ब्राह्मणेतर चळवळीच्या वैचारिक नेतृत्वालाही कोणत्या ना कोणत्या जुन्या संस्कृतीचा अभिमान होताच.. ती संस्कृती आर्यपूर्व होती, आयरेत्तर नव्हती. वैदिक नव्हती. या पाश्चात्त्य संस्कृतीला कोणीही आपले मानलेले नाही, हे विशेष..
ब्रिटिश राज्य व पाश्चात्त्य विद्येमुळे भारतीयांना जशी आधुनिक मूल्यांची व त्यातून स्वत:च्या सांस्कृतिक राष्ट्रीयत्वाची ओळख झाली, तशीच त्यांच्यातील जाती-जमातींनाही स्वत्वाची ओळख होऊ लागली. कायद्यासमोर सर्व समान असतात, हे महान तत्त्व त्यांना पहिल्यांदाच कळले होते. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळेल, पण आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य मिळेल काय? भारताची संस्कृती खूप प्राचीन व श्रेष्ठ आहे व भारत हे प्राचीन काळापासूनचं एक सांस्कृतिक राष्ट्र आहे, पण ती संस्कृती व राष्ट्र कोणाचे आहे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले.
जसजशी ब्रिटिशांविरुद्धची सांस्कृतिक राष्ट्रभावना वाढीस लागली, तसतसे ब्रिटिश काळातच त्या राष्ट्रवादाला विरोध करणारे गट व चळवळी निर्माण होऊ लागल्या. त्यांच्यात स्वत:च्या हक्कांच्या व सामाजिक समतेच्या जाणिवा निर्माण झाल्या. एका राज्याखाली समान हक्क व स्वातंत्र्य उपभोगीत ते यापूर्वी कधीही एकत्र राहिले नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या गटाला अन्य वर्चस्वशाली गटापासून स्वातंत्र्य मिळेल काय, असे त्यांना वाटू लागले व राष्ट्रवादी नेते प्राचीन काळापासून चालत आलेल्या संस्कृतीला वा राष्ट्राला कितीही भारतीय या नावाने संबोधित असले तरी त्याचा मुख्य आशय ‘हिंदू’ हाच होता. या हिंदू धर्माने व संस्कृतीने आमच्यावर ब्रिटिशांपेक्षाही अधिक अन्याय केला आहे, याची समाजातील अनेक वर्गाना जाणीव झाली. हा अन्याय करणारा ब्राह्मणवर्ग होय, हे ओळखून ते त्यांच्याविरोधात उभे ठाकले. देशभर ब्राह्मणेतरांच्या चळवळी सुरू झाल्या. यात सवर्ण ब्राह्मणेतर चळवळींपेक्षाही सर्वाधिक अन्यायग्रस्त असणाऱ्या त्या काळात शूद्र व अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाच्या चळवळी आघाडीवर होत्या.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करीत होती. सर्व भारतीयांत राष्ट्रीय भावना व ऐक्य निर्माण करून ब्रिटिशांविरुद्ध लढा उभा करणे व देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे तिचे ध्येय होते. मात्र, आपल्याला न्याय्यहक्क मिळण्यासंबंधात ब्राह्मणेतर चळवळींचा काँग्रेसपेक्षा ब्रिटिश शासनावरच अधिक विश्वास होता. परिणामत: या चळवळींनी शासनाच्या बाजूने व काँग्रेसविरोधी भूमिका घेतली होती. ते हिंदू धर्माला ब्राह्मणीधर्म, हिंदू संस्कृतीला ब्राह्मणीसंस्कृती व काँग्रेस मानीत असलेल्या भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाला ब्राह्मणी राष्ट्रवाद म्हणत होते. काँग्रेस नेत्यांमध्ये ब्राह्मणांची बहुसंख्या होती. ब्राह्मणेतर पक्ष वा चळवळी काँग्रेसला ‘ब्राह्मणी पक्ष’ म्हणत असत. गांधीजींकडे काँग्रेसचे नेतृत्व आल्यानंतर सुमारे एका दशकाने काही सवर्ण ब्राह्मणेतर चळवळी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या, पण काँग्रेसच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला त्यांचा विरोध मात्र कायम राहिला.
ब्राह्मणेतर चळवळ उभी करण्याचा अग्रमान प्रांत म्हणून महाराष्ट्राकडे व व्यक्ती म्हणून म. फुले यांच्याकडे जातो. सामाजिक समता आल्याशिवाय भारत हे एक राष्ट्र कसे होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसविषयी ते म्हणत, या बळिस्थानातील एकंदर शूद्रादीअतिशूद्रांसह सर्व लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईतोपावेतो ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय नेशन होऊ शकत नाही. असे असता, एकटय़ा उपऱ्या आर्यभट ब्राह्मण लोकांनी नॅशनल काँग्रेस स्थापिली, तर तिला कोण विचारतो? ते म्हणत असत की, आम्हा क्षत्रियांस ब्रह्मराक्षसाच्या दाढेतून ओढून काढण्याकरिता जगत्कर्त्यांने इंग्रजांस हिंदुस्थानात पाठविले आहे. ते ब्राह्मणांना बाहेरून आलेले इराणी मानीत असत. ते लोक परकीय देशातून येऊन या देशातील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वास त्यांनी आपले दास केले, असे त्यांचे म्हणणे होते. येथे पूर्वी समताप्रधान व वैभवशाली असे बळीराजाचे राज्य होते. ते ब्राह्मणांनी नष्ट केले, म्हणून ते भारताला बळिस्थान म्हणत असत. बळीच्या राज्यातील जोतिबा, खंडोबा, म्हसोबा, बहिरोबा, बाणासुर प्रभृती पराक्रमी पूर्वजांना ते आपले मानीत होते. त्यांना बळीच्या राज्याशी संबंधित असलेले दसरा, दिवाळी इ. सण मान्य होते. ‘इडापीडा जावो, बळीराज्य येवो,’ ही इच्छा व्यक्त करताना या राज्याचीच आठवण आजही केली जाते. अशा प्रकारे म. फुले यांनी आर्यभटांची वैदिक संस्कृती नाकारली असली तरी तत्पूर्वीच्या बहुजनांच्या इतिहासाचा व संस्कृतीचा अभिमान धरलेलाच होता.
म. फुले यांची प्रेरणा घेऊन पुढे महाराष्ट्रात व्यापक ब्राह्मणेतर चळवळ उभी राहिली. शाहू महाराजांचा त्यास पाठिंबा मिळाला. काँग्रेसचे नेते लो. टिळक म्हणत असत, ‘शिंप्यांना कौन्सिलात जाऊन काय मशीन चालवायची आहे? कुणब्यांना काय नांगर धरायचा आहे? वाण्यांना काय तागडी धरायची आहे? ब्राह्मणेतर चळवळीचे नेते दिनकरराव जवळकर यांनी १९२५ मध्ये ब्राह्मणांना व टिळकांना लक्ष्य करून ‘देशाचे दुश्मन’ नावाचे पुस्तक लिहिले. त्याविरुद्ध भरलेल्या फौजदारी खटल्यात जवळकरांचे वकीलपत्र डॉ. आंबेडकरांनी घेतले होते. याच पुस्तकात जवळकरांनी म. फुलेंविषयी लिहिले होते, ‘जोतिराव हिंदू धर्माचे कट्टे कैवारी होते. राष्ट्रघातकी भटशाहीच्या तंत्राने हिंदू धर्माचे वाटोळे होईल म्हणून जोतिरावांनी आपल्याला धर्मोद्धाराकरिता वाहवून घेतले. (त्यांचा) सत्यशोधक समाज म्हणजे निराळा धर्म नाही, निराळा पंथ नाही, तर हिंदू धर्माच्या उज्ज्वल तत्त्वांनी सर्व जगाला चकित करून सोडण्यास.. जमलेल्या खऱ्या हिंदूंचा जमाव आहे.’ तेव्हा ब्राह्मणेतर चळवळीतील नेते स्वत:ला खरे हिंदू समजत असत.
महाराष्ट्राप्रमाणेच भारताच्या अन्य भागांतही ब्राह्मणेतरांच्या चळवळी सुरू झाल्या. मद्रास प्रांतातील अशा चळवळीचे प्रभावशाली नेते म्हणजे पेरियार रामस्वामी नायकर (१८७९-१९७३). त्यांनी ‘ब्राह्मणशाही’ला कंटाळून काँग्रेस सोडली होती. तेथील लोकांना तामिळी व द्रविडी संस्कृतीचा प्रचंड अभिमान. ब्राह्मणांनी तेथील मूळची द्रविड संस्कृती नष्ट केली, असा ते प्रचार करीत असत. ते रामाचा तिरस्कार व रावणाचा गौरव करीत असत. रावण हा तेथील द्रविडी संस्कृतीचा आदर्श मानला गेला.
तेथील ब्राह्मणेतर जस्टिस पार्टीचेच १९४४ मध्ये ‘द्रविड कळघम’ पक्षात रूपांतर झाले. आर्य संस्कृतीला विरोध करून ‘द्रविडी राष्ट्रीयत्वा’ची जाणीव निर्माण करण्यात आली. स्वतंत्र द्रविडी राज्याची मागणी करण्यात आली. तेव्हा मद्रास प्रांतातही ब्राह्मणी संस्कृती व सांस्कृतिक राष्ट्रवादाला विरोध केला गेला. तेथे ‘द्रविडी सांस्कृतिक राष्ट्रवाद’च मांडण्यात आला.
उत्तर भारतात पंजाबमध्ये १९२५ मध्ये मंगोराम यांनी ‘आदिधर्म’ हा धर्म स्थापला. दलित वर्गाना आवाहन करण्यात आले, की ‘आपण या देशाचे मूळ रहिवासी आहोत. हिंदू लोक नंतर बाहेरून आले व त्यांनी आपल्याला दास केले.. बंधूंनो, आपल्यापैकी ७ कोटी जण हिंदू गणले जातात. त्यांच्यापासून दूर व्हा व स्वतंत्र बना.’ १९३१ च्या जनगणनेत अधिकृतपणे ‘आदिधर्मीय’ समाज म्हणून चार लाख दलितांची नोंद करून घेण्यात ते यशस्वी ठरले होते. त्यांनी नंतर राजकीय क्षेत्रात काँग्रेस व गांधीजींच्या विरोधी भूमिका घेतली. ‘जर स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णीय हिंदूंचे राज्य असा असेल, तर आम्हाला तसे स्वातंत्र्य नको आहे,’ असे त्यांनी जाहीर केले होते. १९३० च्या कायदेभंगाच्या आंदोलनाला त्यांचा विरोध होता. म. फुले यांच्याप्रमाणेच त्यांनी आपला सांस्कृतिक अनुबंध आर्यपूर्व काळाशी जोडला. दक्षिण भारतात ‘आर्यपूर्व काळा’तील संस्कृतीस द्रविडी वा आदि-द्रविडी संस्कृती असे संबोधले जाई, तर उत्तर भारतात तीस आदिधर्मीय वा आदिहिंदूधर्मीय म्हटले जाई.
त्याचप्रमाणे, स्वामी अच्छुतानंद यांनी उत्तर प्रदेशात आदिहिंदू चळवळ सुरू केली. उत्तर प्रदेशातील सर्व प्रमुख शहरात ‘आदिहिंदू सभा’च्या शाखा स्थापन केल्या. ब्राह्मणवादाला विरोध व जातिमुक्त समाजव्यवस्था हे या चळवळीचे मुख्य ध्येय होते. ते काही काळ आर्य समाजाच्या प्रभावाखाली होते. पण नंतर ते अशा निष्कर्षांला आले, की आर्य समाजाचे ध्येय सर्व हिंदूंना वेदांचे व ब्राह्मणांचे दास बनविणे हे आहे. ते स्वत:ला आदिहिंदू मानीत असत. आदिहिंदू नेते सांगत असत, की प्राचीन काळात आदिहिंदूंची वैभवशाली संस्कृती होती. आर्यानी आक्रमण करून आदिहिंदूंना जिंकले व त्यांच्यावर जातिव्यवस्था लादली. तेव्हा आदिहिंदू चळवळीचा ब्राह्मणी संस्कृतीला विरोध असला तरी त्यांनी आपले नाते आदिहिंदू संस्कृतीशी जोडले होते.
डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मावर व संस्कृतीवर कठोर प्रहार केले व शेवटी धर्मातर करून आपले नाते बौद्ध संस्कृतीशी जोडले. बौद्ध धर्मस्वातंत्र्य, समता व बंधुतेचा आहे. ‘बुद्धाची चळवळ म्हणजे त्या काळची ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ होती’, ‘जर बौद्धधर्म विजयी झाला असता तर जातिभेद शिल्लकच उरला नसता. ब्राह्मणेतरांची वेदांवर कधीही श्रद्धा नव्हती’, ‘साऱ्या भारताने बौद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे,’ असे विचार मांडून ते जनतेला बौद्ध धर्माकडे निमंत्रित करीत होते. त्यांचा आधुनिक राष्ट्रवादही प्राचीन बौद्ध संस्कृतीशी जोडला गेला होता. वैदिक संस्कृतीला दिलेले ते एक मोठे आव्हान होते.
आधुनिक मूल्यांची ओळख झाल्याने भारताच्या विविध भागांत ब्राह्मणेतरांच्या अशा अनेक चळवळी निर्माण झाल्या. वैदिक संस्कृतीस नकार व आव्हान हे त्यांचे मुख्य सूत्र होते. त्यापैकी काहींनी आर्य-वेदपूर्व संस्कृती आपली मानली, तर काहींना वैदिक संस्कृतीला आव्हान देणाऱ्या आर्योत्तर अवैदिक संस्कृतीला आपली मानले. यापैकी कोणीही पाश्चात्त्य संस्कृतीला आपले मानले नाही. तेव्हा सर्व भारतीय आपल्या प्राचीन संस्कृतीशीच नाते जोडीत होते. वाद फक्त ती संस्कृती वैदिक, अवैदिक एवढाच होता.