बेरोजगारी हा आपल्या देशामधला या घडीचा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे खरा, पण तो संवेदनशीलतेने सोडवायचा असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलावा लागेल. वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. त्यासाठी आपण तयार आहोत का?
काही दिवसांपूर्वी एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. तमिळनाडूमधील रोजगार हमी केंद्रात सध्या किती बेरोजगारांची नोंदणी झाली आहे याची आकडेवारी त्या बातमीत दिली होती. ही आकडेवारी अतिशय निराशाजनक आहे. विशेष म्हणजे, ती उत्तर प्रदेश किंवा बिहारची नाही तर तमिळनाडूसारख्या चांगल्यापैकी विकसित राज्याची आहे. उत्तर प्रदेश किंवा बिहारसारख्या लोकसंख्या खूप आणि विकास मात्र अगदी कमी अशा राज्यांमधील बेरोजगारांना त्यांची नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त केले गेले आणि त्यांनीही खरोखरच जाऊन नोंदणी केली तर जी खरोखरची आकडेवारी मिळेल ती कल्पनातीत असेल.
छुप्या नोकऱ्या
बेरोजगारांसाठी खरोखरच नोकऱ्या आहेत का? आणि असतील तर त्या कुठे आहेत? तर त्या आपल्या नजरेसमोरच आहेत, पण दिसत नाहीत. ३१ मार्च २०२१ रोजी केंद्र सरकारमध्ये ८,७२,३४३ जागा रिक्त होत्या. सरकारने त्या भरल्या, पण किती? तर त्यापैकी ७८,२६४. म्हणजे उरल्या किती? तर जवळपास ८ लाख. म्हणजे जवळपास ८ लाख पदे रिक्त आहेत!
सगळीकडे नोकऱ्या आहेत, पण त्या शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाही. अलीकडेच, मी डॉ. देवी शेट्टी यांच्या एका भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिग ऐकले. त्या प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक आहेत. नारायणा हॉस्पिटल या रुग्णालयांच्या साखळीच्या निर्मितीसाठी त्यांना ओळखले जाते. त्यांच्या भाषणातील हे काही उतारे:
‘‘आमच्याकडे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर जागा आहेत. पण त्यासाठी माणसांची खूपच कमतरता आहे.
‘‘आपण कॅरिबियन देशांमध्ये गेलो तर आपल्याला दिसेल की तेथे असलेली ३५ वैद्यकीय महाविद्यालये अमेरिकेसाठी प्रशिक्षित डॉक्टर्स तयार करत आहेत. ही महाविद्यालयं एखाद्या शॉपिंग मॉलची ५० हजार स्क्वेअर फूट जागा भाडय़ाने घेऊन तिथे चालवली जातात. या महाविद्यालयांमधून प्रशिक्षण घेऊन उत्तम डॉक्टर्स तयार होतात. असे असेल तर मग आपण ४०० कोटी रुपये (वैद्यकीय महाविद्यालयांवर) खर्च करून मोठमोठय़ा वास्तू का उभ्या करत आहोत ? आपण जे काही करतो आहोत ते हास्यास्पदच आहे.
‘‘वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी १४० प्राध्यापकांची आवश्यकता नसते. १४० प्राध्यापक १००० विद्यार्थ्यांसह वैद्यकीय महाविद्यालय चालवू शकतात. या बाबतीत सगळे जग बदलले आहे, पण आपण मात्र जुन्या पद्धतीच कवटाळून बसलो आहोत.
‘‘आपण वैद्यकीय शिक्षण म्हणजे बुद्धिमंतांची मिरासदारी करून ठेवले आहे. आज गरीब कुटुंबातील मुले डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू शकत नाहीत. या गोष्टीचे भविष्यात फार भयंकर परिणाम होणार आहेत. जगभरातील उदाहरणे पाहिलीत तर आपल्या बोटांमध्ये जादू असलेले अनेक उत्कृष्ट डॉक्टर वंचित परिस्थितीमधून आले आहेत. आपली परिस्थिती बदलण्यासाठी दिवसाचे २४ तास काम करण्याची ज्यांची तयारी असते, त्यासाठी ज्यांच्या पोटात आग असते, अशी ही मुले आहेत.
‘‘आपल्याकडे दर १२ मिनिटांनी प्रसूतीदरम्यान एका गर्भवती महिलेचा मृत्यू होतो, असे का? तीन लाख मुले ज्या दिवशी जन्मतात त्याच दिवशी मरतात, असे का? १.२ कोटी मुले त्यांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वी मरतात, असे का? असे होताच कामा नये.
‘‘आपल्या देशात आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात दोन लाख स्त्रीरोगतज्ज्ञांची गरज आहे. पण आपल्याकडे ५० हजारपेक्षाही कमी स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत; त्यापैकी निम्मे प्रसूतीचे काम करत नाहीत. आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात दोन लाख भूलतज्ज्ञांची गरज आहे, पण तेदेखील आपल्याकडे ५० हजारांपेक्षाही कमीच आहेत. ‘‘लहान मुलांची काळजी घेण्यासाठी आपल्याला दोन लाख बालरोगतज्ज्ञांची गरज आहे, पण तेदेखील आपल्याकडे ५० हजारांपेक्षाही कमी आहेत; ‘‘आपल्याला किमान दीड लाख रेडिओलॉजिस्ट हवे आहेत, पण आपल्याकडे ते साडेदहा हजारदेखील नाहीत.
‘‘या देशाला वैद्यकीय क्षेत्रासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज नाही, तर वैद्यकीय, नर्सिग आणि पॅरा मेडिकल शिक्षण सगळय़ांसाठी खुले करण्याची गरज आहे.’’
उदारमतवादी नसलेली सरकारे
डॉ. शेट्टी यांचे म्हणणे असे आहे की, केवळ आरोग्य सेवा क्षेत्रातच थोडय़ा प्रयत्नाने हजारो नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. आता हाच तर्क कठोरपणे शिक्षण, शहर विकास, नद्या आणि जलस्रोत, वनीकरण, पशुसंवर्धन, कृषी संशोधन आणि विस्तार, अन्न प्रक्रिया यांसारख्या इतर क्षेत्रांनाही लागू करता येईल. त्यातून लाखो नोकऱ्या निर्माण होऊ शकतात आणि त्यातून लाखो लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात.
पण आपली सरकारे ही डरपोक आहेत. सरकारी क्षेत्रात अधिक माणसांची नितांत गरज असतानादेखील ते त्या नोकऱ्या निर्माण करायला घाबरतात, कारण आकाराने ‘लहान सरकार हे चांगले सरकार’ या भ्रमात ते आहेत आणि असे वाटून घेण्यातच ते स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत. या सरकारांकडे ज्ञानाचीही कमतरता आहे. आपण चांगली चालतील अशी स्वयंपूर्ण वैद्यकीय महाविद्यालये उभी करत नाही तर फक्त मोठमोठय़ा इमारती बांधतो, त्यांची स्मारके होऊन बसतात आणि दरम्यान, अनेक महिला, मुले आणि पीडिता मृत्युमुखी पडत राहतात, हा मुद्दा डॉ. शेट्टींनी अधोरेखित केला आहे. सरकारी पातळीवर उदारमतवादी मानसिकतेचा अभाव, डरपोक दृष्टिकोन आणि चुकीच्या गोष्टींवर केला जाणारा भरमसाट खर्च हे डॉ. शेट्टी यांचे मुद्दे सरकारच्या अगदी प्रत्येक विभागात आढळतात. यापुढच्या काळात रोजगार निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीतच मुळात बदल करावे लागतील. ठरून गेलेल्या साचेबद्ध गोष्टींची मोडतोड करावी लागेल. ‘५० हजार स्क्वेअर फूट शॉपिंग मॉल मेडिकल कॉलेज’ अशा पद्धतीचा वेगळा विचार करावा लागेल,’ असे डॉ. शेट्टी नमूद करतात.
