साउली सरिसीच असे। परी असे हें नेणिजे जैसें। स्त्रियेचें तैसें। लोलुप्य नाहीं।। सावली बरोबरच असते, पण तिच्याकडे लक्ष नसतं. अगदी त्याचप्रमाणे स्त्रीमध्ये अनासक्ताचं मन आसक्त नसतं, असं माउली सांगतात. संतसाहित्यामध्ये स्त्रीदेहातील आसक्तीची निंदा अनेकवार येते. ‘आहे तरी असो दारा पुत्र धन। संसारीं गुंतून जाऊं नये।।’ असं स्वामी स्वरूपानंदही सांगतात. तेव्हा स्त्री, पुत्र आणि धन यातली आसक्ती सोडायला सांगताना स्त्रीला दुय्यम मानलं जातं का, असं कुणाच्या मनात येईल. तेव्हा हे स्पष्ट केलं पाहिजे की संतसाहित्यात स्त्रीदेहातील आसक्तीची जी निंदा आहे ती त्याच काळात शृंगारिक साहित्यात स्त्रीदेहाची जी मुक्तवर्णनं सुरू होती त्या पाश्र्वभूमीवरच पाहिली पाहिजे. त्याचबरोबर स्त्रीची आसक्ती धरू नका, हा सल्ला वाचताना इथे ‘स्त्री’ हा शब्द जीवनातील जोडीदार या प्रतीकात्मक अर्थानंच घेतला पाहिजे. पुरुषानं जसं स्त्रीमध्ये अडकू नये तसंच स्त्रीनंही पुरुषाच्या गुलामीत का अडकावं? ज्या आध्यात्मिक  प्राप्तीसाठी पुरुष संसारापलीकडे जाऊ इच्छितो, तीच इच्छा स्त्रीला असण्याचं स्वातंत्र्य का नसावं? घर-दार, मुलंबाळं, रांधणं-वाढणं एवढय़ापुरतंच तिचं तरी जीवन का असावं? तेव्हा संतांचा बोध हा सर्वासाठी समान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, माणूस हा सर्वाधिक आपल्या देहाशीच जखडला आहे. त्याची सुख-दु:खं, त्याची स्वप्नं, त्याच्या इच्छा या साऱ्या देहसुखाशीच संबंधित आहेत. कामवासनापूर्ती ही या देहसुखाची चरम सीमा मानली जाते. ही पूर्ती जीवनातील जोडीदाराकडून होत असल्यानं आणि ती सहजप्राप्य असल्यानं या नात्यात स्त्री आणि पुरुष हे दोघेही अत्यंत आसक्त असतात. त्या आसक्तीवर मात करण्यासाठीच हा सल्ला आहे. स्वामी स्वरूपानंद यांचं कोणतंही पत्र ‘जय माताजी’ लिहिल्याशिवाय पूर्ण होत नसे, रामकृष्ण परमहंस यांचं जीवनही दुर्गामयच होतं. ‘आई आई’ हा एकच मंत्र त्यांच्या तोंडून हृदयार्त वाणीनं बाहेर पडत असे. तरीही जेव्हा ते स्त्रीमध्ये आसक्त होण्याची निंदा करतात तेव्हा त्यांचा रोख स्त्रीला नाकारण्याचा, कमी लेखण्याचा, दुय्यम लेखण्याचा नसतो. आंतरिक स्थितीवर कोणतंही सावट नसावं. पुरुषाच्या अंतरंगावर स्त्रीदेहासक्तीचं जसं सावट नसावं त्याचप्रमाणे स्त्रीच्या अंतरंगावरही पुरुषवर्चस्वाचं किंवा पुरुषप्रधान संस्कारांनुरूप जगण्याचंही सावट नसावंच. तेव्हा या ‘सावली’च्या आसक्तीचा त्याग दोघांच्याही मनातून झाला पाहिजे. तर हे आवश्यक विषयांतर सोडून पुन्हा अनासक्ताच्या वर्णनाच्या पुढील ओवीकडे वळू. माउली सांगतात, ‘‘आणि प्रजा जे जाली। तियें वस्ती कीर आलीं। कां गोरुवें बैसलीं। रुखातळीं।।’’ वस्तीला आलेल्या वाटसरूंबाबत गृहस्थ जसा कर्तव्यापुरता व्यवहार करतो तसा समचित्त मुलाबाळांबाबतची कर्तव्यं यथायोग्य पार पाडतो, पण अपेक्षांनी त्यांच्यात गुंतत नाही. इतकंच कशाला? सावलीत बसलेल्या गुराढोरांबाबत झाड जसं उदासीन असतं, तसा हा अनासक्त पुरुष नात्यागोत्यातील लोकांना सावली म्हणजे आवश्यक तो आधार देतो, पण त्यांच्यातही आसक्ती ठेवून गुंतत नाही!  

Story img Loader