|| पी. चिदम्बरम

गूढ आकर्षणाचा विषय ठरलेले शांग्रिला खोरे म्हणजे निसर्गातील सुसंवादाचे प्रतीक. पृथ्वीवरचा स्वर्ग, शाश्वत सुखाची भूमी. पण हे शांग्रिला खोरे कधी भारतात असण्याची शक्यताच नाही. इतिहास, संस्कृती, वारसा यांच्या नावाने गळे काढून परंपरेचेही गुणगान करीत अभिमान बाळगणाऱ्या सर्व भारतीयांसाठी ही निराशेची बाब आहे. (शांग्रिला ही ब्रिटिश लेखक जेम्स हिल्टन यांच्या लॉस्ट होरायझन या कादंबरीतील स्वर्गासमान काल्पनिक भूमी आहे; पण सिंगापूर येथे इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज या संस्थेच्या वतीने काही देशांच्या प्रमुखांची उपस्थिती असलेला जो परिसंवाद आयोजित केला जातो तो ‘हॉटेल शांग्रिला’मध्ये होतो त्यामुळे त्याला ‘शांग्रिला संवाद’ म्हणूनच ओळखले जाते.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाशी संपर्क साधण्याची जी मोहीम सरकार आल्यापासून चालवली त्याकडे सगळ्या जगाचे लक्ष वेधले गेले, हे मी नाकारत नाही. अलीकडेच त्यांनी सिंगापूरच्या शांग्रिला संवादात प्रभावी असे भाषण केले. अतिशय आखीवरेखीव ते भाषण होते यात शंका नाही. त्यातील अनेक परिच्छेद हे त्यातील अवतरणांसह मुळातून वाचण्यासारखे आहेत.

देशात विविधता

भाषणात सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणतात : ‘‘जेव्हा काही देश तत्त्वांच्या बाजूने उभे राहतात, सत्तेच्या किंवा इतर प्रलोभनांना बळी पडत नाहीत तेव्हा त्यांना जगात सन्मान मिळतो व आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा देशांचा आवाज बुलंद असतो. सिंगापूर हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. जेव्हा स्वदेशात विविधता आणि जगात सर्वसमावेशकता बाळगण्याचे धोरण एखादा देश बाळगतो तेव्हा त्यांचे वेगळे वैशिष्टय़ ठसून जाते.’’

तसे पाहिले तर आपल्या देशात विविधतेची संकल्पना पूर्वीपासून भिनलेली आहे. त्यात धर्म, भाषा, व्यक्तिगत कायदा, संस्कृती, अन्न, पेहराव यात विविधता आहे. त्याच्या जोडीला हेही सत्य आहे, की या विविधतेची खिल्ली उडवून एकसारखेपणाचा आग्रह धरणारे काही शक्तिशाली गट भारतात आहेत. त्यातील काहींच्या मते हे लोक हिंदुस्थानात राहतात ते हिंदूच आहेत. इतिहासाचे पुनर्लेखनही ही मंडळी करून टाकतात. आपण कुठल्या श्रद्धा, संकल्पना मानतो हे तर ते सांगतातच, पण इतरांनाही त्याच साच्यात बंदिस्त करण्याचा त्यांचा अट्टहास आहे. त्यांना देशात केवळ नागरी कायदाच नव्हे तर आहार सवयी, पोशाखाचे नियम आणि भाषासुद्धा ‘समान’च- किंबहुना हे सारे एकाच प्रकारचे- हवे आहे. बाहेर जाऊन आपल्या देशाचे पंतप्रधान विविधता आपलीशी करण्याचे प्रवचन देतात, जगातील नेतेही ते ऐकतात; पण नंतर उत्तर प्रदेशातील दादरीत मांस बाळगल्याच्या संशयातून महंमद अखलाकचा ठेचून खून, राजस्थानातील अल्वरमधील पेहलू खानला ठार केल्याची  घटना, गुजरातमधील ऊना येथे दलित तरुणांना केलेली मारहाण, महाराष्ट्रात भीमा कोरेगावला दलित समुदायाबाबत घडलेली घटना असे सगळे त्यांच्या कानावर येते. या परिस्थितीत या नेत्यांच्या मनात भारताविषयी मग अविश्वास व गोंधळाची स्थिती निर्माण होते. काही दिवसांपूर्वीच झारखंडमधील गोड्डा जिल्ह्य़ात दुल्लू येथे दोन मुस्लिमांना गुरे चोरण्याच्या संशयावरून ठेचून मारल्याची घटना ताजी आहे. दलित मुलांना महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्य़ात वाकडी येथे केवळ ते विहिरीत पोहायला गेले म्हणून नग्न करून काढलेली धिंड व केलेली मारहाण यांसारख्या घटना जेव्हा जगासमोर येतात तेव्हा आपले पंतप्रधान जगातील नेत्यांपुढे ज्या विविधतेचे गोडवे गातात ती हीच का, असा प्रश्न पडतो.

पंतप्रधान मोदी आर्थिक संबंधांबाबत सिंगापूरच्या संवादात काय म्हणाले आहेत पाहा. ते म्हणाले, ‘‘आमच्या देशाचीच गोष्ट सांगायची तर भारताचे या भागाशी चांगले संबंध तर आहेतच पण आर्थिक व संरक्षण सहकार्याची त्याला जोड आहे. इतर कुठल्याही देशापेक्षा या भागाशी आमचे सर्वाधिक व्यापार करार आहेत.’’

निर्यात-आयातीत मात्र नापास

या प्रदेशातील देशांबरोबर आपण करार किती प्रमाणात केले आहेत? करार केले असतील तर त्यांचा उद्देश काय आहे?  सार्क देशांशी भारताचा असलेला व्यापार आणि आसियान देशांशी होणारा व्यापार रेंगाळलेला का आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण यातून शोधण्याचा प्रयत्न केला तर वेगळेच चित्र दिसते. २०१३-१४ व २०१७-१८ मध्ये सार्क देशांशी आपला व्यापार अनुक्रमे २० अब्ज डॉलर्स, तसेच २६ अब्ज डॉलर्स होता. भारताचा सर्व देशांशी जो व्यापार आहे त्याच्या तुलनेत हे दोनही आकडे २.६ टक्के व ३.४ टक्के व्यापार सार्क देशांशी असल्याचे दाखवतात. आसियान देशांशी व्यापाराचा विचार करायचा म्हटला तर असे दिसते, की या दोन वर्षांत अनुक्रमे ७४ अब्ज डॉलर्स (९.७ टक्के) व ८१ अब्ज डॉलर्स (१०.५ टक्के) इतक्या प्रमाणात भारताचा आसियान देशांबरोबरचा व्यापार होता. त्यामुळे गेल्या चार वर्षांत आसियान व सार्क देशांशी आपला व्यापार लक्षणीयरीत्या वाढल्याचे कुठेही दिसून येत नाही.

शांग्रिला संवादात पंतप्रधान भारताच्या आर्थिक वाढीबाबत म्हणाले, ‘‘आम्ही दरवर्षी आर्थिक वाढीचा दर साडेसात ते आठ टक्के राखण्याचा प्रयत्न करू , आमची अर्थव्यवस्था जशी वाढत जाईल तसे जागतिक व प्रादेशिक व्यापारातील एकात्मीकरणही वाढत जाईल. आमच्या देशात ८० कोटी युवक आहेत, त्यामुळे केवळ अर्थव्यवस्थेचा आकार वाढवून भवितव्य सुधारणार नाही तर जागतिक पातळीवरील व्यापारातही भारताचा सखोल सहभाग असला पाहिजे याची आम्हाला जाणीव आहे.’’

पंतप्रधान अगदी बरोबर बोलले, पण सरकारची निर्यात, उत्पादन वाढ व रोजगारनिर्मितीत प्रगती नगण्य आहे. भारताच्या जागतिक भागीदारीचा खरा मापदंड हा व्यापार हा आहे. सरकार या चाचणीत नापास झाले आहे. गेल्या चार वर्षांत निर्यातवाढ ऋण (उणे) आहे. भारतातून होणारी निर्यात ३१५ अब्ज डॉलरवरून आता ३०३ अब्ज डॉलपर्यंत खाली घसरली आहे. आयात ४५० अब्ज डॉलर्सची होती ती आता ४६५ अब्ज डॉलर्स झाली आहे म्हणजे ती फार वाढली नाही. कुठलाही देश हा निर्यातवाढीशिवाय उत्पादन क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाही. त्यामुळे उत्पादन व निर्यात क्षेत्रातील वाढीत अपयश आले आहे हे दिसतेच आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (जीडीपी) किंवा आर्थिक विकास दराचे (ग्रोथ रेट) कोणतेही आकडे सरकारने लोकांपुढे फेकले असले तरी त्यावर विश्वास बसणे कठीण आहे. सन २०१५-१६ मध्ये आर्थिक विकास दर ८.२ टक्के होता तो २०१७-१८ मध्ये ६.७ टक्के इतका घसरलेला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

शहाणपणाचा मार्ग

त्यानंतर पंतप्रधानांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत शब्द निवडून काळजीपूर्वक भाष्य केले. पण ते शब्द खरे तर भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन करण्यास जास्त उपयुक्त ठरतील असे मला वाटते.

पंतप्रधान म्हणाले, ‘‘भविष्य जरा अनिश्चित वाटते आहे. जरी आपली मोठी प्रगती झाली असे वाटत असले तरी आपण अनिश्चिततेच्या सीमारेषेवर आहोत. काही प्रश्न अनुत्तरित आहेत. काही तंटे सुटलेले नाहीत. काही दावे, प्रतिदावे आहेत, स्पर्धात्मक प्रारूपे आहेत, एकमेकांना छेद देणारे दृष्टिकोन आहेत, त्याचा निवाडा करणे कठीण आहे.’’

पंतप्रधानांचे वरील विधान वेगळ्या म्हणजे जागतिक संदर्भात असले तरी ते आपल्या देशातील परिस्थितीला अगदी चपखल लागू पडते. पंतप्रधान शेवटी म्हणाले ते या दृष्टीने अधिक महत्त्वाचे. ते म्हणाले, ‘‘आम्ही वेदांताच्या तत्त्वज्ञानाचे वारसदार आहोत. आमचा सर्वासाठी मुक्ततेच्या तत्त्वावर विश्वास आहे. आम्ही विविधतेत एकता अनुभवतो आहोत, साजरी करतो आहोत. सत्य एकच आहे, ते आमच्या संस्कृतीचे पायाभूत अंग आहे. त्यात विविधता, सहअस्तित्व, खुलेपणा व संवाद यांना महत्त्व आहे.

यात शहाणपणाचा एक मार्ग आहे, तो आपल्याला उच्च उद्दिष्टाप्रति घेऊन जातो. संकुचित हिताच्या दृष्टिकोनातून बाहेर पडणे, जर आपण सगळे समान पातळीवर काम करणार असू तर एकमेकांचे हित कशात आहे हे जाणून घेऊन त्या दिशेने काम करीत पुढे जाणे, हा तो शहाणपणाचा मार्ग दिसतो आहे.’’

पंतप्रधानांनी जी शब्दांची गुंफण केली आहे ती लाजवाबच आहे यात शंका नाही. फक्त ते शब्द जर मायदेशातील संस्था-संघटनांना उद्देशून वापरले असते तर अधिक च योग्य झाले असते असे मला वाटते. हेच शब्द त्यांनी शहाणपणाच्या मार्गावरून भरकटलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना, हनुमान सेना, सडकसख्याहरीविरोधी पथके (अँटी रोमियो स्क्वाड), अभाविप तसेच भाजपचे काही मंत्री, अनेक खासदार आणि बरेच आमदार यांच्यापुढे वापरले असते तर अधिकच योग्य ठरले असते.

त्यामुळे पंतप्रधानांनी शांग्रिला नामक हॉटेलात जसे छान भाषण दिले तसेच भारतातही द्यावे, म्हणजे आपल्या देशातील वास्तवावर प्रकाश पडेल, ही माझी छोटीशी अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN

Story img Loader