजकारणात ज्या विषयांवर चर्चा होणे आवश्यक होते ते विषय काँग्रेसने हाताळले, त्यावर ठोस उपाय मांडले. २ एप्रिल रोजी काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा सादर केल्यानंतर आताच्या निवडणुकीतील लढाई ही मोदी विरुद्ध काँग्रेस अशी राहिली नाही तर ती मोदी विरुद्ध काँग्रेसचा जाहीरनामा असे वेगळेच स्वरूप घेऊन सामोरी आली. मोदी यांचे कुठलेही भाषण तुम्ही ऐका, त्यात खोटी विधाने केली जात असून गांधी घराण्याला अपशब्द वापरले जात आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला थेट मुद्दय़ांनिशी उत्तर देण्याची धमक त्यांच्यात नाही. त्यामुळे ते काल्पनिक कथांची भुते तयार करून त्यांना बडवत बसले आहेत. त्यांना गारद केल्याचा आव आणून जिंकल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्ष काँग्रेस जाहीरनाम्यातील एकाही मुद्दय़ाला समाधानकारक उत्तर त्यांना आजपर्यंत देता आलेले नाही हे कटू वास्तव आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर भाजपचा जाहीरनामा मांडण्यात आला; पण मोदी त्यांच्या भाषणात भाजपच्या जाहीरनाम्यातील एकही मुद्दा मांडण्याची हिंमत दाखवत नाहीत, कारण तो आता लोकांच्या विस्मरणात गेला आहे. नवकल्पनांची जी लढाई असते ती काँग्रेसने जाहीरनाम्याच्या माध्यमातून जिंकली आहे त्यात लोकांच्या समस्यांवर व्यवहार्य उत्तरे मांडली आहेत, जे उपाय करता येतील तेच सांगितले आहेत. जे शक्य नाही ते सांगितलेले नाही. आपल्याकडे आता लोकांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्यासारखे नवे मुद्दे राहिलेले नाहीत, नवी उत्तरे उरलेली नाहीत हे मोदी यांना कळून चुकले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला समर्पक उत्तर देण्यात मोदी अपयशी ठरले आहेत हे खरे वास्तव आहे.
लोकांच्या अपेक्षांना साद
तमिळनाडूतील दोन आठवडय़ांच्या झंझावाती प्रचार दौऱ्यानंतर मी परत आलो आहे. त्यातून मला जे दिसून आले ते सांगायचे तर आमच्या जाहीरनाम्यातील ज्या गोष्टी लोकांना भावल्या आहेत, त्यातील सहा महत्त्वाच्या गोष्टी अशा-
१) देशातील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना महिना सहा हजाराप्रमाणे वार्षिक ७२ हजार रुपये मदत.
२) कृषी कर्जमाफी, यात द्रमुकनेही कमी मूल्याच्या दागिने कर्जाची माफी जाहीर केली आहे.
३) मनरेगामध्ये वर्षांला दीडशे दिवस रोजगार दिले जातील.
४) सत्तेवर आल्यानंतर ९ महिन्यांत २४ लाख सरकारी नोकऱ्या, याचाच अर्थ सरकारी पदे भरणार.
५) महिला, दलित, अनुसूचित जातीजमाती, वनवासी, पत्रकार, लेखक, शिक्षणतज्ज्ञ, स्वायत्त संस्था यांना सुरक्षितता. सत्तेच्या दुरुपयोगातून अनेक लोक व संस्था भरडून निघाल्या आहेत, त्यांना त्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकता येईल. विरोधी पक्षनेते व उमेदवारांवर निवडणुकीच्या वेळी टाकण्यात आलेले प्राप्तिकर छापे हा या भीतीच्या राजकारणाचा पुरावा आहे.
६) तमिळ भाषा, वंश, संस्कृती, आदर्श, इतिहास यांचा आदर करण्यात येईल.
आता ही जी आश्वासने दिली आहेत ती जनकल्याणाशी निगडित आहेत. अर्थव्यवस्था व संरक्षण हे दोन मुद्दे ही निर्वाचित सरकारांची जबाबदारी आहे; पण या गुंतागुंतीच्या मुद्दय़ावर निवडणूक प्रचारात निर्थक वादविवाद होऊ नयेत असे लोकांना वाटते. कुठलेही निर्वाचित सरकार जर अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करीत असेल, नोटाबंदीसारखे निर्णय लागू करून लोकांनाच वेठीस धरत असेल तर त्यांना जनता शिक्षा देत असते. मोदी यांनाही जनता त्यासाठी शिक्षा करील यात शंका नाही.
नवकल्पनांची लढाई
माझ्या मते काँग्रेस जाहीरनाम्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी, लोकांकडून आलेला प्रत्येक मुद्दा व कल्पना अशा नेटकेपणाने व अभ्यासू सहकाऱ्यांशी सल्लामसलतीनंतर मांडला आहे, त्यामुळे द्रमुकप्रणीत आघाडीचा तमिळनाडूत प्रचंड विजय होईल असा विश्वास वाटतो. काँग्रेसची व द्रमुकची आश्वासने यांचे एक वेगळे रसायन तयार झाले आहे. द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टालिन यांनीही त्यात लोककल्याणाच्या भूमिकेतून आश्वासने दिली आहेत; पण सध्या तरी निवडणुकीतील मतदानाच्या केवळ दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. महत्त्वाची तिसरी फेरी (११५ जागा) व चौथी फेरी (७१ जागा) अजून व्हायच्या आहेत, त्यात लोकांच्या समस्यांवरील व्यवहार्य तोडग्यांचे व आश्वासनांचे युद्ध हिंदी पट्टय़ात पोहोचेल.
संपत्ती व कल्याण हा आमचा लोकांना मोलाचा व शक्तिशाली संदेश आहे. मोदी जर भारतातील लहानशा गावातील रस्त्यांवरून कधी फिरले असते तर त्यांना मी सांगतो त्याचा अर्थ समजला असता; पण ते विमानाने फिरतात म्हणजे सतत हवेत असतात. जर विरोधकांनी हा सामथ्र्यशाली संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला तर ते नक्कीच त्यांच्या-त्यांच्या लढाईत विजयश्री खेचून आणतील. सध्या तरी निकालांची वाट पाहणे एवढेच हातात आहे.
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in
ट्विटर : @Pchidambaram_IN