भ्रष्टाचाराचे आरोपसत्र न्यायालयात सिद्ध झाले, उच्च न्यायालयाने ते फेटाळले तरीही सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या त्रुटी दाखवून देऊन जयललिता, शशिकला व शशिकला यांचे सगेसोयरे यांना दोषीच ठरविले. शशिकला यांना चार वर्षे कैदेत काढावीच लागणार आणि त्याहीपुढे निवडणूकबंदी भोगावी लागणार.. इतके होऊनही त्यांचेच नेतृत्व स्वीकारण्याइतके तामिळनाडूचे लोक बेगुमान – किंवा क्षमाशील – नक्कीच नाहीत..

डी मॉर्टियस निल निसि बॉनम (मृतांबद्दल चांगल्याखेरीज काहीही बोलू नये) या लॅटिन विधिवाक्याला अनुसरून अखिल भारतीय अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाबद्दल लिहिण्याआधीच एक स्पष्ट करतो : जयललिता या व्यक्तीचे दोषदिग्दर्शन वा न्यूनदर्शन आदी न करता, येथे केवळ गेल्या २५ वर्षांतला घटनाक्रम मांडलेला आहे, हे वाचकांनीही लक्षात घ्यावे.

kidnap attempt of girl Lonavala, girl ,
लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न; अपहरणकर्त्याला पालकांनी दिला चोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
australian open 2025 novak djokovic defeats indian origin teen sensation nishesh basavareddy
तारांकितांची अपेक्षित सुरुवात; जोकोविचची भारतीय वंशाच्या निशेषवर मात; सिन्नेर, अल्कराझचेही यश
Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी मूळच्या ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ (द्रमुक) या पक्षातून फुटून अ. भा. अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णाद्रमुक) या पक्षाची स्थापना १९७२ साली केली. एमजीआर यांनी १९७७, १९८० तसेच १९८४ या सर्व वेळी मुख्यमंत्रिपद मिळविले, ते तहहयात. त्यांनी जयललितांना निवडून, त्यांना तयार केले होते. एमजीआर यांच्या मृत्यूनंतर अण्णाद्रमुकमध्येही फूट पडली. १९८९च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, पण जयललितांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा संघटित झाला. लवकरच जयललितांनी पक्षावर पूर्ण पकड मिळवली आणि हा पक्ष त्यानंतर, एका व्यक्तीला देवता मानणारा पक्ष म्हणून व्यक्तिपूजक मार्गाने वाटचाल करू लागला.

पहिल्या कारकीर्दीत कीर्तिऱ्हास

जयललितांची मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदा निवड झाली, ती १९९१ सालात. या पहिल्या कारकीर्दीत (१९९१-९६) जयललितांसह त्यांच्या साथीदारांनी (श्रीमती व्ही. के. शशिकला आणि अन्य) भ्रष्ट आणि अवैध मार्गाने भरपूर माया जमविण्याचा अत्यंत निसरडा मार्ग अवलंबिला होता. त्याहीनंतर जयललिता तीनदा (२००१, २०११ आणि २०१६) मुख्यमंत्रिपदी निवडल्या गेल्या आणि अगदी मृत्यूपर्यंत त्यांना लोकांचा पाठिंबा मोठय़ाच प्रमाणावर होता हे जरी खरे असले, तरी त्यांच्या पक्षाची (अण्णाद्रमुकची) प्रतिमा मात्र मलिन होत गेली. हा कीर्तिऱ्हास हळूहळू झाला असला, तरी तो कधीही भरून न येणारा ठरतो. एमजीआर यांनी स्थापन केलेला पक्ष आता उरलाच नाही.

जयललिता व इतर संबंधितांवर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जो ‘उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविल्या’च्या आरोपाखालील खटला चालला, तोही याच पहिल्या कारकीर्दीच्या- म्हणजे १९९१ ते ९६ या कालखंडातील आहे. जयललितांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कारकीर्दीत, त्यांच्यावरील खटले अल्पजीवी ठरले किंवा चालण्याऐवजी पडलेच. प्रमाणाबाहेर संपत्ती जमविल्याचा खटला मात्र सुरूच राहिला. अन्य काही खटलेही तग धरून राहिले. यापैकी एकाही खटल्यापायी किंवा त्या खटल्यांमध्ये वेळोवेळी मिळालेल्या कायदेशीर चपराकींपायी शशिकला किंवा त्यांचे साथीदार जराही विचलित झाल्याचे दिसलेले नाही. उलट या मंडळींनी, जयललितांच्या दुसऱ्या व तिसऱ्या कारकीर्दीतही संपत्ती जमविणे सुरूच ठेवले. आश्चर्य याचेच की, जिथून आपण कधीही सुखरूप किंवा धड बाहेर निघू शकणार नाही अशा खोल गर्तेत आपल्याला हळूहळू ढकलण्याचेच प्रकार सुरू आहेत, याची जाणीवच जयललिता यांच्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीलाही कशी झाली नाही. जयललिता यांचे ज्या प्रचंड जनसमुदायावर अधिराज्य होते, त्याच प्रचंड जनसमुदायाच्या मौनामध्ये शशिकला आणि मंडळींबद्दलचा द्वेषही दडलेला होता. लोक एकाच वेळी असे कसे वागत आहेत, हे काही राजकीय विश्लेषकांनी त्या वेळी नोंदवलेलेही आहे.

जयललितांचा मृत्यू ५ डिसेंबर २०१६ या तारखेस झाला. सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी २०१७ रोजी, अवाच्या सवा उत्पन्नाच्या खटल्यात शशिकला व अन्य दोघे दोषीच असल्याने त्यांना कैद सुनावणारा सत्र न्यायालयाचा मूळ निकाल योग्यच आहे, असा निर्णय दिला. यामुळे शशिकला व त्यांच्या दोघा साथीदारांना तुरुंगात जावेच लागले. दिवंगत जयललितांवरील कैदेची नामुष्की टळली. अण्णाद्रमुकच्या, आज एकमेकांविरुद्ध रिंगणात असलेल्या दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मर्म आणि गांभीर्य कळलेलेच नाही, असे दिसते. एक गट या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करतो आहे. त्यांना हे कोण सांगणार की प्रत्यक्षात हाच निकाल जयललितांनाही दोषी ठरवणारा आहे! दुसरा गट याच निकालाचे महत्त्व बेगुमानपणे फेटाळण्यात धन्यता मानतो आहे. त्यांनाही, तुम्ही परवाच तुमच्या पक्षनेत्या म्हणून निवडलेल्या व्यक्तीला पुढील चार वर्षे कैदेत काढावी लागणार आहेत, हे कुणीसे सांगायला हवे. असो. तामिळनाडूचे सामान्य लोक मात्र, इतके बेगुमान किंवा एवढे क्षमाशील नक्कीच नव्हेत.

प्रचंड महत्त्वाकांक्षा

आता जयललितांच्या निधनानंतर, अण्णाद्रमुक पक्षाची वाटचाल पुन्हा आत्मऱ्हासमय परिवर्तनाच्या दिशेने सुरू झाली आहे. काही दिवसांपुरती तजवीज म्हणून या शशिकलांना पक्षाचे सरचिटणीसपद आणि ओ. पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपद अशी तकलादू वाटणी या पक्षाने केली; परंतु अनेकांना अंदाज होता तसेच घडले आणि काही दिवसांतच शशिकला व त्यांचे कुटुंबीय यांच्या प्रचंड महत्त्वाकांक्षेपुढे ही तजवीज तग धरू शकली नाही. केवळ पक्षनेतेपद हे ध्येय नव्हेच, तर सरकारवर ताबा मिळविणे हेच ध्येय, अशा प्रकारे नव्या नेत्यांची पावले पडली.

ही पावले धाष्टर्य़ाची खरी; पण जो अविचारी अगोचरपणा शशिकला यांच्या गटाने १९९६ पासून चालूच ठेवलेला होता, त्यास शोभणारी अशीच होत. महत्त्वाकांक्षेचा बकासुरगाडा फिरवल्यागत आधी पक्षाच्या सरचिटणीसपदी आणि लगोलग काही दिवसांत अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरदेखील स्वत:ची निवड करवून घेतली गेली, तेव्हा शशिकला यांच्या महत्त्वाकांक्षेचे खरे रूप उघड झाले आणि लोक शशिकलांच्या बाजूचे नाहीत, हेही स्पष्ट होत राहिले. समाजमाध्यमांवर तर नापसंतीचा डोंब उसळला; परंतु शशिकला यांचे वावरणे असे की, जणू त्यांना याची ना माहिती.. किंवा त्याहून वाईट म्हणजे, ना पर्वा.

अण्णाद्रमुकमध्ये फूट पडली, ती आधी आडवी.. म्हणजे बहुसंख्येने लोकांनी – विशेषत: गरीब, निम्न मध्यमवर्गीय आणि महिला यांनी- अगदी उघडपणे नव्या नेत्यांबद्दल नापसंती व्यक्त केली. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भ्रमनिरासच झाला आणि ते खिन्न, निरस होऊन बसले. पक्षाचे आमदार आणि अन्य पदाधिकारी मात्र, जणू दासदासींइतक्या आज्ञाधारकपणे शशिकला यांचा शब्द झेलू लागले होते.

शेवटाची सुरुवात..

आता तर उभी फूटदेखील अण्णाद्रमुकमध्ये पडू शकते, अशी स्थिती आहे. पक्षाच्या आमदारांनी शशिकला यांच्या तावडीतून सुटका करून घेतली नाही किंवा ते त्यात कमी पडले, तर जरी ई. के. पलानीस्वामींचे बहुमत सिद्ध झाले तरीही पक्ष/सरकार आणि लोक यांच्यामधील विसंवादाची दरी रुंदावतच राहील. याबाबतीत मिळालेले पूर्वसंकेत तरी अजिबात आशादायी नाहीत. कैदेची शिक्षा भोगण्यासाठी बेंगळुरूकडे प्रयाण करण्याच्या अगदी आधीच शशिकला यांनी स्वत:च्या दोघा पुतण्यांना (दिनकरन् आणि व्यंकटेश – ज्यांना जयललितांनीच पक्षातून काढून टाकले होते, त्यांना) पुन्हा पक्षात घेतले आणि त्यापैकी एकाकडे (दिनकरन्) आपल्या अनुपस्थितीत पक्ष चालविण्यासाठी ‘पक्षाचे उप-सरचिटणीस’ हे पदही दिले.

मुळात, पुढली तब्बल चार वर्षे आपण तुरुंगात बसून पक्षही चालवू शकतो आणि सरकारसुद्धा, असा जो विश्वास शशिकला यांना आहे, तोच कोणासही आश्चर्याने थक्क करणारा ठरावा. तामिळनाडूतील लोक आणि अण्णाद्रमुक हा पक्ष यांच्यातील विसंवाद चिघळणार, अंतर वाढणार यावर शशिकला यांच्या ताज्या खेळींमुळे शिक्कामोर्तबच झालेले आहे. तामिळनाडूतील सर्वाधिक अपमान किंवा द्वेषास पात्र ठरलेली व्यक्ती म्हणजे शशिकला, असे कदाचित म्हणता येईल. अण्णाद्रमुक हा पक्ष त्याच्या स्थापनेनंतरच्या चव्वेचाळिसाव्या वर्षांतच अखेरच्या आचक्यांच्या दिशेने घरंगळत चालला आहे. चव्वेचाळीस वर्षांपूर्वी ‘भ्रष्टाचार विरोधा’साठी अण्णाद्रमुकची स्थापना झाली होती.. तोच पक्ष, तिसऱ्या (आणि अखेरच्या) सर्वोच्च नेत्याच्याच भ्रष्टाचारामुळे गाडला गेला, तर त्याला ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ यापरते काय म्हणावे?

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in  

ट्विटर : @Pchidambaram_IN

Story img Loader