नितीन अरुण कुलकर्णी
चित्रातलं असो की भूमितीतलं, वर्तुळ पूर्ण होतं तेव्हा ते वर्तुळ होतं.. वर्तुळ काढण्याच्या अनेक अर्धवट/ अपयशी प्रयत्नांचं वर्तुळदेखील, ‘वर्तुळ काढता येणं’ या बिंदूपाशी पूर्ण होतं! या कृतीचा वापर ‘झेन’मध्येही दिसतो..
वर्तुळांनी आपल्याला धारण केलेले आहे. आपण या पृथ्वीवर राहतो, पृथ्वी गोलाकार (स्फिअरिकल) आहे. व स्वत:भोवती तसेच सूर्याभोवती ती वर्तुळाकार फिरते. गुरुत्वाकर्षण, काल, ऋतुचक्र, वेग व आवर्तनं हे सर्व वर्तुळाकाराशी संलग्न आहे. अनेक वर्तुळांची आवर्तनं एकमेकांवर आच्छादित होतात व गोलाकार बनतो. या वर्तुळांची वेगळी अशी, काही संगती लागते का?
लहानपणी आपण सगळ्यांनीच चित्रं काढली आहेत. अगदी काही नाहीतर समुद्रावर किंवा माळरानावर फिरायला गेलेलं असताना हातातली झाडाची लांब काठीसारखी फांदी जमिनीत किंवा वाळूत रुतवून आपण रेघोटय़ा काढल्या होत्या, या सगळ्यात सहजपणे कुठला आकार काढला असेल तर तो होता ‘गोलाकार’! (लेखात यापुढे, वर्तुळाकाराचा उल्लेख गोलाकार असाच करू.)
गोलाकाराचा आविष्कार हा निसर्गात ओतप्रोत भरलेला आहे आणि त्याचमुळे मानवनिर्मित जगातही तो दिसतोच. गोल पुनरावर्ती असतो; तो ऊर्जा, वाढ व गतीचे द्योतक असतो. गोल हा नेहमीच परिणामस्वरूप असतो. तो तत्त्वाचा आकार असतो.
स्वत: न फिरता आपल्याला कागदावर जर वर्तुळ काढायचे असेल तर पेन्सिल धरलेला हात आपल्याला धिम्या गतीने गोल दिशेने (आपली मर्यादादेखील याला कारणीभूत असते, आपला हात सहजपणे गोलच फिरणार) फिरवावा लागतो, क्षणभर स्वत:ला विसरून म्हणजे विचारांऐवजी श्वासांची जाणीव ठेवता ठेवता जर पेन्सिल कागदाच्या जमिनीवर चिकटवली तर अगदी बरोबर असा गोल काढता येतो. आणि त्यातल्या त्यात जर सुरू होणारा बिंदू व तिथेच येऊन थांबणारा बिंदू हलकेच पुढे गेला तर हे वर्तुळ नीट पूर्ण झाल्याचा अनुभव येतो. कारण वर्तुळाचा खरा अर्थ हा ‘बिंदूंतील गुरुत्वातून तयार झालेला अवरोध व त्याविरुद्ध गती व तिचे पुनरावर्तन’ हा आहेच, याची प्रचीती आलेली असते!
फ्रेंच चित्रकर्ती सोनिया डेलॉने (१८८५-१९७९) हिच्या ‘ऑर्फिझम’ या शैलीमधील अमूर्तवादी चित्रांमध्ये वर्तुळांचा वापर जास्त प्रमाणात दिसतो. ‘प्रिझम्स इलेक्ट्रिक्स’ या चित्रामध्ये दोन मोठे रंगांचे गोलाकार एकमेकांवर आच्छादतात, कॅनव्हासचे उर्वरित भाग अर्ध गोलाकार, आयताकृती आणि अंडाकृती आकार, अधिक अमूर्त आणि एकत्र विणलेल्या अशा सर्व प्रकारच्या भौमितिक अशा वेगवेगळ्या आकारांच्या टॅपेस्ट्रीसारख्या गुंतागुंतीच्या संयोजनातून बनतो.
सोनियाच्या कलेवर सामान्य अनुभवांचाही कसा प्रभाव पडत होता हेदेखील या चित्राने स्पष्ट होते. ती आणि तिचा चित्रकार नवरा रॉबर्ट त्या काळात नव्याने लावलेल्या इलेक्ट्रिक लॅम्पलाइटचे सेंट-मिशेल बुलेवार्द या स्थळावर लावलेले खांब बघत जात होते. दोन्ही कलाकारांनी त्यांना दिसलेल्या प्रकाशाची चित्रे काढली. सोनियाने या रंगचित्रात, अर्ध-गोलाकार रंगीबेरंगी रेषा रेखाटल्या आहेत. या सोनियाच्या रंगाच्या गोलाकारांच्या हाताळणीमुळे कॅनव्हासवर पुनरावर्तित प्रकाश दाखवता येऊ शकतो हे कळले.
प्रकाशदेखील एका ऊर्जास्रोताच्या उगमिबदूपासून सुरू होतो आणि गोलाकारात विस्तारत जातो, याची आवर्तने जिथे जाणवतात तिथे वर्तुळांचे छेदलेले आकार दिसतात. याचाच प्रत्यय या चित्रात मिळतो.
गती, प्रकाश, उष्णता, ध्वनी व अवकाश या तत्त्वांच्या साहचर्यातून व भौतिक पदार्थाच्या निर्मितीतून लहरींची आवर्तने तयार होतात आणि ती गोलाकार असतात. या आवर्तनांना कलेमध्ये (चित्रित अथवा) प्रतििबबित करताना मात्र भौमितिक साधनांचा वापर केला जातो. परंतु हे करण्यासाठी आपले शरीरदेखील साधन म्हणून वापरता येते. ध्वनीची आवर्तने साध्या गाण्याच्या आलापीमध्ये आपल्याला जाणवू शकतात. स्वरांचे मूळ ॐकारात असते, ॐकाराचा उच्चार केल्यास आपले स्वरयंत्र, फुप्फुसातला वायू व ध्वनीने कंपन पावतात. या उच्चारात कुशलता आली की ही आवर्तने आपल्या शरीराबाहेरही परावर्तित झालेली दिसू शकतात. जणू काही पुढे पुढे जातात व पृथ्वीच्या गोलापर्यंत व पुढे भेदून अवकाशात विलीन होतात..
..या किंवा अशासारख्या अनेक सूक्ष्म अनुभवांचा अर्थ लावण्याच्या फंदात आपण सहसा पडत नाही. फार फार तर ‘आध्यात्मिक’ वा ‘धार्मिक’ असे संबोधून त्यांना बंद करून ठेवतो. परंतु संकल्पनात्मक विचार करताना असे लक्षात येते की, मानवी शरीर-मानसिक अस्तित्वात वर्तुळात्मकतेचे गोलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात अधोरेखित होत असतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानवी अस्तित्व आणि त्याचे आविष्कार एकमेकात गुंफलेले व परस्परावलंबी आहेत. त्या सर्व घटकांचा असलेला असा सेंद्रिय संबंध शाश्वत आहे. याचा अर्थ असा नव्हे की सर्व घटक नेहमीच अबाधित राहतात, उलट लोप पावणे व निर्माण होणे या दोन्ही घटना एकमेकांवर अवलंबून असतात. मानवाच्या संदर्भातही हेच लागू पडते; पाहिजे ते स्वीकारणे व नको ते त्यागणे याला महत्त्व आहे. आपण जे सोडून दिले ते जर कोणी घेतले नाही तर मात्र घोटाळा आहे. आवर्तनांचा अवरोध झाला की असमतोल तयार होतो. असा असमतोल आज मानवाने पूर्ण पृथ्वीवर केलेला दिसतो. औद्योगिक क्रांतीने आणलेली आर्थिक व्यवस्था अधिकाधिक वस्तूंची निर्मिती व त्या विकण्यास मनात लालसा व ईर्षां तयार करत आहे. याच वेगाने आपण पुढे गेलो तर आपला लवकरच विनाश ओढवेल. तो लांबवायचा असेल तर वर्तुळाचा आधार घ्यायला हवा. ‘सक्र्युलॅरिटी’ (वर्तुळात्मकता) व ‘सक्र्युलर इकॉनॉमी’ची संकल्पना जगात आता जम धरत आहे.
वर्तुळात्मकतेची ही संकल्पना ‘कारण आणि परिणामाच्या क्रमा’चा संदर्भ घेते. यात असे बघितले जाते की जगातले सर्व व्यवहार म्हणजे कारण व परिणामाची शृंखला असते. पहिल्या कडीतला परिणाम दुसऱ्या कडीचे कारण बनते आणि असे जर झाले नाही तर ही साखळी तुटते. या प्रणालीत दुसऱ्या कडीतल्या परिणामातली गडबड सुधारण्यास पहिल्या कडीच्या कारणांकडे परत जायला लागते आणि एकेका गोष्टीची पूर्तता किंवा बदल करायचा प्रयत्न करते. तार्किक निष्कर्ष आणि विचाराला व युक्तिवादाच्या प्रक्रियेला देखील ही तत्त्वे लागू होतात.