नवे पथदर्शक
अनेकदा आहे त्या व्यवस्थेची बेधडकपणे मोडतोड करणाऱ्यांवर, बिनबोभाट सुरू असलेल्या अनेक गोष्टींमध्ये व्यत्यय आणणाऱ्यांवर टीका केली जाते. उपलब्ध व्यवस्था मोडून काढल्याबद्दल त्यांच्यावर ठपका ठेवला जातो. पण खूपदा असेही होते की असेच लोक एखाद्या नव्या गोष्टीचा शोध लावतात. नवे विश्व निर्माण करतात. आधी कधीच अस्तित्वातच नव्हते असे काही तरी निर्माण करतात. या सगळय़ा प्रक्रियेमधून संपत्ती आणि रोजगाराची निर्मिती करतात. गॉटलीब डेमलर, हेन्री फोर्ड, केंजिरो टाकायनागी, सॅम वॉल्टन, जॉन मिशेल आणि मार्टिन कूपर (मोटोरोला), स्टीव्ह जॉब्स, जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग, एलॉन मस्क ही नावे बघा. त्यांनी लावलेले शोध बघा आणि त्यातून निर्माण झालेले लाखो, कोटय़वधी रोजगार बघा. त्यांनी त्यांच्या प्रतिभेतून, धाडसातून, उपक्रमशीलतेमधून जे काही निर्माण केले ते, त्यांच्या आधी अस्तित्वातच नव्हते.
रोजगार ही आजघडीला आपल्या देशामधली सगळय़ात मोठी आणि महत्त्वाची गरज आहे. मी वर उल्लेख केला आहे त्या क्षेत्रांमध्ये शिक्षक, ग्रंथपाल, कला आणि हस्तकला शिक्षक, प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डिझायनर आणि वास्तुविशारद, शहर नियोजक, अभियंते, वनरक्षक, मच्छीमार, पशुवैद्यक, दूध उत्पादक, कुक्कुटपालन यांसारख्या लाखो नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे. यातही अनेक उपप्रकार आहेत. सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगांच्या क्षेत्रात त्यातही विशेषत: लहान आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगाराच्या सगळय़ात जास्त संधी आहेत. एकदा रोजगार निर्माण झाले की, त्याच्याशी संबंधित सगळीच चक्रे चांगल्या पद्धतीने फिरायला लागतात. संबंधित लोकांना नोकऱ्या मिळायला लागतात, त्यांचे उत्पन्न वाढते, त्यांच्याकडे संपत्ती निर्माण होते, करांच्या माध्यमातून महसूल मिळायला लागतो, पर्यावरणाची काळजी घेतली जाते, धर्मादाय गोष्टींसाठी पैसा खर्च केला जातो. ललित कला, साहित्य या क्षेत्रांना पाठबळ मिळते. अशा आणखी किती तरी गोष्टी सांगता येतील.
पण रोजगाराचा विचार करतेय कोण? खरे तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयाच्या बाहेर एक उत्तम संधी उभी आहे आणि ती आपल्याला कोणी तरी शोधेल याची वाट बघते आहे. पण हे खाते असा काही शोध घेताना दिसत नाही. मोदी सरकारचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थ मंत्रालयही असा काही शोध घेताना दिसत नाही. १५७ परिच्छेद असलेल्या, ९० मिनिटांच्या या अर्थसंकल्पीय भाषणात ‘रोजगार’ हा शब्द फक्त तीन ठिकाणी आला!
एकूण: ७५,८८,३५९
त्यापैकी १८ वर्षांखालील: १७,८१,६९५
१९-२३ वर्षे: १६,१४,५८२
२४-३५ वर्षे: २८,६०,३५९
३६-५७ वर्षे: १३,२०,३३७
५८ वर्षांपेक्षा जास्त: ११,३८६
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in
ट्विटर : @Pchidambaram_IN