अध्यात्माचा आधार मिळाला, की मन खंबीर होते; आणि कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची शक्ती मनाला मिळते, असा आपला पिढय़ान पिढय़ांपासूनचा अनुभवसिद्ध विश्वास आहे. पण प्रत्येक सामान्य, संसारी माणसाला अध्यात्माची ती- ब्रह्मानंद देणारी- अवस्था साधता येत नाही.
त्यावरही माणसानं उपाय शोधून काढला आणि मनाला आध्यात्मिक सुखाची अनुभूती देणारं, अलौकिकाशी नातं जोडणारं एक अजोड साधन प्राप्त झालं.. संगीत! कान आणि मन यांचा सुंदर मेळ साधणारे हे साधन म्हणजे, माणसाच्या दैनंदिन जीवनाचा एक अनवट आनंद ठरला. ज्या काळी संगीताचे स्वर्गीय सूर सामान्यांच्या कानापर्यंत पोहोचण्याची साधनं मर्यादित होती, त्या काळातही संगीताचे उपासक आपापल्या परीने असंख्य मनांचे जगणे सुरांच्या सुखद शिंपणीतून आनंदमय करत राहिले.
गेल्या चार पिढय़ांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि त्या धुंदीत विहरणाऱ्या मनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज आपल्याभोवती चांदणे शिंपत आहे, हे आपले परमभाग्य आहे. सहस्रचंद्रदर्शनाची उमेद बाळगणाऱ्या सुराचं नाव, आशा भोसले! त्यांच्या स्वराची रसिकमनावरची जादू वर्षांनुर्वष उंचावतच राहिली. लाडिक, मधाळ स्वभावाचे प्रेमगीत असो, भक्तिरसाने ओथंबलेले भजन असो, पडद्यावरच्या दृश्यांना जिवंतपणा देणारे चित्रपटगीत असो, पाश्चात्त्य संगीतसंस्कृतीची झाक असलेले पॉप-रॉक संगीत असो, विरहव्यथांच्या व्याकुळतेला शब्दरूप देणारी गझल असो.. आपल्या स्वर्गीय सुरांच्या मोहिनीने गीताच्या प्रत्येक शब्दालाच घायाळ करत तो रसिकांच्या मनावर मधाळपणे कोरणारा आशाताईंचा सूर आता ८० वर्षांचा होतोय. हिंदी, मराठी, बंगाली आणि विदेशी गीतांनाही आपल्या स्वरांचा साज चढवून जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या या मराठमोळ्या आवाजाने, अवघे ‘सूरक्षेत्र’ व्यापले.. एवढेच नाही, तर जिथेजिथे या सुरांची शिंपण झाली, तिथेतिथे अक्षरश: चांदणे फुलले.. कॅबरे असो वा कव्वाली, भजन असो वा भांगडा, नाटय़गीत असो वा भावगीत, आशाताईंच्या आवाजाने गीतांचे शब्द आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलले आणि चैतन्याचे बगिचे फुलले. सुरांच्या साहाय्याने केवळ मराठी नव्हे, तर जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आशाताईंच्या ८० व्या वर्षांतही तरुण असलेल्या या स्वराने गायनकला धन्य केली, आणि संगीताला स्वर्गसुख दिले.
मानवी विकासाच्या वाटा विस्तारत चालल्या आणि भौतिकाची वास्तव विचारांशी जवळीक वाढत गेली तसतसा अध्यात्माचा आवाज क्षीण होत गेला असेल; पण संगीत मात्र सर्वकाळ बहरत आणि मनामनावर बरसतच राहिले. कानाशी आणि कानातून मनाशी नातं जोडणाऱ्या, मनाला आणि शरीरालाही ताजेपणा देणाऱ्या संगीताचे सूर हा जगण्याचा एक अविभाज्य भाग होऊन राहिला, संगीताने जगण्याला आनंदाचा अर्थ दिला. शहरी कोलाहलात, जिथे गर्दीला चेहरा नसतो आणि व्यवहाराच्या घाईत चेहऱ्यांची ओळख शून्य ठरते, तिथेदेखील आशाताईंच्या सुरांच्या पंचमलगडी अलगद उलगडू लागल्या की कान जागे होतात, मन खुलू लागते. शरीर ठेका धरू लागतं, आणि या सुरानंदात विहरणारी अनेक मने परस्परांशी जोडली जातात. एखाद्या समेवर एकाच क्षणी दाद देतात, आणि परस्परांपासून वास्तवात दूर असलेल्या त्या मनांचा अव्यक्त संवाद सुरू होतो. सुरांच्या त्या जादूनं मनं जवळ येतात. संगीताची ही शक्ती अध्यात्माइतकीच अलौकिक आहे. म्हणूनच, तीन पिढय़ांना आनंद देणारा त्यांचा सूर आजदेखील तितकाच टवटवीत आहे.
या तीन पिढय़ांची जीवनमूल्ये आपसूक काळाबरोबर बदलत गेली असे आपण आज म्हणतो. परंपरांचा अपमान न करता नवेपणा शोधणारी पिढी, आनंदाचे नवे मार्ग शोधताना स्वत:मध्ये रममाण होऊन परंपरेपेक्षा भावनांचा आदर करणारी पिढी आणि शारीरिक पातळीवरल्या- भौतिक- आनंदात आदर वगैरे मोजपट्टय़ा हव्याच कशाला, असे मानणारी पिढी.. अशा तीन पिढय़ा आशाताईंच्या गळय़ात एकाच वेळी नांदतात. आशाताईंचा आवाज घरंदाज, भाववाही आणि मादकही एकाच वेळी आहे. मानवी भावभावनांच्या सर्व स्तरांवर हा सूर सहजतेनं फिरला. केवळ पारंपरिक वाद्ये आणि कंठस्वरांच्या सुंदर मिलाफातून भक्तिरसाने ओथंबलेले ‘कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु’सारखे शब्द आशाताईंच्या मुखातून परमार्थाशी नातं जोडतात. निखळ सांगीतिक आनंद देऊन निव्वळ सुरांमधून शारीर लालसेची अनुभूती ‘हुस्न के लाखों रंग..’सारखी नृत्यगीतं देतात. तर, ‘मेरा कुछ सामान..’ मधून भावकवितेचा तरल अनुभव किती जवळचा असू शकतो याचं भान आपल्याला अल्वारपणे येतं.
 संगीत आणि जगणे हातात हात घालूनच वाटचाल करत राहते.. जगण्याचे हे विविधांगी भान हिंदी चित्रपटसृष्टीने गाण्यांमधून खुलवले, वाढवले. सर्वसामान्यांच्या मनातल्या अनेक अव्यक्त भावभावना सुरांच्या साथीनेच व्यक्त झाल्या, तेव्हा गीतकार-संगीतकाराला त्या त्या वेळी दाद देता देता, एकेका आवाजाची खासियत मात्र सतत ऐकणाऱ्यांची सोबत करत राहिली. चित्रपटसृष्टीतले हेवेदावे एकेकाळी एखाद्या सुराचा घात करत, पुढे मार्केटचे हिशेब हीच खलनायकी करत राहिले. पण आशाताईंचा आवाज हे सारे बदसूर टाळत राहिला.. सुरांच्या वैविध्याचे मोल ओळखत राहिला. कधी अवखळपणे खोडी काढणारा तर कधी हृदयातली सल बाहेर काढणारा, कधी शृंगाराच्या स्वर्गात गुलछरे उडवणारा तर कधी गझलेच्या काफियांगणिक जीवनाचं गुज गुंजवणारा.. त्याच वेळी संगीताच्या मार्केटला गुंग करून टाकत, हा आवाज थेट ऐकणाऱ्याशी नातं जोडत राहिला.
आता तर संगीत आपल्या प्रत्येक व्यवहारासोबत, अगदी कानाशी येऊन थांबले आहे.. जगणे संगीतमय होऊन गेले. डोक्यावर ओझ्याचा भार वाहणारा कष्टकरी असो, धावपळ करणारा एखादा व्यावसायिक असो, वा एखाद्या वातानुकूलित दालनातल्या कार्यालयात फायलींच्या ढिगाऱ्यात डोके खुपसून काम करणारा बुद्धिजीवी असो.. सूर कानाशी गुंजत असला, की कामाचे कष्ट हलके होतात, हा प्रत्येकाचाच अनुभव असतो.. सुराचे देणे कुणीतरी देत असते, पण तो घेणारे असतात अनेकजण. सूर पक्का असला, तर देणाऱ्या-घेणाऱ्यातला द्वैतभाव संपतो. सुरांचे हे अद्वैत म्हणजे ब्रह्मानंदसहोदर आनंद. कामप्रेरणेपासून ते चांगलं गाणं ऐकण्यापर्यंतच्या अनेक प्रेरणा माणसाला जणू ब्रह्मानंदच मिळाल्याचा आभास देतात. तो आभासही चैतन्याचे झरे जागता ठेवतो.
आशाताईंचा स्वर जिथे बरसला, तिथे चैतन्याचे झरे खळाळू लागले. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या स्वराने असंख्य क्षण फुलविले, आणि फुलवत शकुनाच्या मेंदीने रंगलेले जगण्याचे असंख्य क्षण हसविलेदेखील.. या स्वराचा साज कालातीत आहे. या टवटवीत स्वराचे चांदणे आशाताईंनी असेच शिंपत जावे, आणि बहरलेली मने जेव्हा आत्मानंदात विहरू लागतील, तेव्हा याच स्वरांच्या हिंदोळ्यावर बसवून त्यांना चैतन्याच्या झऱ्याकाठी घेऊन जावे.. भौतिकाचा अतिरेकी आघात असह्य झालेली असंख्य आयुष्ये आशाताईंच्या आवाजाच्या आधाराने आनंदी राहणार आहेत.

Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!