सद्गुरू माझं संपूर्ण जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील. समस्त अपूर्णता त्या ज्ञानानंच ओसरेल आणि जीवन पूर्णतृप्त होईल. या प्रक्रियेत माझं कर्तृत्व काहीच नसलं तरी माझा सहभाग मात्र माझ्याच हिताचा आहे. मी त्या प्रक्रियेला अनुकूल राहण्यास आणि स्वत:त पालट घडवू देण्यास तयार झालो तर ती फार वेगानं होईल. मग माझा सहभाग म्हणजे काय? मी काय केलं पाहिजे? माऊली सांगतात की, सद्गुरूंचा जो बोध आहे तो त्यालाच ऐकता येईल जो निवृत्तीचा दास आहे. म्हणजे आपण निवृत्तीचं दास्य पत्करलं पाहिजे. आज आपण निवृत्तीचे नव्हे तर प्रवृत्तीचे दास आहोत. आपल्या मनाच्या प्रवृत्तीनुसार, आपल्या मतानुसार जगू पाहात आहोत. त्यावेळी माझं मत माझ्या तरी हिताचं आहे का, माझं मन माझ्या हिताच्या आड तर येत नाही ना, हे आपण तपासत नाही. मनाच्याच या खेळांमुळे जीवनातला कितीतरी वेळ आणि शक्ती वाया गेली आहे.  मनाच्या खोडय़ात अडकून श्रेयप्राप्तीसाठीची माझी वाटचाल खुंटली आहे. माझा आत्मसुखाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठीच सद्गुरूंचा बोध हा मनाच्या आवडी, सवयी तोडणाराच असतो. मनामागे फरपटणाऱ्या मला तो बोध मग कसा आवडणार आणि कसा ऐकवणार? ‘अवधारिजो’ म्हणजे ऐकणं. आता खऱ्या अर्थानं ऐकणं म्हणजे काय हो? एखादी गोष्ट ऐकणं हे श्रवणापुरतं मर्यादित राहिलं तर त्याला आपण खरं ऐकणं म्हणत नाही. त्या श्रवणानुसार कृतीही अनिवार्य असते. आपण एखाद्याला सांगतो, अमुक गोष्ट घेऊन ये. येताना तो विसरला तर आपण काय म्हणतो? अरे नीट ऐकत जा! कितीवेळा सांगितलं होतं, पण तू नीट ऐकतच नाहीस.. तेव्हा जो निवृत्तीचा दास होईल तोच हा बोध ऐकू शकेल म्हणजे त्यानुसार कृतीही करू शकेल. असं आचरण होऊ लागलं की आपल्या इंद्रियगणांचा स्वामी सद्गुरूच आहे, हे पक्केपणानं जाणवेल. मग एकाग्रतेनं सद्गुरूंच्या बोधाची धारणा जशी वाढेल तसतशी मती आत्मज्ञानानं पूर्ण प्रकाशित होईल. स्वामी स्वरूपानंदही म्हणतात- आत्मज्ञानें मुक्ति आत्मज्ञानें भक्ति। आत्मज्ञाने शांति मेळवावी।। मेळवाया शांति एक चि साधन। श्रीगुरू-चरण उपासावे।। उपासितां भावें श्रीगुरूचे पाय। प्रसन्न तो होय भाविकासी।। भाविकांसी तो चि देई आत्मज्ञान। शांति समाधान अखंडित।। (स्वरूप पत्र मंजुषा/ पद २३). दशेंद्रियं आणि अकरावं सर्वात प्रभावी इंद्रिय असलेल्या मनात अडकलेला जीव आत्मज्ञानाशिवाय या गुलामीतून मुक्त होऊ शकत नाही. आत्मज्ञानानेच मुक्ती, भक्ती, शांती मिळते. त्यासाठी एकच साधन आहे, श्रीसद्गुरूच्या चरणाजवळ अखंड राहावं म्हणजेच त्यांच्या पाऊलवाटेनं, त्यांनी सांगितलेल्या बोधाच्या वाटेनंच चालावं. समजा आपल्याला दिल्लीली जायचं आहे, पण आपण केरळच्या दिशेनं कितीही वणवण भटकलो तरी मुक्कामाला काही पोहोचणार नाही. म्हणजेच पूर्ण शांतीचा मुक्काम गाठायचा तर  ती ज्या सद्गुरूगम्य मार्गानं मिळते त्याच मार्गानं चाललं पाहिजे. त्यासाठी प्रवृत्तीचं दास्य सोडून निवृत्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. पण निवृत्त याचा अर्थ निष्क्रिय मात्र नव्हे. कसं ते आता पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा