आता अभिनव वाग्विलासिनी! देवी शारदेच्या स्तवनाला माऊली सुरुवात करतात. ही सुरुवात ज्या ‘आता’ शब्दानं आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो मूळ ‘ज्ञानेश्वरी’च्या व्यापक अंगानं न पाहता आपण ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’च्याच चौकटीपुरता जाणून घेऊ. स्वामी स्वरूपानंद यांनी या ओवीआधी जी ओवी निवडली तिच्याशी या ‘आता’चा सांधा जुळला आहे! आधीच्या ओवीत काय होतं? तर सद्गुरूस्तवन होतं आणि त्यांचा बोध जीवनात उतरल्याशिवाय खरं आत्मकल्याण नाही, असा संकेत होता. हे साधायचं तर प्रवृत्तीचं दास्य सोडून निवृत्तीचं दास्य पत्करायचा उपाय सांगितला होता. हा उपाय जरी सांगितला तरी साधकासाठी तो सोपा आहे का? नाही. याचं कारण साधकाचं जीवन द्वैतमय आहे. त्यात सुसंगती आहे आणि विसंगतीही आहे. त्यामुळेच हा बोध ऐकला खरा पण आता स्थिती काय आहे, याची उकल माऊली करीत आहेत! या आता नंतरचाच शब्दही फार विलक्षण आहे, तो म्हणजे अभिनव! हा शब्दच जगण्यातली सुसंगती आणि विसंगती सूचित करणारा आहे. अभिनवचा अर्थ आहे नित्यनूतन. या शब्दातच दोन टोकं आहेत पहा! जे नित्य आहे ते नूतन असू शकत नाही आणि जे नूतन आहे ते नित्य असू शकत नाही! तरीही जे नूतन भासतं, नवं भासतं त्याचा उगम मात्र नित्यातूनच, त्या शाश्वत तत्त्वातूनच झाला असतो! अभिनव या शब्दापुढच्या दोन शब्दांतूनच या नित्य आणि नूतन अशा दोन रूपांचा आणि त्या रूपांच्या अधिष्ठात्या शक्तीचा उल्लेख आहे. ही नित्यनूतन कोण आहे? नित्य आहे ती ‘वाग्विलासिनी’, नूतन आहे ती,  तिचंच दुसरं रूप असलेली ‘चातुर्यार्थकलाकामिनी’. या दोन्ही रूपांना शक्तीच्या दोन रूपांचं अधिष्ठान आहे. ती दोन रूपं म्हणजे श्री आणि शारदा!! आता याची थोडी उकल करू. वाग्विलासिनी म्हणजे प्रज्ञा. वाग् म्हणजे ईश्वरी वाणी. या वाणीत सदोदित रममाण असलेली शारदामाता ही प्रज्ञेची स्वामिनी आहे. या संपूर्ण चराचरात केवळ माणसाला या प्रज्ञेची देणगी लाभली आहे. ती देणगी देण्याचा हेतू एकमेव आहे की या प्रज्ञेच्या जोरावर तो ईश्वराचं जे खरं ज्ञान आहे, ते प्राप्त करू शकेल. दुर्लभ असं आत्मज्ञान त्याला सहज प्राप्त करून घेता येईल. या प्रज्ञेचा लाभ माणसाला त्यासाठी झाला. पण हा मूळ हेतू विसरून त्याच प्रज्ञेच्या स्वामिनीला त्यानं कलाकामिनी बनवलं! कलेची स्वामिनी बनवलं. कशासाठी? तर चातुर्यार्थ. चातुर्यानं आपले श्रम वाचविण्यासाठी, आपल्या मनोरंजनासाठी, आपलं जगणं सुखद बनविण्यासाठी! आज माणसानं विज्ञानात कित्येक शोध लावले आहेत आणि जीवन अधिक गतिमान, भौतिकदृष्टय़ा अधिक संपन्नही केलं आहे. आज जगाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला काही तासांत विमानानं जाता येतं. जगाच्या दोन ध्रुवांवरचे प्रेमीही थेट मोबाइलवरून एकमेकांशी बोलतात. दोन टोकांवरचे आप्त छोटय़ा पडद्यावर एकमेकांना पाहात गप्पाही मारतात. जगाला जवळ आणणाऱ्या या शोधांत रोज नित्यनवी भर पडते आहे, पण या नित्यनव्या शोधांना आधार काय असतो हो? तो असतो निव्वळ आणि निव्वळ प्रज्ञेचा!