पी. चिदम्बरम

‘लव्ह जिहाद’प्रमाणेच आता ‘नारकोटिक जिहाद’- म्हणजे अमली पदार्थाचा प्रसार करण्याद्वारे इस्लामेतर धर्मीयांशी ‘युद्ध’ सुरू आहे, असा आरोप एका ख्रिस्ती धर्माधिकाऱ्याने केला आणि सनातनी विचारांच्या उजव्या हिंदूंनी त्यास पाठिंबा देणे आरंभले.. पण अलीकडेच गुजरातच्या किनाऱ्यावर ते तब्बल ३००० किलो अमली पदार्थ पकडण्यात आले, त्याची हाक ना बोंब; असे का झाले असावे?

इतिहास आपणास हेच सांगतो की, धर्मयुद्धे अकराव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाली. साधारण १०९५ ते १२९१ दरम्यान ही युद्धे झाल्याचे म्हटले जाते. इतिहासाच्या नोंदीनुसार ही युद्धे युरोपीय ख्रिश्चनांनी लॅटिन चर्चच्या पाठिंब्याने केली. इस्लामचा प्रसार रोखण्यासाठी किंवा मुस्लिमांचे विस्तारीकरण पॅलेस्टाइन, सीरिया, इजिप्त या देशांत रोखण्यासाठी त्याचबरोबर भूमध्य सागराच्या पूर्वेकडील प्रदेशामधील ‘पवित्र भूमी’ परत मिळवण्यासाठी त्यांनी ही युद्धे केली. येशू ख्रिस्तानंतर अनेक वर्षांनी व प्रेषित महंमद पैगंबरानंतर ४५० वर्षांनी ही युद्धे झाली. खरे तर ख्रिस्त व महंमद पैगंबर दोघांनीही अद्वैतवादाचा पुरस्कार केला. अब्राहम व मोझेसचा दोघांवर प्रभाव होता किंवा तेच त्यांची प्रेरणा होते. मुस्लिमांमध्ये इब्राहिम व मुसा. ज्यू किंवा यहुदी धर्मासह तीन धर्मश्रद्धांना अब्राहमिक धर्म मानले जाते. त्यामुळे या धर्मयुद्धांचे समर्थन हे अनाकलनीय, चक्रावून टाकणारे आहे. युद्धे होऊनही ख्रिश्चन व इस्लाम धर्म आजपर्यंत लाखो अनुयायांसह टिकून आहेत. त्यातील अनेक अनुयायी सहिष्णू, शांतिमय आहेत. काही योद्धे किंवा हिंसक आहेत. युरोप हा जास्त करून ख्रिश्चन आहे. पॅलेस्टाइन, सीरिया, इजिप्त व इतर प्रदेश मुस्लीम आहेत आणि हे प्रदेश युद्धग्रस्त राहिलेले आहेत. 

या सगळ्याचे सार एवढे तरी नक्कीच की, कुठल्याही एका धर्माने दुसरा धर्म नष्ट केल्याचे दिसून आलेले नाही.

जिहाद म्हणजे काय

जिहाद हा शब्द अलीकडे चलनी नाण्यासारखा वापरला जातो. ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या मते जिहाद हा चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी व चांगल्या गोष्टींना उत्तेजन देण्यासाठी दिलेला लढा. आधुनिक काळात जिहाद म्हणजे हिंसाचार असा अर्थ आहे. जिहादची मूळ संकल्पना उदात्त होती, पण आता त्याचे वेगळे अर्थ लावले जात आहेत.

‘लव्ह जिहाद’ हा एक नवा राक्षस हिंदू मूलतत्त्ववाद्यांनी अलीकडे शोधला आहे. महिला व पुरुषांना घाबरवण्याचा, त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा त्यामागचा हेतू आहे. ‘नारकोटिक जिहाद’ म्हणजे अमली पदार्थाशी संबंधित जिहाद हा एक नवीन प्रकार आता शोधण्यात आला आहे. प्रचाराचे हे सगळे प्रकार ऐकताना वा पाहताना मला वेदना होतात. तशा त्या लाखो भारतीयांनाही होत असतील, असे मला वाटते. पाला येथील बिशप जोसेफ कल्लारगट हे नारकोटिक व जिहादचा संबंध लावणाऱ्यांपैकी प्रमुख असावेत. प्रेम ही एक नैसर्गिक मानवी भावना आहे, त्यास जिहाद शब्द जोडणे म्हणजे मानवी भावनेचा अपमान आहे. तसेच, अमली पदार्थाना जिहाद शब्द जोडणे हा विचार योग्य वाटत नाही.

यामागील उद्देश स्पष्ट दिसतात- एक तर यात हिंदू व ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असावा. दुसरीकडे इस्लाम हा याचा दुसरा रोख असावा. इस्लामला ‘आपल्यासारखे नसलेले- ‘इतर’ लोक’ किंवा धर्मवेडे ठरवण्याचा प्रयत्न असावा. एखाद्याच समूहावर धर्मवेडेपणाचा आरोप वारंवार आणि सबगोलंकार पद्धतीने सतत करीत राहणे, हा दुजाभावाचा किंवा सापत्नभावाचा प्रकारच ठरतो. धर्मनिरपेक्ष देशामध्ये या असल्या प्रचाराचा विरोधच व्हायला हवा.

पुरावे नाहीत

भारतात इस्लाम हा विस्तारवादी होता याचे पुरावे नाहीत. ‘प्यू रीसर्च सेंटर’ने भारतात जो सर्वेक्षण-अभ्यास जून २०२१ मध्ये केला, त्याचे निष्कर्ष अलीकडेच जाहीर झाले असून त्यातून अनेक मिथके व खोटय़ा गोष्टींचा उलगडा झाला आहे. १९५१ ते २०११ या संपूर्ण काळात भारताची धार्मिक लोकसंख्या-रचना स्थिर होती. काही काळ स्थलांतरामुळे मुस्लिमांची संख्या वाढली होती. तर काही वेळा त्यांचा जननदर जास्त होता, पण नंतर १९९२ मध्ये तो ४.४ असताना २०१५ मध्ये २.६ झाला. हिंदूंपेक्षा हा जननदर किंचित जास्त दिसून येतो. इतर धर्मीयांपेक्षाही तो थोडा अधिक होता. असे असले तरी भारतात हिंदूंची संख्या २०५० पर्यंत ७७ टक्के म्हणजे १३० कोटी असेल. प्यूच्या सर्वेक्षणानुसार ८१.६ टक्के लोक हिंदू म्हणून वाढले व आज ८१.७ टक्के लोक हिंदू म्हणून ओळख टिकवून आहेत. २.३ टक्के लोक ख्रिश्चन म्हणून वाढले, पण २.६ टक्के लोक ख्रिश्चन अशी ओळख सांगत आहेत. ‘लोकांचे इस्लाममध्ये मोठय़ा प्रमाणात धर्मातर करण्यात आले’ हा प्रचार या पार्श्वभूमीवर असत्य ठरतो. 

पाला येथील बिशप हे ख्रिश्चन असले तरी त्यांच्या ‘नारकोटिक जिहाद’ वक्तव्याला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये बरेच हिंदू उजवे मूलतत्त्ववादी लोक दिसतात, यात नवल नाही. दोघांचाही रोख इतरांवर म्हणजे मुस्लिमांवर आहे. पण येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, हिंदू उजव्या लोकांनी अनेकदा ख्रिश्चनांनाही इतर या गटात टाकले आहे. दुजाभाव केला आहे. ‘इतर’ या गटात कुणाला तरी दडपण्याचे हे तंत्र मला कधीही, कोणाहीबाबत पटत नाही.

माझा शालेय अनुभव

मी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत शिकलो. तेव्हा बरेच विद्यार्थी समाजाच्या विविध थरांतून आलेले हिंदूच होते. काही प्रमाणात ख्रिश्चन तर काही मुस्लीम मुले असायची. प्रत्येक वर्गात अनेक विभाग असायचे. वर्गप्रमुखाची नेमणूक मुख्याध्यापक कुरुविला जेकब करीत असत. त्या पाच वर्षांत मी सहावी ते दहावीपर्यंत शिकलो. वर्गप्रमुख विद्यार्थी होता ए. के. मूसा. तो आनंदी व उत्साही होता. सर्वाशी मैत्रीपूर्ण अशीच त्याची वागणूक. पण तो सामान्य विद्यार्थी होता. फार हुशार वगैरे नव्हता. अकरावीला वर्गप्रमुख हा शाळेचा विद्यार्थी प्रमुख होत असे. त्या वेळी मुख्याध्यापक उंच, प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या व उत्तम इंग्रजी येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्राधान्य देत असत. जो वार्षिक समारंभात व शाळेच्या कार्यक्रमात उत्तम इंग्रजी बोलू शकेल. त्या वेळी त्यांनी हारून महंमद याची निवड केली. कुणाही विद्यार्थ्यांना अगदी हिंदू व ख्रिश्चन विद्यार्थ्यांनाही त्यात काही वेगळे वाटले नाही. त्या वेळी ‘तुष्टीकरण’ हा शब्दही आम्ही कुणीही ऐकलेला नव्हता.

मला एका गोष्टीचा आनंद आहे की, मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बिशप यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला नाही. त्यापेक्षा आनंद याचा की, विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला (विरोधासाठी विरोध म्हणून बिशपना पाठिंबा दिला नाही). ‘जे लोक चुकीच्या गोष्टी पसरवतात त्यांना सरकार माफ करणार नाही,’ अशी सरकारची भूमिका होती.

जे लोक ‘नारकोटिक जिहाद’चा खोडसाळ प्रचार करीत आहेत त्यांनी गुजरातच्या बंदरावर आयात करण्यात आलेल्या तीन हजार किलो हेरॉइनचा विचार करावा!

 मी यात अधिकारवाणीने सांगू शकतो की, कुणीही व्यक्ती इतक्या मोठय़ा प्रमाणात हेरॉइन आयात करण्याची कृती ‘व्यवस्थे’मधील कुणाच्या तरी पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. यात जे एक जोडपे पकडण्यात आले आहे ते मुस्लीम नाही. त्यांना उच्च स्तरावरून या कृतीसाठी पाठबळ असावे. पंतप्रधान व गृहमंत्री यांनी जिहाद, प्रेम व अमली पदार्थ यावरची नेहमीची चर्चा बाजूला ठेवून गुजरातेत जे ३००० किलो हेरॉइन जप्त करण्यात आले त्यावर भाष्य करावे. या घटनेचे गंभीर परिणाम अंतर्गत सुरक्षा व सामाजिक सलोख्यावर होणार आहेत याचा त्यांनी विसर पडू देऊ नये.

गुजरातमधील मुंद्रा बंदर- येथूनच १५ सप्टेंबर रोजी ३००० किलो अमली पदार्थ पकडले गेले (संग्रहित छायाचित्र; ‘अदानीपोर्ट्स.कॉम’ वरून साभार)

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in  ट्विटर : @Pchidambaram_IN

Story img Loader