स्वामी स्वरूपानंद सांगतात की, ‘‘..मनचि सुखदु:खां मूळ। सृष्टि केवळ मनोमय।। (स्वरूपपत्र मंजूषा, पत्र २४वे). सुख आणि दु:खांचं मूळ मनातच आहे. मनच सुखाची आणि दु:खाची जाणीव करून देतं. नव्हे ही समस्त सृष्टी मनोमयच आहे! आता ती मनोमय का, ते नंतर पाहू. पण ‘‘सुखीं संतोषा न यावें। दु:खीं विषादा न भजावें। आणि लाभालाभ न धरावे। मनामाजी।।’’ हा अभ्यास मनाच्याच पातळीवरचा असल्यानं त्या मनालाच हात घातल्याशिवाय हा अभ्यास काही साधणार नाही. तेव्हा सुख, दु:ख आणि मन याबाबतचा मागोवा घेताना श्रीनिसर्गदत्त महाराज आणि साधकांमधील काही प्रश्नोत्तरं प्रथम पाहू. त्यातून या मनाच्या अभ्यासाची दिशाही स्पष्ट होईल.
साधक – मला वाटतं माझा देह आणि माझं खरं स्वरूप यात काही गफलत नाही. काही गफलत आहे ती अंतर्देहात आहे. त्याला मन, जाणीव, अंत:करण किंवा आणखी काही म्हणा.
महाराज – तुमच्या मनाची काय गफलत झाली आहे असे तुम्हाला वाटते?
साधक – ते अस्वस्थ असते. ते आनंददायक गोष्टींसाठी आसुसलेले असते आणि दु:खदायक गोष्टींची त्याला भीती वाटते.
महाराज – सुखावह असेल ते शोधण्यात आणि दु:खकारक असेल ते टाळण्यात मनाची काय चूक आहे? सुखदु:खाच्या किनाऱ्यांमधून जीवनरूपी नदी वाहते. मन जेव्हा जीवन-प्रवाहाबरोबर न वाहतां किनाऱ्याला अडकून पडते तेव्हा मनाची समस्या निर्माण होते. जीवनप्रवाहाबरोबर वाहणे म्हणजे स्वीकार करणे. जे येणारे असेल ते येवो, जे जाणारे असेल ते जावो. अभिलाषा धरू नका, भयभीत होऊ नका. जसे काही प्रत्यक्ष घडेल तेव्हा त्याचे निरीक्षण करा. कारण जे काही घडते ते तुम्ही नाही. ज्याला ते घडते ते तुम्ही आहात.
०००
साधक – परमानंद अवस्थेचा अनुभव मला येतो पण ती अवस्था टिकत का नाही? या अवस्था कितीही विस्मयकारक असल्या तरी टिकत नाहीत. त्या येतात आणि जातात. त्या परत केव्हा येतील, हे सांगता येत नाही.
महाराज – जे मन स्वत:च अस्थिर आहे, त्यात कोणतीही अवस्था स्थिर कशी राहू शकेल?
साधक – मी माझे मन स्थिर कसे करू शकेन?
महाराज – अस्थिर मन स्वत:ला स्थिर कसे करू शकेल? अर्थातच ते जमणार नाही. भटकत राहणे हा मनाचा स्वभाव आहे. जाणिवेचा केंद्रबिंदू मनाच्या पलीकडे नेणे, एवढेच तुम्ही करू शकता.
साधक – माझ्या मनाशी चालणारा संघर्ष मला टाळता येईल का?
महाराज- होय, टाळता येईल. जीवन जसे सामोरे येईल, तसेच केवळ जगा, पण सावध, जागरूक असा. सर्व काही जसे घडेल तसे घडू द्या. नैसर्गिक गोष्टी नैसर्गिकपणे करा. जीवनप्रवाहातून येणारे दु:ख, आनंद नैसर्गिकपणे भोगा. हा देखील एक मार्ग आहे. (आत्मबोध, संकलन- श्रीकांत गोगटे, प्रकाशक- निसर्गदत्त अध्यात्म केंद्र). आता या बोधाच्या आधारेही ‘सुखी संतोषा न यावे’कडे वळू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा