लक्ष्यभेदी हल्ला हा शब्द यंदा दोन वेळा गाजला. सीमापार जाऊन आपल्या जवानांनी शत्रुराष्ट्रातील अतिरेक्यांचे काही अड्डे उद्ध्वस्त केले तरी दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत. नंतर निश्चलनीकरणाचा ‘हल्ला’ झाला. आता त्यास महिना उलटून गेल्यानंतर रिझव्र्ह बॅँकेचे प्रमुख , महसूल सचिव, नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांनी काळ्या पैशाविषयी केलेली विधाने सरकारचा हा निर्णय योग्य नव्हता हेच अप्रत्यक्षपणे सुचवतात. मग जनतेला प्रचंड त्रास देण्याचा हा उद्योग का केला?
लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राइक) हा भारतात सन २०१६ मधील परवलीचा शब्द ठरला. ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या ‘वर्षांतील शब्द’ ठरलेला ‘पोस्ट-ट्रथ’ हा शब्द कदाचित अनेक भारतीयांना माहिती नसेल. मीदेखील हे कबूल करतो, की हा शब्द मीही कुठल्या संभाषणात किंवा व्याख्यानात ऐकला नव्हता, पण तो वर्षांतील शब्द ठरला हे खरे.
लक्ष्यभेदी हल्ला हा तसा साधा शब्द आहे. समजायला साधा सोपा अन् विशेषत: शक्ती आणि युक्तीचा योग्य वापर करून इच्छित परिणाम कसा साधला गेला हे दर्शवणारा. त्यामुळे या शब्दात अनेक गोष्टी अनुस्यूत धरल्या जातात.. सांघिक कामगिरी, कठोर परिश्रमपूर्वक तयारी, अचूक अंमलबजावणी, ईप्सित परिणाम अन् यश हे सर्व या शब्दातून सूचित होते. २९ सप्टेंबर २०१६ रोजी सीमेवर घडविण्यात आलेल्या कारवाईला जेव्हा लक्ष्यभेदी हल्ला असे अधिकृतरीत्या संबोधले गेले तेव्हा मी अचंबित झालो; पण हा शब्द निवडण्यामागे राजकीय चातुर्य होते हेही लक्षात आले..
आता हेही लक्षात घेतले पाहिजे की, सीमेपलीकडे जाऊन केलेली कोणतीही कारवाई ही लक्ष्यभेदी हल्लाच असते. सीमेवर दिवस-रात्र डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या उभय देशांच्या जवानांना मर्यादेत ठेवणे यापलीकडे त्यातून काही मोठे साधत नसते. हे करताना शत्रूची यात काही प्रमाणात हानी होत असते. मात्र, त्याने देशांच्या लष्करी आस्थापनांचे फार नुकसान होत नसते. त्यामुळे ‘जैसे थे’ परिस्थितीत फारसा बदल होत नसतो. आता हे सारे भारतीय लष्कराला माहिती आहे, तरीही पाकिस्तानची घुसखोरी संपवण्यासाठी हे हल्ले करण्यात आले व त्या देशाला धडा शिकवण्याचा हेतू होता, असे संरक्षणमंत्री दवंडी पिटत फिरले आणि त्याला काही कारणांमुळे भारतीय लष्करानेही दुजोरा दिला.
काही बदलले का?
२०१६ वर्ष सुरू झाले तेच पठाणकोट येथे हवाई तळावर हल्ला झाला या घटनेने. त्यानंतरही अनेक हल्ले झाले त्याची यादीच सांगता येईल.
२ जानेवारी २०१६- हवाई दल स्टेशन, पठाणकोट,
१८ सप्टेंबर २०१६- ब्रिगेड मुख्यालय, उरी
२९ सप्टेंबर २०१६- ‘लक्ष्यभेदी हल्ला’
२ ऑक्टोबर २०१६- बटालियन मुख्यालय, राष्ट्रीय रायफल्स, बारामुल्ला
२९ नोव्हेंबर २०१६- उत्तर विभाग प्रमुखांचे मुख्यालय, नगरोटा.
सीमेपलीकडून झालेल्या या हल्ल्यांत काही बाबींत संगती आहे. यात बहुतेक ठिकाणे ही लष्करी आस्थापने लक्ष्य आहेत. अगदी कमी संख्येने आलेल्या आत्मघात्यांनी हे हल्ले केले. या आत्मघात्यांनी रात्री घुसखोरी करून पहाटेच्या वेळी हल्ले केले आहेत. सुरक्षा भेदण्यात ते यशस्वी झाले. हल्लेखोर आत्मघाताच्या तयारीने आले होते.
या वर्षी जम्मू व काश्मीरमधील परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा वाईट होती. दहशतवादी, जवान आणि सामान्य नागरिक यांच्या मृत्यूचे, ५ डिसेंबर २०१६ रोजी असलेले तुलनात्मक चित्र पुढीलप्रमाणे..
२०१५ २०१६
दहशतवादी १०७ १४६
सुरक्षा दले ३९ ८१
नागरिक २२ १७
लक्ष्यभेदी हल्ल्याचे भांडवल
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लक्ष्यभेदी हल्ल्याचा उलगडा होत असतानाच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी आणखी एक लक्ष्यभेदी हल्ला झाला. या वेळी तो देशांतर्गत चलनावरचा होता. पाचशे व हजारांच्या नोटा या रात्री रद्द करण्यात आल्या. तोही एक हल्लाच होता, खोटय़ा नोटा, दहशतवादाचा अर्थपुरवठा, काळा पैसा व भ्रष्टाचार रोखणे हा त्यामागचा हेतू होता, असे उच्चरवात सांगण्यात आले. या निर्णयामुळे लोकांची होणारी ‘गैरसोय’ अगदी काही दिवसांतच संपुष्टात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. यात अपेक्षित फायदा खूप असणार आहे, काळा पैशाला पायबंद बसेल वगैरेबरोबरच रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाकडून विशेष लाभांशाच्या स्वरूपात सरकारला तीन लाख कोटी मिळतील, असे अंदाज वर्तवण्यात आले.
काळ्या पैशावरचा हा लक्ष्यभेदी हल्ला आता वेगाने उलगडत जात आहे.. अगदी महिन्याच्या आतच त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. बँकांसमोर रांगा लागल्या त्या कायम आहेत, एटीएमसमोर रांगा लागल्यात, पण पैसे नाहीत. बँकांच्या कामकाजाची सुरुवात होता काही तासांतच पैसे संपलेत अशी परिस्थिती आहे. बहुतेक एटीएम आता तर बंदच आहेत. सर्व प्रमुख बाजारपेठा बंद आहेत किंवा कोलमडल्या आहेत. किरकोळ विक्री व्यवसाय उतरणीला लागला आहे, ८० टक्के प्रमाणात त्याची हानी झाली आहे. शेतकऱ्यांकडे खते, बियाणे व मजुरीसाठी पैसे नाहीत. अनेकांना महिनाभर वेतन व रोजंदारी मिळालेली नाही.
ज्या पैशांचे निश्चलनीकरण केले ते सर्व परत बँकिंग प्रणालीत येणार आहेत, अशी क बुली महसूल सचिव व निती आयोगाच्या उपाध्यक्षांनी द्यावी यापेक्षा सरकारची केलेली दुसरी थट्टा काय असू शकते. त्यांनी वक्तव्य नंतर बदलले, पण वार्ताहरांनी त्यांचे शब्द जसेच्या तसे छापले. जर १५ लाख ४४ हजार कोटी रुपये किमतीच्या बाद नोटा परत बँका व पोस्ट कार्यालयात भरल्या जाणार असतील तर सरकारने अर्थव्यवस्था मोडकळीस आणणारे हे दु:साहस का केले? लाखो लोकांच्या जिवाशी खेळ का केला?
काहीच साध्य नाही
– काळ्या पैशावर लक्ष्यभेदी हल्ल्याने तो खरेच नष्ट झाला का? अलीकडेच दोन मोठे व शाही विवाह सोहळे उधळपट्टी करीत पार पडले; तरी ते कमी खर्चातले होते असेच मानावे लागेल! अनेकांकडे दोन हजारांच्या नवीन नोटांचे घबाड सापडले. (तामिळनाडूत एका ठिकाणी १० कोटींच्या नव्या नोटा मिळाल्या.)
– नोटा बाद केल्याने दहशतवादाचा अर्थपुरवठा थांबला का? २२ नोव्हेंबरला बांदिपोरा येथे चकमकीत जे दोन दहशतवादी मारले गेले त्यांच्या मृतदेहांजवळ दोन हजारांच्या नव्या नोटा सापडल्या होत्या.
– काळ्या पैशावरील हल्ल्याने भ्रष्टाचार थांबला का? या निर्णयानंतर लगेच महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक व तामिळनाडूत २००० च्या नवीन नोटांच्या स्वरूपात लाच स्वीकारल्याच्या घटना सामोऱ्या आल्या.
बनावट नोटा संपल्या का? वाट पाहा. दोन हजाराची बनावट नोट मिळेलच.
– या निर्णयाने सरकारला खूप मोठा लाभ झाला का? रिझव्र्ह बँकेने ७ डिसेंबरला सरकारचे दिवास्वप्न भंग केले. गव्हर्नरांनी असे सांगितले, की कायदेशीर नोटा रद्द केल्याने रिझव्र्ह बँकेच्या दायित्व ताळेबंदात काही फरक पडला नाही व त्यामुळे आता तरी काहीच परिणाम दिसत नाही. रिझव्र्ह बँक त्यांना झालेला फायद्याचा वाटा सरकारला देणार का, यावर गव्हर्नर पटेल म्हणाले की, तो प्रश्न आता तरी निर्माण होत नाही.
एकूणच २०१६ हे वर्ष असे संपेल अशी अपेक्षा नव्हती. सीमेवर गंभीर परिस्थिती, वाढती प्राणहानी, आर्थिक वाढीला फटका, गरिबांचे रसातळाला जाणे हे अपेक्षित नव्हते. सरकार म्हणते काही दिवसांत सगळे ‘नव्याने सुरळीत’ होईल, पण अनेकांना असे वाटते की, जे ‘पूर्वी चालले होते’ तेच बरे होते.
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in
ट्विटर : @Pchidambaram_IN