|| पी. चिदम्बरम

नितीन गडकरी यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्ये पाहता रा. स्व. संघाकडून त्यांना लगाम बसणे अथवा ते ज्यांना लक्ष्य करीत आहेत अशा मोदी-शहांनी त्यांना प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते. तसे काहीच झालेले नाही आणि मोदी-शहांच्या नेतृत्वाखालील भाजप जसजसा अपयशाकडे जाऊ लागला तसतशी ही वक्तव्ये वाढली, असेही दिसून येते..

केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी हे तसे असाधारण राजकारणी आहेत. ते चवदार अन्नावर प्रेम करणारे तर आहेतच, त्याच्या जोडीला टापटीप राहणी, जीवनाचा आनंद समरसून घेण्याची वृत्ती यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे, शिवाय सार्वजनिक कार्यक्रमात बोलण्याचा आनंदही ते मनमुराद लुटत आहेत. कोणाचीही तमा न बाळगता त्यांचे बोलणे हे मुक्त असते.

गडकरी हे संघाचे स्वयंसेवकही आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते लाडके नेते असल्याचे बोलले जाते. त्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या नागपूर मतदारसंघाची बांधणी छानच केली आहे. सतत हलकेफुलके विनोद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे पक्षनेते व कार्यकर्ते यांना एरवी सततच्या गंभीर वातावरणापासून त्यांनी नेहमीच दूर नेले आहे.

गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही नागपूरचे. त्यांना त्या भागातून चांगला जनाधार आहे, त्यांना असलेला राजकीय नेते व कार्यकर्त्यांचा पाठिंबाही तुल्यबळ असाच आहे. एकाच भागातून एकाच पक्षाच्या दोन नेत्यांना असे पाठबळ मिळणे हे तसे दुरापास्त असते, पण या दोघांच्या बाबतीत तसे नाही. गडकरी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे आहे अशी चर्चा महाराष्ट्रातून ऐकू येई. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या मनसुब्यांना पायबंद घालून ते उधळून लावले. निष्ठावंत मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांना मोदींनी प्राधान्य दिले. त्यामुळे फडणवीसांच्या माध्यमातून गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षांना पायबंद घालण्याचे काम मोदी चोखपणे पार पाडत आहेत, पण गडकरी यांनी सगळे बंध तोडून अनेकदा स्वत:चा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

गडकरी केंद्रात मंत्री झाल्यापासून त्यांच्या कामाची, त्यांची खात्यांवर जी पकड आहे त्याची नेहमी चर्चा होत आली आहे. महामार्ग, रस्ते वाहतूक, जलसंपत्ती, नदीविकास व गंगा शुद्धीकरण ही खाती त्यांच्याकडे आहेत. मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द खरे तर संमिश्र म्हणता येईल. महामार्ग बांधणीत त्यांचे काम चांगले आहे. गंगा शुद्धीकरणाबाबत केवळ वाढवून चढवून केलेले दावे आहेत, जलसंपत्ती विकासात त्यांची कामगिरी अपेक्षेच्या खाली आहे. पाटबंधारे प्रकल्पांबाबत तर ती आणखी वाईट आहे.

कार्यालयाबाहेर असताना जेव्हा ते बोलतात तेव्हा ते स्पष्टवक्ते आहेत असे दिसते. मार्च २०१८ मध्ये माध्यमांनी आयोजित केलेल्या एका परिसंवादात त्यांनी असे सांगितले की, माध्यमांनी आम्हाला अच्छे दिन या शब्दाच्या कोंडीत पकडले आहे. पण माझ्या या विधानातून तुम्ही नको ते अर्थ लावू नका, अच्छे दिन असे काही नसते. अच्छे दिन हा केवळ श्रद्धेचा व विश्वासाचा भाग आहे. जर तुम्ही म्हटले तर आताही अच्छे दिन आहेत, नाही म्हटले तर नाहीत.. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये जेव्हा आरक्षणाच्या आंदोलनांनी उचल खाल्ली होती तेव्हा ते असे म्हणाले होते की, जरी आरक्षण दिले तरी नोकऱ्या आहेत कुठे, तंत्रज्ञानाने बँकांतील नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरभरती गोठवलेली आहे. अनेकांनी त्या वेळी गडकरी यांच्यावर संशय घेतला की, गडकरी यांचे लक्ष्य आरक्षण मागणारे आंदोलक हे नसून, रोजगारनिर्मिती करण्यात अपयशी ठरलेले मोदी सरकार हे त्यांचे खरे लक्ष्य आहे.

गडकरी यांनी विचारपूर्वक केलेल्या वक्तव्यांमुळे वादाचे मोहोळ वेळोवेळी उठले आहे. त्यांची विधाने अशी कलाकुसर केलेली, ताशीव वाटतात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत भाजपचा पराभव झाला त्या वेळी ती संधी गडकरी यांनी सोडली नाही. त्यांनी काही हातचे राखून न ठेवता वक्तव्ये केली. ते म्हणाले की, ‘यशाला अनेक बाप असतात, पण अपयश हे पोरके असते. जेव्हा यश मिळते तेव्हा त्याचे श्रेय घेण्यासाठी अहमहमिका लागते पण जेव्हा अपयश येते तेव्हा ते स्वीकारण्यासाठी कुणी पुढे येत नाही. कुठल्याही नेत्याकडे यशाप्रमाणेच अपयश स्वीकारण्याची ‘वृत्ती’ असली पाहिजे. नेत्याची संघटना किंवा पक्षाशी एकनिष्ठता ही तो जेव्हा पराभवाची जबाबदारी स्वीकारतो तेव्हाच दिसून येते.’ अलीकडे म्हणजे प्रजासत्ताकदिनी गडकरी असे म्हणाले की, ‘लोकांना स्वप्ने दाखवणारे राजकीय नेते आवडतात, पण जेव्हा ही स्वप्ने पूर्ण होत नाहीत तेव्हा लोक त्यांची धुलाई करतात.’

आव्हानाला सज्ज

गडकरी यांची ही सगळी वक्तव्ये पाहिली तर ती मोदी यांना लक्ष्य करणारी आहेत याविषयी शंका उरत नाही. जर भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नाही किंवा सरकार स्थापन करता आले नाही तर गडकरी हे मोदी यांच्या नेतृत्वास पक्षपातळीवर आव्हान देतील, अशी व्यूहरचना यात दिसते.

यापूर्वी गडकरी यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाही ओझरते फटकारे दिले आहेत. आयबी एंडोमेंट व्याख्यानात २४ डिसेंबर २०१८ रोजी गडकरी यांनी असे म्हटले होते की, जर मी पक्षाध्यक्ष असेन, माझे खासदार व आमदार चांगले काम करीत नसतील तर त्याला जबाबदार कोण, तर मीच. याच कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सूचक आव्हान देताना म्हटले होते की, भारतीय व्यवस्थेत सहिष्णुता, विनम्रता हीच मोठी जमेची बाजू असते. तुम्ही चांगले बोलता म्हणून निवडणुकाजिंकू शकत नाही. कुणी विद्वान आहे म्हणून लोक तुम्हाला मते देतील असे नाही. ज्याला कुणाला असे वाटत असेल की मला सर्व समजते तर त्याचा गैरसमज झाला असे समजावे; त्यामुळे कृत्रिम प्रचारकी थाटापासून लोक दूरच राहतात, हे वेळीच ओळखणे चांगले.

भाजपमधील बंडखोराने जे बोलणे अपेक्षित आहे ते सगळे तर गडकरी बोलले आहेतच; पण जे एरवी विरोधकांनी बोलावे अशी अपेक्षा आहे तेही त्यांनी बोलून टाकले आहे. पंतप्रधान हे अपयशी स्वप्नांचे सौदागर आहेत, अपयशाची, निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेण्याची त्यांची वृत्ती नाही, ते असहिष्णू आहेत, ते कृत्रिम व प्रचारकी थाटात मश्गूल आहेत, त्याचा काही उपयोग होणार नाही, असे सगळे काही ते बोलले ते सगळे मोदी यांना उद्देशून आहे. मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याकडून पंतप्रधान व पक्षाध्यक्षांना शब्दांचा इतका कठोर मार..  मी तरी कधी बघितलेला नाही.

नेतृत्व गोंधळात व घाबरलेलेही

गडकरी यांनी सहजगत्या केलेल्या टीकेला पक्षनेतृत्वाने (मोदी व शहा) जाहीरपणे उत्तरे दिलेली नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरी यांना सबुरीचा सल्ला दिलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती कशी हाताळावी यावर सर्वच जण गोंधळलेले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल काय असतील याबाबत छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश यांसह अनेक राज्यांतील भाजप नेते साशंक आहेत. हे पक्षनेतृत्वालाही माहिती आहे, त्यामुळे गडकरी यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस ते दाखवू शकत नाहीत. २०१४ मध्ये भाजपला उत्तर प्रदेशातील अपना दल या मित्रपक्षासह वरील चार राज्यांत १४५ पैकी १३५ जागा मिळाल्या होत्या. आता होणाऱ्या निवडणुकीत या १३५ जागांपैकी किमान ८० जागा भाजप गमावणार हे निश्चित आहे. गडकरी व त्यांचे समर्थक असे घडण्याची वाट पाहत आहेत, अशी कुजबुज रोजच ऐकू येते आहे. तसे झाले तर गडकरी व त्यांच्या समर्थकांसाठी ती आनंदपर्वणी असेल.

दिवसेंदिवस अनेक नेते भाजपच्या २०१९ मधील निवडणुकीतील संभाव्य जागांच्या संख्येबाबत शंका घेत आहेत. अलीकडे रामविलास पासवान यांनी अशीच साशंकता व्यक्त केली आहे. २०१४ मध्ये २८२ जागा मिळवणारा भाजप आता घसरणार हे निश्चित आहे. ही घसरगुंडी होणारच आहे यात शंका नाही, पण त्याबाबतची भाकिते तसेच गडकरी यांच्यासारख्यांची शाब्दिक मुक्ताफळेही यातून वाढत जातील व पक्षनेत्यांची स्थिती मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवघड होऊन जाईल.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

Story img Loader