सद्गुरूंचं चरित्र आपण जाणून घेतो. उघडय़ा डोळ्यांनीही त्यांना वावरताना पाहातो. त्यांच्या बोधातून, त्यांनी सांगितलेल्या उपासनेतून त्यांना जाणू पाहातो. भगवान श्रीकृष्णाच्या माध्यमातून श्रीसद्गुरू मात्र अशा बाह्य़दर्शनातले धोके स्पष्टपणे सांगतात! श्रीसद्गुरू सांगतात, जर माझ्या खऱ्या स्वरूपाची जाणीव ठेवली नाहीस तर माझ्या बाह्य़रूपातच अडकशील. ते खरं पाहणं नाही. ‘पैं स्थूलदृष्टी देखती मातें। तेंचि न देखणें जाण निरुतें।’ बाह्य़रूप खरं तर महत्त्वाचं नाहीच. व्यक्तीचं रूप व्यक्त, स्थूल असतं. पण त्याची वृत्ती, त्याची जीवनदृष्टी, त्याची धारणा हे सारं अव्यक्त, सूक्ष्म असतं. खरं महत्त्व या सूक्ष्मातच आहे. कारण त्यानुसारच माणूस वावरत असतो. इथं तर सामान्य माणसाची कथा नाही. पूर्णस्वरूप सद्गुरूच्या जन्माचा उद्देश काय आहे, ते काय सांगण्यासाठी माझ्या जीवनात आले, त्यांची कळकळ काय; हे जोवर मी जाणत नाही तोवर त्यांचं खरं दर्शन मला होतच नाही. बुबुळांवर उमटणाऱ्या प्रतिमेनुसार मी त्यांचे शारीरिक गुणविशेषच न्याहाळीन. पण हे खरं पाहाणं नव्हे. साधक जेव्हा सद्गुरूंच्या जीवनदृष्टीशी समरस होतो, तेव्हाच खरं दर्शन घडतं. बाकी बाह्य़दर्शनानं काही लाभ नाही. ‘जैसें स्वप्नींचेनि अमृतें। अमरा नोहिजे।।’ स्वप्नात पाहिलं की अमृत भरपूर प्यायलं, पण त्यामुळे प्रत्यक्षात काही अमरत्व लाभणार नाही! आपलं जीवनही जणू स्वप्नवत आहे. मिथ्या आहे. कोणत्याही क्षणी भंगेल, असं आहे. आपण हे स्वप्न पाहात अनंत जन्म झोपलो आहोत. सद्गुरू येऊन मला गदगदा हलवून जागं करू पाहातात, पण मला स्वप्नाचीच गोडी आहे. झोप तुटता तुटत नाही. एक शिष्य सद्गुरूंना वारंवार म्हणू लागला की, ‘‘गुरुजी तुम्ही माझ्या स्वप्नात का येत नाही?’’ अखेर सद्गुरू म्हणाले, ‘‘अरे बाबा, मला आधी नीट प्रत्यक्ष पाहा ना!’’ स्वप्नातच म्हणजे माझी जगण्याची भ्रामक, अज्ञानयुक्त, मोहग्रस्त, अभावग्रस्त रीत आहे तशीच ठेवून, तिला कणमात्रही धक्का लागू न देता मी सद्गुरूंचा बोध भारंभार ऐकतो. त्यावर अनंत काळ शाब्दिक चर्चा करतो. त्याचा काय उपयोग? स्वप्नात अमृत प्यायचं आणि जागेपणी मोह-भ्रमाचं विषच आवडीनं पित राहायचं, मग स्वामींची खरी कळकळ, त्यांच्या जीवनाचा हेतू मला कसा कळणार? तो कळत नाही तोवर माझ्या जीवनातलं त्यांचं आणि त्यांच्या बोधाचं महत्त्व मला कसं उकलणार? ते महत्त्व समजत नाही तोवर जगण्यातल्या अनंत प्रकारच्या कचऱ्याला माझ्या लेखी असलेलं महत्त्व कसं कमी होणार? विषाचा प्याला कसा सुटणार? अमृत सागरात मी बुडी कशी मारणार? तेव्हा ते साधायचं आहे, हे ध्यानात ठेवूनच स्वामींचा बोध ऐकला पाहिजे. त्यांचं चरित्र पाहिलं पाहिजे. साध्या डोळ्यांनी आणि झापडबंद मनानं पाहिलं तर त्यांचं खरं अलौकिकत्व उमगेलच असं नाही. सुसंगतीच्या जागी विसंगतीच भासू लागतील. तर्कवितर्कानं अमृतच विष भासू लागेल! तेव्हा जगण्याची भ्रामक रीत सोडण्याचा प्रयत्न करीत सद्गुरुंच्या बोधानुरूप जीवन घडविणं, म्हणजे जिवंतपणी अमृतपान! साधक म्हणून आपलं तेच ध्येय हवं. त्यासाठीच प्रयत्न हवेत.
२०. स्वप्नातलं अमृतपान
सद्गुरूंचं चरित्र आपण जाणून घेतो. उघडय़ा डोळ्यांनीही त्यांना वावरताना पाहातो. त्यांच्या बोधातून, त्यांनी सांगितलेल्या उपासनेतून त्यांना जाणू पाहातो.
आणखी वाचा
First published on: 29-01-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawroop chintan dream of nectar leaf