स्वरूप साक्षात्कारासाठीचा जो अभ्यास आहे, त्याच्या पहिल्या पायऱ्या साधनमार्गावरील पांथस्थाला प्रभू सांगत आहेत. या पायऱ्या मांडणाऱ्या ओव्या, त्यांचा प्रचलित अर्थ आणि विशेषार्थ प्रथम पाहू, मग त्याच्या विवरणाकडे वळू. ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील क्रमानुसार या ओव्या अशा:
सुखीं संतोषा न यावें। दु:खी विषादा न भजावें। आणि लाभालाभ न धरावे। मनामाजी।।९।। आपणयां उचिता। स्वधर्मे राहाटतां। जें पावे तें निवांता। साहोनि जावे।।१०।। (२/२२६, २२८).
प्रचलितार्थ : सुखाच्या वेळी संतोष मानू नये. दु:खाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात आणू नये (९). आपल्याला योग्य असं जे स्वधर्माचं आचरण, ते करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाटय़ानं सहन करावा (१०).
विशेषार्थ : साधकाच्या मनावर प्रपंचाचा प्रभाव कायम असतो. प्रपंच हा द्वैतमय असल्यानं त्यात साधकाची मन:स्थितीही सदोदित द्विधा होत असते. मनोधर्माच्या मागे सुरू असलेली फरपट थांबावी आणि स्वरूपाकडे त्याला वळता यावं म्हणून प्रभू चार पायऱ्या सांगतात. (१) सुखानं आनंदी होऊ नका, (२) दु:खानं खचू नका, (३) लाभ आणि हानी यांचा प्रभाव मनात आणू नका, (४) जीवनातील विपरीत प्रसंगही सहन करा.
विवरण : भगवद्गीतेतील ज्या मूळ श्लोकाच्या अनुषंगानं माउलींनी ओव्या सांगितल्या आहेत तो मूळ श्लोक अर्जुनाला ‘ततो युद्धाय युज्यस्व’ अर्थात युद्धासाठी सज्ज हो, असं ठणकावून सांगणारा आहे. नुसतं सज्ज नव्हे तर, सुख-दु:ख, लाभ-हानी, यश-अपयश अर्थात जय वा पराजय यांची पर्वा न बाळगता युद्धास सामोरा जा, असं प्रभू सांगत आहेत. आता साधकाचं जीवन म्हणजेदेखील अंतर्बाह्य़ युद्धच नव्हे का? कसं असतं हे जगणं? प्रपंचाचा प्रभाव मनातून पूर्ण ओसरलेला नसतो. हा प्रपंच कसा आहे? तो द्वैतमय आहे. अर्थात त्यात सुख आहे तसंच दु:खंही आहेच. लाभ आहे तशीच हानीही आहेच. संयोग आहे, तसाच वियोगदेखील आहेच. हा द्वैतमय प्रपंच मी ‘माझा’ मानत असलो तरी त्याच्यावर माझी खरी सत्ता नाही. त्यामुळेच तर प्रपंच माझ्या मनाजोगता होईलच, याचा भरवसा नाही. तो मनाजोगता व्हावा, या एकमेव चिंतेनं माझं जीवन व्यापलं आहे. चिंतेचं एक कारण संपलं की दुसरं कारण लगेच उद्भवतं. स्वामी स्वरूपानंदही सांगतात, ‘‘तेणें एक चिंता निवाली। सवेंचि दुसरी सव्याज आली। चिंता चिंतेतेंचि प्रसवली। गुंतविती झाली अधिकाधिक।।’’ (स्वरूप-पत्र-मंजूषा, पत्र सहावे). म्हणजे एक चिंता दूर करावी तर दुसरी सव्याज वाटय़ाला येते. एका चिंतेतूनच दुसरी चिंता प्रसवते आणि मला प्रपंचात गुंतवून टाकते. प्रपंचातलं कुठलंही कर्म घ्या, आधी त्यात यश येईल की नाही, ही चिंता. अपयश आलं तरी चिंता आणि यश आलं तरी ते टिकेल की नाही, हीसुद्धा चिंताच! ते वाक्य आहे ना? चिता माणसाला एकदाच जाळते पण चिंता जन्मभर जाळते, ते खरंच आहे. मग या चिंतेच्या पकडीत घट्ट  आवळलेल्या आपल्यापर्यंत आपलं खरं स्वरूप नित्य, निराकार, आनंदमय आहे, हे शब्द पोहोचतील तरी का?

Story img Loader