सर्व भूतांच्या बाबतीत समान भावना निर्माण झाली की परमसाम्याचा आरंभ होतो. समत्व साधण्यासाठी देहबुद्धी घालवणे हा मार्ग आहे. प्रश्न उद्भवतो की लौकिक जगात समत्वाची साधना कशी करायची? परंपरा याबाबतीत काही मार्गदर्शन करते की ती केवळ आध्यात्मिक साम्याचाच विचार करते?
परंपरेने दोन्ही प्रकारच्या समत्वाची साधना कशी करायची, याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे. उत्तरोत्तर ही साधना विकसितही झाली आहे. समत्व भावनेचा आदर्श कोणता यासाठी गीताईतील पुढील श्लोक पुरेसा आहे.
शत्रु मित्र उदासीन।
मध्यस्थ परका सखा।
असो साधु असो पापी।
सम पाहे विशेष तो।। (गीताई ६-९)
आता ही अवस्था कशी प्राप्त करायची? भारतीय परंपरेत पुराणांनी लोकशिक्षणात मोठी कामगिरी केली आहे. पुराणांची संख्या १८. त्यांचे कर्तृत्व परंपरेने महर्षी व्यासांकडे दिले आहे. ही पुराणे कशी आहेत याचे विनोबांनी नेमके वर्णन केले आहे.
‘पुराणे म्हणजे पावसाचे पाणी. मुरेल तितके मुरू द्यावे. वाहील तितके वाहू द्यावे.’ पुराणांची अंतिम शिकवण सांगणारे पुढील सुभाषित बोलके आहे.
अष्टादश पुराणानां सारं सारं समुद्धृतम् ।
परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम् ।।
हे, ‘पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा,’ या अभंगाचे मूळ आहे.
आणखी एका अभंगात तुकोबांनी परोपकार, संत आणि या परोपकाराचा मार्गही विशद केला आहे. ‘देह कष्टविती परोपकारे.’ शरीरश्रमाच्या माध्यमातून परोपकार झाला पाहिजे. नुसते दान यापुढे फारसे प्रभावी ठरणार नाही, अशी ही भूमिका आहे. चौथ्या चरणात तर देहबुद्धीला खणखणीत नकार दिला आहे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती।
देह कष्टविती पर उपकारें।
भूतांच्या दया हे भांडवल संता।
आपुली ममता नाही देही ।।
संतांनी दाखविलेली समत्वाची दिशा महाराष्ट्रात किमान तीन शतके विकसित झाली. रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, गाडगेबाबा आणि विनोबा यांनी ही परंपरा सशक्त केली.
सर्वोदयी परंपरेने शरीर परिश्रम व्रताच्या माध्यमातून जनसेवेचा (त्यांनी परोपकार हा शब्दही नाकारला) मोठा आदर्श उभा केला. इथल्या श्रमिकांची उपेक्षा केली म्हणून देश पारतंत्र्यात गेला अशी अचूक मांडणी करत गांधीजींनी आपले सामाजिक दुखणे सांगितले.
यावर उपाय म्हणजे प्रत्येकाने समाजासाठी आवश्यक असणारी कामे करत राहायची. गांधीजींच्या या तत्त्वावर पुढे विनोबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे काम उभे केले ते समाजाच्या कोणत्याही गटाला सहन झाले नाही, इतके जहाल होते. अवहेलना सोसून हा गट समता आणि श्रमता यांची सांगड घालत राहिला.
पुढे विनोबांनी दान मागितले तेही संसाधनाचे होते. भूमी, तिचे दान, यज्ञ, ही परिभाषा पारंपरिक असली तरी तिचा आशय नवा होता. समत्व व श्रमत्वाची जोडणी करण्याचे प्रयत्न किती पुरेसे होते, ते कितपत यशस्वी झाले अशा अनेकविध मुद्दय़ांवर चर्चा होऊ शकते. मात्र गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, सर्वोदय या परंपरने समत्वाची कल्पना विकसित केली हे मान्य करावे लागते.
– अतुल सुलाखेjayjagat24@gmail.com