स्वामींच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण योग्य पथ्य-पाणी व सेवा-शुश्रूषा राखली नाही तर ती ढासळण्याची भीतीही होती. त्यामुळे हवापालटाची गरज होती. १९३४मधला डिसेंबर उजाडला तेव्हा ही स्थिती होती. अशात डॉ. बाबा देसाई यांचे वडील अण्णा हे स्वामींच्या प्रकृतीची चौकशी करायला म्हणून आले. स्वामींची प्रकृती सुधारेपर्यंत त्यांना हवापालटासाठी आणि विश्रांतीसाठी आपल्या घरी ‘अनंत निवासा’त न्यायचा विचारही त्यांच्या मनात होता. स्वामींची ओळख तेव्हा जगालाच काय, जवळच्यांनाही नव्हती. सर्वजण त्यांना ‘अप्पा’ म्हणूनच ओळखत. स्वामींचं गोडबोले कुटुंब आणि अण्णांचं देसाई कुटुंब, ही पावसमधली अगदी जुनी कुटुंबं. गावात घरांचे उंबरठे जरी स्वतंत्र असले तरी परस्पर प्रेमाचं नातं उंबरठय़ापुरतं कधीच उरत नसे. अण्णाही त्याच प्रेमाला स्मरून स्वामींना म्हणाले, ‘‘अहो, आप्पा! असं खोलीत पडून काय रहाता? चला, तुम्हाला मी पाठुंगळीस मारून आमच्याकडे नेतो. तुम्हाला आमच्याकडे लवकर बरं वाटेल.’’ अण्णांच्या या प्रेमळ प्रस्तावावर स्वामी काहीच बोलले नाहीत, पण ही ईश्वरी योजनाच आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे स्वत:च्या पायांनी चालत अण्णांकडे जाता आलं पाहिजे, हेही त्यांनी मनाशी ठरवलं. पुढल्या दोन महिन्यांत एक मैलापर्यंत हळूहळू चालत जाता येईल, इतपत ताकद कमावण्यासाठी त्यांनी सराव सुरू केला. घरातल्या घरात चालताना डोळे उघडे ठेवण्याचंही त्राण नसे. त्यामुळे पहिल्या आठवडय़ात डोळे मिटूनच हळूहळू घरात चालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मग पुढल्या आठवडय़ात काठी टेकत अंगणात फिरण्याचा सराव झाला. त्या पुढच्या आठवडय़ात काठी टेकत टेकत फर्लागभर चालण्याचा सराव झाला. पंधरवडय़ानंतर चार फर्लागभर सावकाश चालत जाऊन परतण्याची शक्ती आली. स्वामी सांगतात, ‘‘दुसऱ्या महिन्यात प्रगतीचा टप्पा बराच गाठला गेला, किंवा त्यावेळी जी काही प्रगती झाली त्यापेक्षा अधिक प्रगती पुढे झालीच नाही’’ (चरित्र, पृ. १७६). काय होती ही प्रगती? तर, ‘काठीच्या आधारानं मैलभर चालून परतता येऊ लागलं’! म्हणजेच देह ठेवेपर्यंत इतपतच शक्ती होती आणि जसजसा कालावधी सरत गेला तसतसे घरात काठीशिवाय फिरणारे स्वामी एका खोलीतच एका पलंगावर सुकोमल रुपात तासन्तास राहू लागले. त्याचवेळी त्रलोकात सहज भ्रमण करणाऱ्या आंतरिक शक्तीचा सुगावा मात्र कुणाला लागणं शक्यच नव्हतं. स्वामींच्या शरीरप्रकृतीची इतकी सविस्तर माहिती आपण का घेतली? तर देहाची म्हणावी तशी साथ नसतानाही सर्वोच्च आत्मिक स्थितीत ते अढळपणे कसे स्थित होते, याची जाणीव व्हावी. तेव्हा अशा देहस्थितीत स्वामी १९३५च्या फेब्रुवारीत अण्णा देसाई यांच्या घरी राहायला आले. घराचं नाव होतं, ‘अनंत निवास’! हे नाव ठेवावं, असं ज्या कुणाच्या मनात ज्या क्षणी आलं असेल तो क्षण ऋषींना वेदऋचा स्फुरल्या त्या क्षणासारखाच असला पाहिजे. अनादी-अनंत असा एक महापुरुष संकुचित जिवांना अनंत होण्याची कला शिकवायला, घराचं नाव सार्थ करायला त्या घरात प्रवेशला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा