स्वरूपी राहणे हा स्वधर्म! आता हे स्वरूप नेमकं काय आहे? स्वामी स्वरूपानंद सांगतात की, ‘‘स्वरूप महिमा वर्णवे ना वाचे। पुरे ना शब्दाचें बळ तेथें।। विचाराचा डोळा होतसे आंधळा। तर्क तो पांगळा ठरे जेथें।। मना इंद्रियांचा काय तेथें पाड। शास्त्रांसी निवाड होये चि ना।। ’’ (संजीवनी गाथा, अभंग १२४चे प्रथम तीन चरण). स्वरूपाचं माहात्म्य तोंडानं सांगता येत नाही. शब्दांचं बळ तिथे चालत नाही. विचाराच्या डोळ्यांनी त्याला पाहता येत नाही. हजार वाटांनी धावणारा तर्क स्वरूपाच्या शोधाच्या बाबतीत पांगळा होतो. तत्त्ववेत्त्या वेदांनाही ज्याचा अर्थ कळला नाही तो मन आणि इंद्रियांना कसा उकलावा? याचाच अर्थ ‘स्वरूपी राहणे हा स्वधर्म’ हे खरं तरी स्वरूपाची नेमकी व्याख्या करता येत नाही. एका अभंगात स्वामी सांगतात, ‘‘ओळखी स्व-रूप नको होऊं भ्रांत। अनादि अनंत आहेसी तूं।। देह मिळे अंतीं पंच-महाभूतीं। स्थिति त्यापरती असे तुझी।। नामरूपात्मक मायिक संसार। नित्य निर्विकार तूं चि एक।। स्वामी म्हणे सोडीं सोडीं देहाहंता। सुखें भोगीं सत्ता सोऽहं-रूप।।’’ (संजीवनी गाथा, क्र. २४२). आपलं स्वरूप हे अनादि, अनंत, पंचमहाभूतांपलीकडले, नित्य, निर्विकार आहे. प्रत्यक्षात आपल्याला तसं वाटतं का हो? आपण स्वत:ला अनादि, अनंत, नित्य, निर्विकार मानतो का? आज आपण देहालाच ‘स्व’च नव्हे तर सर्वस्व मानत आहोत! आपण अनादि अनंत नव्हे तर काळाच्या पकडीतील देहस्थितीनुसार जन्म आणि मृत्यूच्या चौकटीत आबद्ध आहोत. मर्यादित आहोत. या नामरूपात्मक संसारात आपली ओळखही नावानंच होते. विशिष्ट रूपानंच होते. जन्मापासून जे नाव आपल्याला ठेवलं गेलं त्याच्याशी आपण इतके एकरूप होतो की त्या नावाच्या जपणुकीसाठी, मोठेपणासाठीच आपण अखंड धडपडत असतो. आपल्या रूपाचीही ओळख जपण्यासाठी आपण धडपडत असतो. तेव्हा स्वरूप नित्य आणि निर्विकार आहे पण आपण अनित्य आणि विकाराधीन आहोत. पंचमहाभूतांच्या प्रभावाखाली आहोत. तेव्हा आपल्याला स्वरूपाची जाणीव होणार तरी कशी? स्वामीजी या स्वरूप साक्षात्काराचा मार्ग सांगतात. ते म्हणतात, ‘‘‘नेति’ वेद बोले तें चि म्यां देखिलें। गुरु-कृपा-बळें स्वामी म्हणे।।’’ (संजीवनी गाथा, अभंग १२४चा अंतिम चरण). या वेदांनाही स्वरूप म्हणजे नेमकं काय, ते सांगता आलं नाही. वेदांनीही या स्वरूपाचं ‘नेति – नेति’ म्हणूनच वर्णन केलं. ‘नेति’ म्हणजे न+इति अर्थात अमुक म्हणजे स्वरूप नव्हे, तमुक म्हणजे स्वरूप नव्हे, अशा हे नाही-ते नाही या प्रकारे वर्णन केलं. स्वरूप म्हणजे नेमकं काय, हे त्यांना सांगता आलं नाही, पण काय-काय म्हणजे स्वरूप नव्हे, हे सांगता आलं. स्वामी म्हणतात केवळ सद्गुरूकृपेच्या बळानंच स्वरूप साक्षात्कार होतो! अर्थात आपण नित्य, निराकार आहोत, अनादि अनंत आहोत, परमात्म्याचाच अंश असलेलं आत्मस्वरूप आहोत, वगैरे आपण शब्दांनी नुसतो ऐकतो, वाचतो. त्या शाब्दिक ज्ञानाची सत्यता आपण अनुभवली मात्र नसते. केवळ सद्गुरूच या ज्ञानाच्या अनुभवासाठी शिष्याला तयार करू शकतात.

Story img Loader