चंद्र तेथे चंद्रिका! चंद्र आहे तिथे चांदणं असायचंच. अर्थात चांदणं आहे तिथे पूर्णचंद्रही असलाच पाहिजे. चांदण्यात विलसत असलेल्या पूर्णचंद्राचा अर्थात सद्गुरू स्वरूपाचा उल्लेखही याच ओवीत आहे, तो ‘स्वरूप’ म्हणून! तो पूर्णचंद्र म्हणजे स्वरूप आहे. तेविं माझां स्वरूपीं निर्मळे। देखाल दोष।। आता चांदणं कसं असतं ते प्रसन्न असतं. चमचमणाऱ्या हिऱ्या-मोत्यांसारखं ऐश्वर्यवान. चंद्र आपलं ऐश्वर्यच जणू उधळत आहे, असं वाटावं. काविळ झाली की मात्र हेच चांदणं पिवळं दिसतं. आता जिथं चांदणं पिवळं दिसतं तिथं पूर्णचंद्रही तर पिवळाच दिसणार! आता पूर्णचंद्र म्हणजे सद्गुरू तर चांदणं म्हणजे काय हो? चांदणं म्हणजे सद्गुरूंच्या भोवती असलेलं प्रसन्नतेचं, परम शांतीचं, परम आनंदाचं वलय. त्यांचा बोध, त्यांचा वावर, त्यांचं पाहणं-हसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं मौन.. हे सारं काही चांदणंच आहे. काविळीमुळे म्हणजे तर्कवितर्काच्या झंझावातात मी त्यांना पाहू लागतो तेव्हा मग कुतर्काची पकड अशी घट्ट होऊ लागते की पूर्णचंद्र आणि त्याचं चांदणं हे पिवळं दिसू लागतं. ‘लोक म्हणतात स्वामी स्वामी, पण ते गोडबोल्यांचे आप्पा हो,’ ‘स्वामी ना? सारखे आजारी असतात.. अशक्त असतात,’ ‘इतक्या क्षीण आवाजात बोलतात की ऐकण्यासाठी अगदी कान द्यावा लागतो’.. वेधली दिठी कवळें। ते चांदणियातें म्हणे पिवळें। तेविं माझां स्वरूपीं निर्मळे। देखाल दोष! मग जिथं दर्शन भ्रमित आहे तिथं त्यांचं सांगणं तरी गोड कसं वाटावं? नातरी ज्वरे विटाळलें मुख। तें दुधातें म्हणे कडू विख! मुळात विश्वासच नसेल तर मग बोध ऐकण्याची तरी खरी इच्छा कुठून असणार? स्वामींच्या दर्शनाला असाच एक नामवंत लेखकु निघाला होता. अर्थात त्याची इच्छा नव्हती, पण बरोबरच्या लोकांचं मन मोडवेना म्हणून तो निघाला होता. एसटीत तो म्हणाला, ‘मला ऐकू कमी येतं तेव्हा स्वामी मोठय़ांदा बोलले तर ठीक!’ स्वामी अतिशय क्षीण बोलत, तेव्हा ही अट घातली की ते बोलणार नाहीत आणि आपल्याला ऐकावंही लागणार नाही, हा हेतू. दरमजल करीत सर्वजण पावसला पोहोचले. स्वामींना देखला दंडवत घालून लेखकु उभा राहिला तेव्हा हसून स्वामींनी एकच वाक्य उच्चारले, ‘‘तुम्हाला ऐकू कमी येतं आणि मी तर मुकाच आहे!’’ तेव्हा मी जर दोषदृष्टीनं पाहू आणि ऐकू लागीन तर ते पाहणं आणि ऐकणं निर्थक आहे. व्यर्थ आहे. सत्यस्वरूपाची जाणीव करून देणारा तो बोध माझ्या भ्रामक स्वरूपावर आघात करीत असल्यानेच मला तो विषासारखा भासू लागतो. मग तो मला ऐकवत नाही. माझी अशी स्थिती असेल तर मग माझं बहिरेपण कमी होण्याची, माझा दृष्टिदोष दूर होण्याची सद्गुरूही वाट पाहतात! हे होऊ द्यायचं नसेल आणि ‘याचि देही याचि डोळा’ जर त्या बोधाचा लाभ घ्यायचा असेल तर आधी त्यांच्या स्वरूपाचं भान बाळगून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. मग त्यांचा बोध खऱ्या अर्थानं ऐकता तरी येईल. त्यावर चिंतन-मनन साधलं तर मग प्रत्यक्षात अमृतपान सुरू होईल! त्या अमृतपानाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी नित्यपाठाकडे आता परत वळू!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा