नदीचं पाणी वेगानं वाहात असताना क्षणोक्षणी खरं तर प्रवाहित होणारं पाणी नवंच असतं, पण मला ते जाणवत नाही. त्याचप्रमाणे सतत बदलत असलेलं जग मला स्थिर वाटतं, अनित्य असलेलं जग मला नित्य वाटतं, अशाश्वत जग मला शाश्वत वाटतं. इतकंच नव्हे तर जगालाच मी शाश्वत सुखाचा, नित्य सुखाचा आधार मानत असतो. जगाचं माझं आकलन भ्रामक असतं. विपरीत असतं. आकलनच विपरीत असल्यानं त्या जगाशी होणारा माझा व्यवहारही विपरीतच होतो. प्रभू अर्जुनाला सांगतात, ‘‘जाणणेंचि विपरीतें। जें जें कांहीं जाणिजतें। जें प्रतिक्षणीं निमतें। होऊनियां।। अगा काढूनि भ्रांतीचें दांग। उभवी सृष्टीचें आंग। हें असो बहु जग। जया नाम।।’’ (अध्याय १५/ ओव्या ४८२, ४८३). म्हणजे, विपरीत ज्ञानानंच या जगातली प्रत्येक गोष्ट जाणली जाते. या जगात क्षणोक्षणी निर्मिती होते आणि क्षणोक्षणी तिचा नाश होत असतो. कल्पनेतूनच आकार निर्माण व्हावेत आणि ती सृष्टी विराट भासू लागावी त्याप्रमाणे हे जग माझ्या मनावर प्रभाव पाडत असतं. एकदा एका साधकानं श्रीनिसर्गदत्त महाराजांना जगाबद्दल काही प्रश्न केला. महाराजांनी विचारलं, तुम्ही कोणत्या जगाबद्दल बोलता आहात? तो आश्चर्यानं आणि काहीशा त्राग्यानं म्हणाला, ज्या जगात तुम्ही आणि मी राहत आहोत त्या जगाबद्दल. यावर महाराज उत्तरले, तुम्ही तुमच्या जगात आहात. तुमचं जग तुमच्या कल्पनेनुसार बनलेलं आहे आणि त्या जगाची तुमच्याखेरीज कुणाला कल्पनाही येऊ शकत नाही! महाराजांचं उत्तर वरकरणी कळणारच नाही. प्रत्यक्षात त्यांनी शुद्ध वास्तव सांगितलं. याच जगात आपणही वावरतो आणि संतही वावरतात. तरी ते जगाकडे कसं पाहतात आणि आपण कसं पाहतो? आपण आपल्या स्वार्थाच्या भिंगातूनच जगाकडे पाहत असतो आणि आपल्या स्वार्थानुसारच जगाकडून अपेक्षा ठेवत असतो. संत जगाचं वास्तविक स्वरूप जाणतात, या जगाची वास्तविक समस्या आणि तिच्यावरचा वास्तविक उपाय जाणतात आणि त्यासाठीच अहोरात्र कार्यरत असतात. आपल्या जगाकडून अवास्तव, भ्रामक आणि मोहजन्य कल्पना असतात. त्या कल्पनांच्या पूर्तीतच आपण सुख मानत असतो आणि त्यांच्या अपूर्तीनं दु:खी होत असतो. जग जसं आहे तसं मी जगाकडे पाहत नाही. जग जसं आहे तसं जाणून जगाशी व्यवहार करत नाही. त्यामुळेच या जगात अवास्तव अपेक्षांपायी मला अपेक्षाभंगाचं दु:ख भोगावं लागतं. माझं जग माझ्या कल्पनेनं सजलेलं आहे आणि त्या काल्पनिक जगातच मी कैद आहे. हे जग क्षणोक्षणी बदलत आहे. अर्थात या जगाकडूनच्या माझ्या अपेक्षाही क्षणोक्षणी बदलत आहेत. माझ्या मनाजोगती एखादी गोष्ट झाली तरी ती मला नित्य नको असते. तिच्यापेक्षा पुढची गोष्ट मला हवीशी वाटते किंवा तिच्यातली गोडी संपून ती गोष्ट नकोशीदेखील होते. त्यामुळे मनाची हाव कधीच संपत नसल्यानं या जगातली माझी वणवण कधीच संपत नाही. वणवण संपत नाही म्हणून खरा आराम कधीच मिळत नाही. समर्थही सांगतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा