अंतरंगात सद्भाव असेल तरच भौतिक प्रगतीने मानवाचा खरा फायदा शक्य आहे. प्रत्यक्षात प्रत्येक शोधागणिक प्रज्ञेची कास धरून जीवन ज्ञानसंपन्न करण्याऐवजी माणूस विश्वमोहिनी मायेच्याच अधिक अधीन झाला. प्रज्ञेच्या आधारे परमतत्त्वाचं ज्ञान करून घेण्याऐवजी माणसानं भौतिक संपन्नतेचा विस्तार साधला. या भौतिक संपदेच्या प्रभावात तो पुरता अडकला. साधकही असा द्वैताच्या कात्रीत असतो. शुद्ध आणि अशुद्ध, सत्य आणि भ्रम, शाश्वत आणि अशाश्वत, सुसंगत आणि विसंगत अशा गोष्टींची भेसळ त्याच्या जीवनात असते. जीवनातील भौतिक अंग हे प्रत्यक्ष अनुभवास येतं. भौतिक संपदेच्या प्राप्तीनं ‘सुख’ होतं आणि त्या संपदेच्या अभावानं ‘दु:ख’ होतं, अशी प्रत्यक्ष अनुभूती प्राथमिक पातळीवरच्या आपल्यासारख्या साधकांना येत असतेच. जे ‘प्रत्यक्ष’ आहे, मग भले ते भ्रामक का असेना, पण त्याचा प्रभाव मनावर खोलवर होतोच. त्यामुळेच भौतिकातील चढउतार हा साधकाच्या मनावर वेगानं परिणाम करीत असतो. म्हणून माऊली जणू साधकाला आत्मिक ज्ञानाची स्वामिनी ‘शारदा’ आणि भौतिक संपदेची स्वामिनी ‘श्री’ या दोन्ही महाशक्तींना नमन करायला सांगतात. ते श्रीशारदा विश्वमोहिनी नमिली मियां! तर आता ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील या तिसऱ्या ओवीचा गूढार्थ ओवीसकट एकत्रितपणे पुन्हा एकवार पाहू-
आतां अभिनववाग्विलासिनी। जे चातुर्यार्थकलाकामिनी। ते श्रीशारदा विश्वमोहिनी। नमिली मियां।। ३।। (१/२१).
गूढार्थ : (श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप जगलं पाहिजे, हे उमगत असलं तरी) आता साधकाची स्थिती कशी आहे? नित्यनूतन अशा जगात तो वावरत आहे. यातील नित्य तत्त्वाचा शोध घेण्यासाठी त्याला ईश्वरी वाणीत अर्थात परमतत्त्वात रममाण असणाऱ्या प्रज्ञा शक्तीचा लाभ दिला गेला आहे. पण त्या प्रज्ञेचा वापर त्यानं मात्र आपलं भौतिक जीवन संपन्न करण्यासाठी केला आणि ती शारदा भौतिक संपदेची अधिष्ठात्री अशी श्री बनली. तिचीच मोहिनी जगावर पडली. या श्री आणि शारदा या परमशक्तीच्या दोन्ही रूपांना मी नमन करतो.
आता हे नमन करण्याचा हेतू काय आहे? इथे नमन या शब्दाचाही गूढार्थ लक्षात घेतला पाहिजे. ‘नमन’ या शब्दाची फोडच ‘न+मन’ अशी आहे. म्हणजेच भौतिक संपदेला नमन करतानाच मन तिच्यात गुंतणार नाही, तिच्या प्रभावात मनानं मी सहभागी नसेन हा अर्थ आहे. शारदेला नमन करताना मन तिच्यासमोर वेगळेपणानं उरणारच नाही, तिच्याहून वेगळं राहाणारच नाही, तिच्या आड येणारच नाही, असा अर्थ आहे. असं नमन हे खरं नमन. हे नमन साधायला आधार कोणता? द्वैताच्या या महापुरातून मी केवळ एका सद्गुरूमुळेच तरलो, असं माऊली स्पष्ट सांगतात. स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढल्या, चौथ्या ओवीकडे आपण आता वळणार आहोत. ही ओवी अशी- ‘‘मज हृदयीं सद्गुरू। जेणें तारिलों हा संसारपूरू। म्हणौनि विशेषें अत्यादरू। विवेकावरी।।’’ या ओवीच्या प्रचलितार्थाचा आणि विशेषार्थाचा आता मागोवा घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा