समस्यांच्या ओझ्याने मनावर उठत गेलेले उदासीनतेचे ओरखडे  एका प्रकाशकिरणाने पुसले गेले आणि जाणिवा जाग्या झाल्या. ‘सर्व काय्रेषु सर्वदा’ हा उपक्रम यासाठीचे एक निमित्त ठरला.
मंदी, महागाई, गुन्हेगारी, खून, मारामाऱ्या, दरोडे, बलात्कार, आणि या साऱ्यामुळे मनामनामध्ये घर करून राहिलेली असुरक्षिततेची भयाण भावना दिवसागणिक बळावत चाललेली असताना, सभोवती चांगले काहीच नाही का, असा संभ्रम पडावा आणि या संभ्रमावस्थेमुळे मनावर नराश्याचा झाकोळ दाटावा, त्या झाकोळात अवघं जगणंच काजळी धरल्यागत होऊन जावं आणि यातून बाहेर पडण्यासारखं काहीच नाही या जाणिवांमुळे अगतिक होण्याची वेळ यावी असं काहीसं आजकाल आसपास सगळीकडे दिसू लागलेलं आहे. जिवंतपणच अचेतन होऊन जावं इतकं हे सारं अपरिमित आहे असं वाटत असताना, या उदास जाणिवांनी झाकोळलेल्या जगण्याच्या एखाद्या कोपऱ्यातून येणाऱ्या कुठल्या तरी एखाद्या प्रकाशकिरणाच्या तेजस्वी रेषेनं मनाचा कोपरान्कोपरा उजळून जावा, आणि नराश्याच्या त्या भावनेपलीकडचं काही तरी वेगळं, चेतनामय, त्या उदासवाण्या मनाला उभारी देऊन जावं.. असंही अनपेक्षितासारखं घडू लागतं! .. म्हणूनच जगण्याच्या प्रत्येक पदरावर कितीही काजळी दाटत राहिली, तरी मनाचा एक कोपरा जणू स्वाभाविक सवयीनं सदोदित कुठल्या तरी किलकिलेपणाकडे डोळे लावून प्रकाशाची संधी शोधतच असतो. अंधारलेल्या मनाबाहेरच्या जगातून कुठून तरी एखादा प्रकाशकिरण या किलकिल्या जागेतून आत येईल, आणि मनाचा अंधारलेला गाभा उजळून टाकील ही अपेक्षा याच सवयीनं सदैव धुगधुगती असते. याला नुसता आशावाद म्हणत नाहीत. हीच तर जगण्याची, आयुष्याचा आनंद शोधण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. या इच्छाशक्तीच्या बळावरच, निराशेची काजळी झटकून टाकली जाते, आणि जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या मनाचे सारे कंगोरे झगमगून उठत असतात. ज्या क्षणी असा अनुभव येतो, त्या क्षणी जगण्यातला एकटेपणाही संपून जातो. त्या क्षणापर्यंत उराशी कवटाळलेल्या आपल्यापुरत्या परिघातील आपल्याआपल्या विश्वाच्या कक्षा तर पार कल्पनाशक्तीची क्षितिजेही भेदून पलीकडे पोहोचतात, आणि ज्या जाणिवांची काजळी मनावर धरल्यामुळे नराश्याची भावना दाटून राहिलेली असते, त्या जाणिवादेखील अंधूकअंधूक होऊ लागतात.. सगळीकडेच अंधार असल्याची भावना हळूहळू संपू लागते. सगळेच काही संपलेले नाही, आजूबाजूला अजूनही तेजस्वी प्रकाशाची किरणे आहेत, ही जाणीव सुखावू लागते, आणि आजवर जपलेल्या, आपल्यापुरत्या विश्वापलीकडच्या त्या क्षितिजांना स्पर्श करण्यासाठी मन आतुर होऊ लागतं..
मनावर पसरलेल्या निराशेच्या काजळीतून पलीकडे डोकावण्याची इच्छाशक्ती जेव्हा जागी होते, आणि पलीकडचा प्रकाशकिरण शोधण्याची जेव्हा आस लागते, त्याच नेमक्या क्षणी, कुणी तरी हाताला धरून त्या प्रकाशवाटेची दिशा दाखविली, तर?.. महागाई, दररोजच्या विवंचना, आíथक कुचंबणा आणि पावलापावलावर असुरक्षितता दाटलेली असताना, पावलापुरता प्रकाशदेखील पुरेसा असतो. त्या मोजक्या प्रकाशानंदेखील पुढचं प्रत्येक पाऊल आश्वस्त होऊन जातंच, पण आपण एकटे नाही, ही जाणीवदेखील मनाला नवी उभारी देऊ लागते. केवळ एखाद्या व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्याच नव्हे, तर समाजाच्या अनेक घटकांच्या बाबतीत ही जाणीव सुखावणारी असते. मग त्या प्रकाशवाटेच्या दिशेनं पावलं आपोआपच पडू लागतात, आणि अवतीभवती अशी असंख्य पावलं त्या वाटेवरून चालत आहेत, हेही सहज जाणवू लागतं. मन समाधानानं काठोकाठ ओसंडू लागतं. आणि या वाटेवरूनच आपल्याला समाधानाचं शिखरदेखील गाठता येईल, हा आत्मविश्वासही रुजू लागतो. दुर्दम्य इच्छाशक्तीचं जिवंतपण म्हणतात, त्याची अनुभूती अशी असते.
येणाऱ्या प्रत्येक दशकाची आणि शतकाची वाटचाल करतानाही ज्या संस्कृतीची शिदोरी आपण जिवापाड जपलेली असते, त्या संस्कृतीची पहिली शिकवण आधी संसार करावा नेटका अशीच आहे. कारण, नेटक्या संसारातूनच किमान मानसिक समाधानाची पातळी गाठता येते. संसाराच्या नेटकेपणामुळे विवंचनांची धार कमी होते, मनाला स्थर्य लाभते आणि अशा स्थिरतेमधूनच परदु:खाच्या जाणिवा प्रगल्भ होतात, विवेकभावना जागी होते. ज्या विवंचनांचा आपण सामना करतो, त्याच विवंचना दुसऱ्यांच्याही जगण्याला चिकटलेल्या आहेत, हे ओळखण्याची क्षमता येते, आणि एकमेकांना हात देत, या विवंचनांचा भार हलका करण्याची मानवी प्रवृत्ती जागी होते. आजकाल घडय़ाळाच्या काटय़ाशी स्पर्धा करण्याच्या गडबडीत, आपल्यापलीकडे पाहण्याची, दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची किंवा त्या वेदनांवर फुंकर मारण्याची माणुसकी हरवत चालली असल्याची खंत अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होत असते. पण हे खंतावणं हीच या जाणिवा जिवंत असल्याची साक्ष असतात. एखाद्या निखाऱ्यावर हलकीशी फुंकर मारून त्यावरील राख बाजूला झटकताच तो निखारा अग्नीच्या तेजाने तळपू लागावा, तशी या जाणिवांवर फुंकर मारण्याची गरज असते. तसे झाले, की मनावर खंतावलेपणाची राख साचविणाऱ्या या जाणिवा बघताबघता दूर होतात, आणि माणुसकी तळपू लागते. मग संतसाहित्यातील परमार्थाच्या ओळीदेखील मनात जिवंत होतात, आणि त्याच्या आचरणासाठी मन उतावीळ होऊन जाते..
..गेल्या चार वर्षांत ‘लोकसत्ता’ परिवाराने याचा निखळ अनुभव घेतला आहे. जगण्याच्या सगळ्या समस्या सोसत असताना, या समस्यांच्या ओझ्याने मनावर उठत गेलेले उदासीनतेचे ओरखडे अशाच एका प्रकाशकिरणाने पुसले गेले आणि आपल्या विवंचनांपेक्षाही मोठय़ा विवंचनांचा सामना करत प्रकाशवाटांवरून चालणारी असंख्य पावलं इच्छाशक्ती पेरतच पुढे जात असल्याच्या जाणिवा जाग्या झाल्या. ‘सर्व काय्रेषु सर्वदा’ हा उपक्रम यासाठीचे एक निमित्त ठरला. उपेक्षितांचे अश्रू पुसण्यासाठी आपल्या हातांना एकवेळ वेळ मिळत नसेल, पण आपल्या मनांना या कामाशी नाते जोडता येते आणि त्यातून मिळणाऱ्या असीम समाधानामुळे आपल्या विवंचनांवर मात करता येते, याचा अनुभव ‘लोकसत्ता’ परिवाराशी जोडल्या गेलेल्या लाखो वाचकांना आला. आपला संसार करतानादेखील, आसपासच्या जगातील उपेक्षितांसाठी काही करण्याची इच्छा जागी करणारा एक प्रकाशकिरण ‘सर्व काय्रेषु सर्वदा’ उपक्रमातून असंख्य मने उजळवून गेला, आणि समाजातील ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गाचे सहजसुंदर नातेही जडून गेले. पीडित, अनाथांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे व्रत घेतलेले माणुसकीचे असंख्य झरे आसपास झुळझुळत असतानाही, आपण मात्र आपल्या विवंचना कुरवाळत बसलो, ही जाणीवच नकोशी होऊ लागली आणि अश्रू पुसणाऱ्या त्या हातांना साथ देण्यासाठी हजारो हात सरसावून पुढे आले.
गेल्या चार वर्षांत ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व काय्रेषु सर्वदा’ उपक्रमामुळे अनेक उपेक्षितांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याच्या प्रयत्नांना फुले आली, आणि ते प्रयत्न बहरून गेले. अनेकांनी आपल्या तुटपुंज्या पुंजीतूनही या कामासाठी कमाईचा वाटा बाजूला काढून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले. ‘आधी संसार करावा नेटका’, अशी समर्थ रामदासांची शिकवण आहे. ‘शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यासी यावे, उणे पडो नेदावे, कोणियेकाचे’ असेदेखील त्यांनीच सांगून ठेवले आहे. ‘दुसऱ्याच्या दु:खे दु:खवावे, परसंतोषी सुखी व्हावे’, या त्यांच्या वचनाची प्रत्यक्ष अनुभूती ‘सर्व काय्रेषु सर्वदा’ उपक्रमात सहभागी झालेल्या असंख्यांना येत आहे, हे जाणिवा जाग्या असल्याचे प्रत्यक्ष लक्षण आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarva karyeshu sarvada project by loksatta helped many deprived
Show comments