वास्तविक पाहता ‘अंदमान इथे कैद्यांना कागद आणि पेन दिले गेले नाही म्हणून स्वा. सावरकरांनी भिंतीवर कोरून काव्य केले होते,’ ही आख्यायिका प्रचलित असतानाच त्यांनी अंदमानातच उर्दूमधून कागदावर- वहीत काव्य लिहिले, ही बातमी ‘लोकसत्ता’त (२९ जुलै) वाचली.
दिलेल्या बातमीनुसार तब्बल ९० वष्रे हे संशोधन अनभिज्ञ होते असे दिसते.
‘लोकसत्ता’चा मी नियमित वाचक आहे. ‘लोकसत्ता’सारख्या एक जबाबदार आणि लोकप्रिय वृत्तपत्राने हे वृत्त देण्यात घाई केली असे वाटते. इतिहासाचा अभ्यासक या नात्याने मला या बातमीबद्दल खालील प्रश्न पडले. किंबहुना प्रत्येक वाचकाला हे प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे असे मला वाटते-
१) इतकी वष्रे हे कागद कोठे होते? आत्ताच का ते बाहेर आले?
२) सावरकरांनी आपल्याला उर्दू भाषा येते, असे कोठेही नमूद केलेले नाहीये किंवा असे कधी भाषणातून बोलले होते हेही ऐकिवात किंवा वाचनात आलेले नाही.
३) त्या कागदावरचे लेखन (हस्ताक्षर) सावरकरांचेच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे का?
४) १९२१ साली अंदमानचा तुरुंग इंग्रजांकडेच होता आणि तेथील कैद्यांच्या कोणत्याही वस्तूची किंवा लिखाणाची तपासणी केल्याशिवाय ती वस्तू किंवा लिखाण नातेवाईकाकडे सुपूर्द केले जात नसे. मग हे लिखाण इंग्रजांना आक्षेपार्ह वाटले नाही काय? हे सुरक्षाकडे भेदून ‘ती’ वही तेथून गोखले यांच्या हातात पडली कशी, हाही प्रश्न निर्माण होतो.
५) सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे या काव्यरचनेनंतर त्यांनी इतर उर्दू साहित्य का निर्माण केले नाही?
या प्रश्नांची उत्तरे इतिहास संशोधकांना आता शोधावी लागणार आहेत.
शंकर माने
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा