सद्गुरू गणेशनाथ देहरूपानं १९३३मध्येच दुरावले तरी आंतरिक सोऽहं भावात त्यांचं नित्यनूतन दर्शन होतंच. त्या सुमारास स्वामी पुण्यात राहात होते आणि वाङ्मय विशारद पदवीसाठीच्या शिक्षणातही व्यस्त होते. दहापैकी सहा विषयांची परीक्षा त्यांनी दिली होती आणि त्यात ते यशस्वीपणे उत्तीर्णही झाले होते. चार विषयांची परीक्षा ऑक्टोबर १९३४मध्ये होती. तिला चार-सहा महिन्यांचा अवधी होता. त्यामुळे पुण्यात राहून खर्चात भर पडण्यापेक्षा पावसला परतावे आणि तिथेच अभ्यास करावा, या विचाराने स्वामी पावसला परतले. आठ-पंधरा दिवस जातात न जातात तोच मलेरियाने ते आजारी पडले. शक्ती इतकी खालावत गेली की मृत्यू अत्यंत समीप आला आहे, असं तीव्रतेनं वाटलं. ‘मृत्यूच्या त्या विराट दर्शनानं एका झटक्यात काम-क्रोधादी विकारांचा चक्काचूर उडाला आणि अंत:करण भयानं व्यापलं गेलं. त्या भयातून भक्तीचा उदय झाला आणि भक्तीने चिरशांती प्राप्त झाली,’ असं स्वामींनीच लिहून ठेवलं आहे (चरित्र, पृ. १५०). स्वामींच्या प्रकृतीची ही अवस्था पाहून घरचेही काळजीत पडले. आई-वडिलांची प्रकृती वयोमानपरत्वे खालावत असताना पुत्रच इतका व्याधीग्रस्त झाला तर त्याची योग्य काळजी कोण घेणार आणि पथ्यपाणी सांभाळून त्याची शुश्रूषा कोण करणार, अशी चिंताही निर्माण झाली होती. स्वामींच्या सांगण्यावरून बाबा देसाई यांना बोलावले गेले. स्वामींच्या स्वावलंबनाश्रमात ते शिकले होते. त्यामुळे एकप्रकारे ते स्वामींचे विद्यार्थी होते. तसंच पुण्यात स्वामी वाङ्मय विशारद परीक्षेसाठी तयारी करीत असताना बाबा देसाई आयुर्वेद विशारद पदवीच्या शिक्षणासाठी त्यांच्यासोबत राहात होते. त्यामुळे दोघांत आता सख्यत्वाचाही बंध निर्माण झाला होता. बाबा देसाई आता आयुर्वेदतज्ज्ञ म्हणून सेवा करू लागले होते. दिलदार, उदार, नि:स्पृह आणि परोपकारी वृत्तीमुळे पावस आणि परिसरात देसाई घराण्याबाबत जनमानसात आदर व जिव्हाळा होताच. त्यामुळे बाबा देसाई स्वामींच्या शुश्रूषेसाठी घरी येऊ लागले तेव्हा घरच्यांनाही हायसं वाटलं. नंतरच्या सहा महिन्यांत स्वामींची प्रकृती अगदी तोळामासा झाली तरी सोऽहं ध्यान मात्र अंतरंगात पक्कं झालं होतं. जगन्माऊली सर्व काही करीत आहे, आपण निमित्तमात्र आहोत, हा अनुभवाचा विषय झाला होता. सहजसिद्धी मूकपणे सेवेत दाखल झाल्या होत्या. याच आजारपणात ‘अमृतधारा’ हे आत्मानुभव मांडणारं काव्यही लिहिलं गेलं. स्वरूपानंद हे नाव सद्गुरू गणेशनाथांनीच ठेवलं होतं. त्या नामानुसारच अभंग स्वरूपानंदात निमग्न अशीच त्यांची स्थितीही होती. सहा महिन्यांनंतर स्वामी आजारातून बरे झाले, पण पूर्ववत सुदृढ मात्र झाले नव्हते. इतकंच नव्हे तर योग्य काळजी घेतली गेली नाही, तर आजार पुन्हा उद्भवण्याची भीतीही घरच्यांना वाटत होती. अंगात थोडी ताकद आली होती. आहार थोडा नियमित झाला होता. हवापालट झाला तर प्रकृती अधिक चांगली होईल, असं अनेकांना वाटू लागलं. हवापालटाचं नुसतं निमित्त होतं, अनेकांच्या जीवनात खरा पालट साधण्यासाठी जगन्माऊलीचीच ती जणू योजना होती!

Story img Loader