भारतीय समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह झाले म्हणून कोणाला संताप येतो? कम्युनिस्ट पक्षाचे नेते अनेक आणि कार्यकर्तेही हजारो असताना एखाद्या डाव्या विचाराच्या व्यक्तीला संपवावे, असे कोणाला वाटू शकते? आदिवासींच्या व्यथावेदना मांडणाऱ्या तरुण, धडाडीच्या पत्रकाराची अडचण कोणाला होत असावी? हत्या झालेले कोण होते, हे लक्षात घेतले तर हत्या करणाऱ्यांची मानसिकता उघड होऊ लागते.. हे उजव्या गटांचेच, असे वेगळे सांगावे लागत नाही..
जोन ऑफ आर्कला जिवंत जाळण्यात आले होते. सॉक्रेटिसला विषाचा प्याला देण्यात आला होता. सर थॉमस मूर यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. वैचारिक निष्ठांपायी या तिघांचा जीव घेण्यात आला. अलीकडल्या काळात, पाच जणांच्या हत्या भारतीय लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला हादरा देणाऱ्या ठरल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी या प्रत्येक हत्या-प्रकरणातील मारेकरी आणि सूत्रधार कोण असावेत यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यांमधील पोलीस दलेसुद्धा हत्या करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. काही जणांना अटकही झालेली आहे; पण म्हणून या प्रकरणांचा छडा लागला किंवा लवकरच लागेल, अशी शक्यता मात्र नाही हीच वस्तुस्थिती दिसते. पोलीस आणि प्रसारमाध्यमे ही मारणाऱ्यांवरच लक्ष केंद्रित करीत असताना, मला थोडा निराळा विचार इथे मांडायचा आहे.
मला असे वाटते की, हत्या कोणाची झाली, असा प्रश्न लोकांनी पुन्हा उपस्थित करणे महत्त्वाचे आहे. हत्या झालेल्यांची नावे आपणांस माहीत आहेत, तसेच त्या पाचही व्यक्तींचे जीवितकार्यही माहीत आहे; परंतु या पाच जणांच्या हत्या झाल्या म्हणजे काय झाले, याचा अर्थ उलगडण्यासाठी हत्या झालेल्यांबद्दलची आपल्याकडील माहिती तिच्या संदर्भचौकटीसह आपण पुन्हा पाहायला हवी.
डॉ. नरेंद्र दाभोलकर (१९४५-२०१३)
नरेंद्र दाभोलकर हे वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर होते. त्यांच्याबद्दल फार कुणाला माहीत नसलेली गोष्ट म्हणजे ते भारतीय कबड्डी संघात होते आणि बांगलादेशशी कबड्डी सामनाही खेळले होते. त्यांच्या टीकाकारांची डोकेदुखी ठरलेली बाब म्हणजे ते महाराष्ट्रातील महत्त्वाचे विवेकवादी होते, अंधश्रद्धा-निर्मूलन चळवळीतील सर्वात आघाडीचे कार्यकर्ते होते. दाभोलकरांनी लिहिलेली बाराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी १६ वर्षे काम पाहिले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना त्यांनी केली आणि दहा हजारांहून अधिक शिक्षकांना, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा बाणवावा आणि अंधश्रद्धा कशा टाळाव्यात याचे मार्गदर्शन देऊन तयार केले. अनेक वर्षांपूर्वीपासून त्यांनी अंधश्रद्धाविरोधी व जादूटोणा-प्रतिबंधक विधेयकाचा मसुदा तयार केला होता. शोचनीय बाब अशी की, दाभोलकरांची हत्या २० ऑगस्ट २०१३ च्या सकाळी झाल्यानंतर चार दिवसांत सरकारने या विधेयकाला मंजुरी दिली.
गोविंद पानसरे (१९३३-२०१५)
गोविंद पानसरे हे आजन्म कम्युनिस्ट होते. गरीब घरात वाढलेल्या गोविंद पानसरे यांनी तरुणपणी वृत्तपत्रे विकून, पालिकेत शिपायाची नोकरी करून निर्वाह चालविला; पण शिक्षण सुरू ठेवून ते वकील झाले आणि कामगार-न्यायालयात त्यांनी श्रमिकांसाठी वकिली सुरू केली. ते लेखक म्हणूनही सुपरिचित होते आणि त्यांचे ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक मराठीतून अनेक भाषांत अनुवादित झाले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते राज्य सरचिटणीस होते. ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्था’ ही सहकारी बँक त्यांच्या प्रयत्नांतून स्थापन झाली. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना घर मिळेपर्यंत आश्रयस्थान त्यांनी चालविले होते, यामुळे त्यांच्यावर कडवट टीकाही झाली होती.
एम एम कलबुर्गी (१९३८-२०१५)
एम एम कलबुर्गी हे प्राध्यापक म्हणून सुविख्यात होते. हम्पीच्या कन्नड विद्यापीठाचे ते कुलगुरू होते तसेच ते उत्तम लेखक असल्याने २००६ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि मूर्तिपूजा यांविषयीची टीका मांडल्यामुळे त्यांच्यावर उजव्या विचारांच्या गटांचा रोष होता. प्रा. कलबुर्गी आणि यू आर अनंतमूर्ती यांच्याविरुद्ध २०१५ मध्येच जो ‘धार्मिक भावना दुखावल्या’चा खटला भरण्यात आला, तो १८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाबद्दल होता!
गौरी लंकेश (१९६२-२०१७)
गौरी लंकेश या स्वत:हून डाव्या विचारांकडे झुकलेल्या आणि डाव्या गटांच्या बाजूने लिहिणाऱ्या कार्यकर्त्यां होत्या. नक्षलवादय़ांचेही त्यांना वावडे नव्हते, कारण अनेक कार्यकर्त्यांना नक्षलवाद सोडून मुख्य धारेत येण्यास त्यांनी मदतच केली होती. गौरी यांच्या संपादकत्वाखाली निघणारे नियतकालिक हे प्रस्थापितविरोधी, पण गरिबांची आणि दलितांची बाजू मांडणारे होते. या साप्ताहिकाची संपादकीय भूमिका उजव्या विचारांवर आणि ‘हिंदुत्व’वादी धोरणावर घणाघातील टीका करणारी होती. हत्येच्या काही महिने आधीपासून, गौरी यांनी ‘फेक न्यूज’च्या म्हणजेच हेतुपुरस्सर पेरलेल्या प्रचारकी असत्य वृत्तांविरुद्ध मोहीम उघडली होती. धमक्या अनेक येऊनही न डगमगता, न घाबरता त्यांनी अखेरच्या दिवसापर्यंत काम सुरू ठेवले होते.
शान्तनु भौमिक (१९८९-२०१७)
शान्तनु भौमिक हा एक तरुण बातमीदार. आगरतळा (त्रिपुरा) येथील एका चित्रवाणी वाहिनीत काम करताना त्याला महिना सहा हजार रुपये मिळत. धाडसी पत्रकार अशी ख्याती अल्पावधीत त्याने मिळवली होती. कोणताही प्रसंग घडल्यावर सर्वप्रथम तेथे पोहोचणारा, बातमीमागची बातमी देण्यास सदैव कटिबद्ध असा, बातमी जेथे घडली तेथूनच धडाडीने ‘लाइव्ह’ बित्तंबातमी देणारा हा बातमीदार शान्तनु, स्वत:च्या घरात एक छोटीशी बालवाडीदेखील चालवीत असे. या बालवाडीचे नाव ‘मानोबिक’ (या बंगाली शब्दाचा अर्थ- ‘मानवी’ किंवा ‘माणुसकीयुक्त’). ‘इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा’ या संघटनेने आजवरच्या अन्याय-अत्याचारांची दाद मागण्यासाठी केलेल्या आंदोलनाचे वृत्तांकन, हे शान्तनुचे अखेरचे वार्ताकार्य ठरले.
या पाचही जणांपैकी कोणीच श्रीमंत (म्हणजे गरिबांचे शोषण करणारा या अर्थाने ‘श्रीमंत’ हा शब्द सर्रास वापरला जातो, तसे) नव्हते. कोणाहीकडे राजकीय सत्ता नव्हती किंवा कोणाचेही काम सत्ताकांक्षी नव्हते. हत्या झाली, तेव्हा या कोणाहीकडे एखादे महत्त्वाचे पद नव्हते. यापैकी एकाचाही हिंसेवर विश्वास नव्हता. यापैकी तिघे वयस्कर पुरुष होते, एक मध्यमवयीन महिला, तर एक युवक होता.
या पाच जणांपैकी प्रत्येक जण सुशिक्षित होता, विचारांच्या जगात रमणारा आणि चर्चा/वादसंवाद यांचे वावडे नसणारा होता. अशा विचारांची खरे तर कोणास भीती वाटू नये, पण काही जणांना ती वाटते हे उघड आहे. ही विचारांची भीती ज्यांना वाटते, त्यांना विवेकी वादसंवादाचे किंवा भिन्न विचारांच्या चर्चेचे वावडेच असते. मला प्रश्न पडतो की, हा भीतीयुक्त तिरस्कार- तोही अंधश्रद्धा निर्मूलन, मूर्तिपूजेच्या बडिवाराला विरोध आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन अशा विचारांचा तिरस्कार – ते विचार मांडणाऱ्याला मारूनच टाकण्यापर्यंत – करणारे कोण असावेत? भारतीय समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह झाले म्हणून कोणाला संताप येतो? कम्युनिस्ट पक्षाचे नेते अनेक आणि कार्यकर्तेही हजारो असताना एखाद्या डाव्या विचाराच्या व्यक्तीला संपवावे, असे कोणाला वाटू शकते? आदिवासींच्या व्यथावेदना मांडणाऱ्या तरुण, धडाडीच्या पत्रकाराची अडचण कोणाला होत असावी?
या निषेधार्ह हत्या घडवण्यापर्यंत ज्यांची मजल जाऊ शकली असेल, अशा माणसांचे किंवा गटांचे चित्र वरील प्रश्नांतून स्पष्ट होत जाते. त्या सर्व प्रश्नांचे अतिसंभाव्य उत्तर असे की, हे सारे जण उजव्या विचारांच्या गटांचे असावेत. ते इतके परंपराप्रिय प्रतिगामी की, त्यांच्या प्रतिक्रियावादाला अंतबिंदू नसतो. त्यांच्या विचारांना आव्हान देणाऱ्या सर्व विचारांचा त्यांना तिरस्कारच असतो. इतका की, त्यासाठी भारताची सामाजिक-सांस्कृतिक बहुविधता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांनाही ते वादविषय बनवतात. ते असहिष्णू असतात. तिरस्कार फैलावणारे असतात. थोडेफार समविचारी लोक आसपास असले, तरी यांना स्फुरण चढते आणि समूहात असले तर हिंसेपर्यंत- अगदी हत्येपर्यंतही- त्यांची मजल जाऊ शकते.
मारणाऱ्यांची ही वैशिष्टय़े लक्षात घेता, एव्हाना ‘कोणाला मारण्यात आले’ हा प्रश्न ‘कोणी मारले असावे’ या प्रश्नापेक्षा तपासयंत्रणांच्या कार्यासाठीही महत्त्वाचा ठरावयास हवा होता. यापैकी चार हत्यांमधील काही प्रमुख संशयितांची नावे एकसारखीच आहेत आणि ते सर्व जण बेपत्ता आहेत किंवा फरार घोषित करण्यात आलेले आहेत. दरम्यानच्या काळात, तिरस्कार आणि भीतीचा फैलाव सुरूच राहतो आहे आणि आपल्या माना केवळ खेदानेच नव्हे तर शरमेनेही खाली जात आहेत.
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
- संकेतस्थळ : in
- ट्विटर : @Pchidambaram_IN