|| पी. चिदम्बरम

कणखर नेतृत्व म्हणून ज्यांची भलामण केली जाते, ते अखेर हुकूमशाही प्रवृत्तीकडेच वळतात हा अनुभव आहे. अशा वेळी सज्जन नेतृत्वाचे महत्त्व पटते..

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?

आयुष्यातला कठीण काळ सुरू असतो तेव्हाच कणखर लोक कामाला लागतात (व्हेन द गोइंग गेट्स टफ, द टफ गेट गोइंग), अशा आशयाची अमेरिकन म्हण आहे.

‘कणखर’ म्हणजे काय असा प्रश्न मला नेहमीच पडतो. वेगवेगळय़ा संदर्भात या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. ‘कणखर’ या शब्दाचा दृढनिश्चयी हा एक अर्थ असू शकतो; किंवा खडतर त्रास सहन करण्याची क्षमता असाही अर्थ असू शकतो. अवघड (एखाद्या अवघड खेळासारखा); किंवा टणक (एक कठीण कवचासारखा) यालाही कणखर म्हणता येईल. ‘कणखर’चा एक अर्थ गुंडगिरी करणारा दादा किंवा धसमुसळी आणि हिंसक व्यक्ती असादेखील होतो.

मुक्तिदाता ते हुकूमशहा

सहसा, लोकशाही पद्धतीने निवडून आलेला नेता, दीर्घ काळ सत्ता उपभोगल्यानंतर पायउतार व्हायला नाखूश असतो. तो दिवसेंदिवस अधिकाधिक हुकूमशहा होत जातो. माझ्या जन्मापूर्वीच्या काळात हिटलर हा अशा प्रकारचा नेता होता. मी मोठा झालो त्या काळात क्वामे एनक्रुमा, जोसेफ ब्रोझ टिटो, गमाल अब्देल नासेर आणि सुकार्नो हे सगळे जवाहरलाल नेहरू यांचे जवळचे मित्र ‘जनतेचे मुक्तिदाते’ होते.. पण मुक्तिदात्यांपासून ते हुकूमशहांपर्यंतचा या नेहरूमित्रांचा प्रवास मला निराश करणारा होता. या प्रत्येकाने आपल्या देशाच्या मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कणखरपणे केले, ते लोकमताने निवडून आले, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले, पण शेवटी त्यांचे रूपांतर ‘हुकूमशहा’मध्ये झाले आणि त्यांनी आपला वारसा आणि लोकशाही या दोन्ही गोष्टी पायदळी तुडवल्या.

पंचशील करारावर स्वाक्षरी करणारे जवाहरलाल नेहरू हे या सगळय़ांमध्ये एकमेव अपवाद होते. ते देशाचे पंतप्रधान असतानाच्या काळातल्या म्हणजे १९५२, १९५७ आणि १९६२ – या वर्षांमधली प्रत्येक लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थाने लोकशाही निवडणूक होती. त्यांची निवडणूक भाषणे लोकशाहीचे धडे देणारी होती. प्रचारसभेतले त्यांचे भाषण ऐकायला जमलेल्या बहुसंख्य लोकांना इंग्रजी (दक्षिण भारतात ते हिंदी वापरत नसत) समजत नसे, पण नेहरू आपल्या भाषणात लोकशाही, धर्मनिरपेक्षता, राष्ट्र उभारणी, गरिबीनिर्मूलन, सरकारची भूमिका आदींबद्दल बोलत असल्याचे लोकांना समजत असे. नेहरू हे कायमच लोकप्रिय नेते होते, लोकांनी त्यांच्यावर कायमच मनापासून प्रेम केले. मुख्य म्हणजे नेहरू कधीच ‘हुकूमशहा’ झाले नाहीत.

 सध्याच्या जगात असे हुकूमशहा असलेले नेते भरपूर आहेत. आजच्या काळात खरोखरच मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक झाली तर ज्यांच्यापैकी कोणीही निवडून येणार नाही, अशा नेत्यांमध्ये आहेत ब्राझीलचे याइर बोल्सोनारो, तुर्कीचे रेसेप तयिप एर्दोगन, इजिप्तचे अब्दुल अल-सिसी, हंगेरीचे व्हिक्टर ऑर्बन, बेलारूसचे अलेक्झांडर लुकाशेन्को, उत्तर कोरियाचे किम जोंग-उन आणि आणखीही असेच डझनभर नेते. एका आकडेवारीनुसार जगातील एकूण ५२ देशांमधल्या सरकारांचे वर्णन हुकूमशाही असे केले जाऊ शकते. हे नेते जास्तीत जास्त त्यांच्या देशात किंवा त्यांच्या खंडात ओळखले जातात. त्याबाहेर त्यांना कुणीही ओळखत नाही. व्लादिमीर पुतिन यांची मात्र स्वत:ची अशी एक ओळख आहे. क्षी जिनिपग यांचेही तसेच आहे. दोघेही ‘हुकूमशहा’ आहेत. आपण हयात असू तोपर्यंत आपणच सत्ताधीश असायला हवे ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

मी हे लिहीत असताना रशियाच्या हुकूमशहा नेत्याने, पुतिनने असहाय युक्रेनवर रॉकेट आणि बॉम्बचा वर्षांव सुरू केला आहे.

मोदींना ‘कणखर’चेच कौतुक

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी ‘कणखर’ नेतृत्व निवडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. बहराइचमधील एका प्रचारसभेत मोदी म्हणाले, ‘‘जगात सर्वत्र अशांतता असते, गोंधळ माजलेला असतो, तेव्हा भारताला अधिक सामर्थ्यवान बनण्याची गरज असते आणि अशा कठीण काळात मजबूत नेत्याची गरज असते’’ (इकॉनॉमिक टाइम्स, फेब्रुवारी २३, २०२२). योगायोगाची गोष्ट म्हणजे, निती आयोगानुसार, उत्तर प्रदेशमधील ज्या तीन जिल्ह्यांमध्ये गरिबीचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे, त्यामधला बहराइच हा एक जिल्हा आहे.

मोदींना उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते आदित्यनाथ हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसावेत असे वाटत आहे, हे उघड आहे कारण आदित्यनाथ हे मोदी यांच्या अपेक्षेनुसार या ‘कठीण’ काळात आवश्यक असलेले ‘कणखर’ नेते आहेत. आदित्यनाथ यांना ‘कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी’ करायची आहे आणि त्यांना या कामात कुणीही विरोध केलेला चालत नाही. त्यांच्या राज्यात ‘चकमकी’ अधिकृत आहेत. गुन्हेगाराला न्यायालयासमोर उभे करून न्यायदानाची प्रक्रिया होऊन मग शिक्षा देण्याची गरज नाही, त्याला ‘चकमकीत’ मारले की झाले. अधिकृत आकडेवारीच देणाऱ्या ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका बातमीनुसार (१३ जुलै २०२१), मार्च २०१७ ते जून २०२१ दरम्यान, १३९ गुन्हेगार पोलीस चकमकीत मारले गेले आणि ३,१९६ जखमी झाले.

‘बुलडोझर’ हा आदित्यनाथ यांचा आवडता शब्द आहे. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी, सुलतानपूर जिल्ह्यातील कारका बाजार येथे एका सभेत बोलताना आदित्यनाथ म्हणाले, ‘‘एक्स्प्रेस हायवे बनवणे आणि माफिया व गुन्हेगारांचा बंदोबस्त करणे अशी दोन्ही कामे एकाच वेळी करणारे बुलडोझर हे मशीन आम्ही विकसित केले आहे. मी इथे येत असताना मला चार बुलडोझर दिसले. मला वाटते इथे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. आम्ही प्रत्येक मतदारसंघात एक एक बुलडोझर पाठवू, मग सगळय़ा गोष्टी नीट पार पडतील’’ (इंडिया टुडे). उत्तर प्रदेशात, एखादी इमारत जमीनदोस्त करण्याचे काम असो की त्या इमारतीत (तथाकथित बेकायदा) राहणाऱ्या रहिवाशांना तिथून हाकलून लावण्याचे काम असो, त्यासाठी बुलडोझर वापरायला, न्यायालयाच्या आदेशांची किंवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची गरज लागत नाही.

आदित्यनाथ यांचे वागणे इतके हुकूमशाही आहे की हाथरस बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाची बातमी करण्यासाठी तिथे गेलेल्या सिद्दीक कप्पन या केरळमधील पत्रकाराला ५ ऑक्टोबर २०२० पासून उत्तर प्रदेशातील तुरुंगामध्ये डांबण्यात आले. ‘द वायर’ने दिलेल्या बातमीनुसार, आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तर प्रदेशात एकूण १२ पत्रकारांची हत्या करण्यात आली. ४८ पत्रकारांवर शारीरिक हल्ले झाले आहेत. ६६ जणांवर विविध आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे किंवा त्यांना अटक करण्यात आली आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण २० टक्के आहे. असे असले तरी या हुकूमशहा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एकूण ४०३ मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले जाऊ नये, यासाठी आपल्या पक्षाचे मन वळवले.

असल्या हुकूमशहा नेत्याच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश हे राज्य अधिकच गरीब झाले आहे. तिथले लोकही आणखी गरीब झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या कर्जामध्ये ४० टक्क्यांची भर पडून आता त्या कर्जाची रक्कम  ६,६२,८९१ कोटी रुपये एवढी प्रचंड झाली आहे.

सज्जन आणि शहाणे

माझ्या मते सज्जन नेते सर्वोत्तम असतात. त्यांच्यामध्ये एक शहाणीव असते. ते सौम्यपणे बोलतात, लोकांचे ऐकतात, संस्थात्मक रचनेचा आणि कायद्याच्या यंत्रणेचा आदर करतात. देशातील सामाजिक, सांस्कृतिक वैविध्याचे त्यांना भान असते. ते लोकांमध्ये सामंजस्य असावे, निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांची कारकीर्द संपते तेव्हा शांतपणे तिथून बाहेर पडतात. लोकांच्या जीवनात गुणात्मक फरक पडावा यासाठी आपण काम केले पाहिजे याची त्यांना जाण असते. सामान्य लोकांना रोजगार मिळेल, मुलांना उत्तम शिक्षण मिळेल, लोकांना उत्तम आरोग्य सेवा मिळतील यावर अशा सज्जन नेत्यांचा भर असतो. ते नेहमीच युद्धविरोधी भूमिका घेतात. हवामान बदलाच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना ते तोंड देतात. जगात असे नेते होते आणि आजही आहेत. नेल्सन मंडेला हे अशा अतुलनीय नेत्यांपैकी एक होते. जर्मनीच्या माजी राष्ट्राध्यक्ष अँगेला मर्केल यांचेही नाव या संदर्भात घेता येईल.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये तेथील मतदार आपला नेता म्हणून कुणाला निवडून देतील, ते मला माहीत नाही. मी यापैकी कोणत्याही राज्यातील मतदार असतो तर मी ‘कणखर’ वा मजबूत अशी भलामण होणाऱ्या हुकूमशाही नेत्यापेक्षा सभ्य आणि शहाण्या नेत्याला माझे मत दिले असते.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in 

ट्विटर :  @Pchidambaram_IN

Story img Loader