औद्योगिक प्रक्रियेत टाकाऊ पदार्थाचे नियोजन करणे आणि प्रक्रियेत तयार होणाऱ्या स्रोतांचा सतत वापर करणे हेसुद्धा, वर्तुळात्मकतेच्या प्रणालीमध्ये येते. पुनर्वापर, समावेश, दुरुस्ती, नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीचे काम केले जाते, संसाधनांचा वापर कमी करणे आणि कचरा, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा या प्रणालीचा प्रमुख उद्देश असतो पण कृती वर्तुळात्मक असते.
‘कचरा’ किंवा ‘काहीही टाकाऊ’ ही संकल्पना बघितली की लक्षात येते की, कचरादेखील एक ‘वस्तू’ किंवा ‘स्रोत’ असते व त्यात कुठली तरी ऊर्जा असते जिचा विनियोग करता येऊ शकतो. सर्व ‘कचरा’ दुसऱ्या प्रक्रियेसाठी ‘अन्न’ (किंवा कच्चा माल) बनला पाहिजे : एक तर औद्योगिक प्रक्रियेसाठी उप-उत्पादन किंवा ऊर्जास्रोत म्हणून किंवा निसर्गासाठी पुनरुत्पादक स्रोत म्हणून. कम्पोस्ट हे त्याचे साधे उदाहरण.
मानसिकतेच्या संदर्भात कम्पोस्ट कसे करता येते? याचा विचारही निकराने करायला हवा. सातत्याने समाजमाध्यमांच्या गराडय़ात राहून, समाजापासून विभक्तच होण्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे. मानसिक आजारांनी उच्चांक गाठलेला असताना ‘भावनिक वर्तुळात्मकता’ कार्यरत कशी करता येईल? याचे उत्तर ‘मानसिक सजगता’ व दुसऱ्यांप्रति करुणा जागृत करण्यातूनच मिळू शकते.
त्यासाठीचा एक उपाय म्हणून ‘एन्सो’कडे पाहणे गरजेचे आहे. ‘एन्सो’ हे झेन-बौद्ध धर्मातील एक पवित्र प्रतीक आहे ज्याचा साधा अर्थ आहे वर्तुळ किंवा कधी कधी मानवी एकोप्याचे मंडळ. हे वर्तुळ केवळ एकाच कुंचल्याचा वापर करून एकाच फटकाऱ्यातून काढले जाते. या कृतीत मनातून मनातल्या अनेक जोखडांमधून स्वत:ला मुक्त केले जाते. हा एक ध्यानाचा प्रकार मानला गेला आहे. ही कृती ब्रशस्ट्रोकमध्ये कोणतेही बदल वा सुधारणा करण्यास परवानगी देत नाही. पहिल्या हालचालीतच ते पूर्ण होते.
एन्सो एखाद्या काळ्या वर्तुळापेक्षा वेगळे काही दिसत नाही, परंतु ते बऱ्याच गोष्टींचे प्रतीक असते. अपूर्णतेतील सौंदर्य, अपेक्षांना सोडून देण्याची कला, जीवनाचे मंडळ आणि संबद्धपणा. एन्सो हे सृष्टीच्या साक्षीने ‘त्या क्षणी’ कलाकाराने (की साधकाने?) अनुभवलेले एक प्रकटीकरण आहे आणि यातच आपल्या अंतर्मनात घेतलेली स्वत:ची स्वीकृती आहे. हे सामर्थ्य, अभिजातपणा आणि एकात्म मनाचे प्रतीक आहे.
स्वत:च्या आध्यात्मिक साधनेसाठी जपानी सुलेखन (कॅलिग्राफी) या आध्यात्मिक अभ्यासाला हिट्सुझेन्दो किंवा ‘ब्रशचा मार्ग’ म्हणतात. जपानी वाबी-साबीचे दोषांना सामावून घेणारे सौंदर्यशास्त्र आहे. मानसिकतेतली वर्तुळात्मकतेची शून्यापर्यंत जाणारी ही संकल्पना पूर्ण मानवजातीला तारून नेऊ शकते
लेखक दृश्यकला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात. ईमेल : nitindrak@gmail.com