जे आपल्या खरं हिताचं नाही ते हिताचं वाटतं आणि त्याच्या प्राप्तीसाठीच आपण तळमळत राहतो, हेच जीवनातील दु:खाचं खरं मूळ आहे. जे अहिताचं आहे, तेच आवडतं आणि जे खऱ्या हिताचं आहे त्याची तीव्र नावड मनात असते, हेच दु:खाचं कारण आहे. तेव्हा माझ्या हिताचं काय आहे आणि माझ्या अहिताचं काय आहे, याची जाणच मला नसते. ती जाण श्रीसद्गुरूंमुळे येते. अर्थात नुसत्या ऐकीव शब्दांनी ज्ञान होत नाही. आचरणात आणून त्याची प्रचीती आल्याशिवाय त्याची सत्यता पटत नाही आणि ती कला सद्गुरूंशिवाय कुणीच शिकवू शकत नाही. ते आपल्या जीवनात प्रथम तसं आचरण करून दाखवतात. प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताच्या आधारावर मनाची स्थिरता कशी टिकवता येते, हे आपल्याच जीवनातून ते प्रथम दाखवतात. संतांच्या जीवनातही किती कष्ट होते, किती अपमान आणि यातना होत्या. तरीही भगवंताचा आधार त्यांनी कधी सोडला नाही. थोडी अडचण येऊ द्या, आपला विश्वास डगमगतो. तेव्हा हा आंतरिक विश्वास टिकावण्याची कला त्यांच्याच जीवनातून जाणता येते. पोहायला शिकणाऱ्या मुलाला पाण्यात पहिली उडी टाकताना भीती वाटत असते आणि पट्टीचा पोहोणारा सांगतो, ‘‘अरे तू उडी टाक, मी आहे. तू बुडणार नाहीस.’’ तेव्हा भीतीसकट तो उडी घेतो आणि मग दुसऱ्या खेपेस उडी मारताना भीती कमी झाली असते. श्रीनिसर्गदत्त महाराजही म्हणत की, ‘‘माझ्यावर विश्वास ठेवून पहिलं पाऊल तरी टाका, मग पुढची पावलं तुम्ही आत्मविश्वासानं टाकू शकाल!’’ तसा सद्गुरूंचा बोध ऐकून लगेच विवेकाचं पाऊल टाकलं जात नाही. पाण्यात पहिली उडी मारताना मनात जशी भीती असते तशीच भीती या संसारात सद्गुरूंच्या सांगण्यानुसार जगायला सुरुवात करताना असते. तसं जगण्याच्या पहिल्या पावलात भय असतं, अनिश्चितता असते, साशंकता असते. ते पाऊल टाकलं गेलं की मग पुढचं पाऊल टाकण्याचं बळ मनात एकवटू शकतं. त्यासाठी आधी, सद्गुरूंच्या सांगण्यानुसार मला जगायचं आहे, ही भावना व्हावी लागते. हृदयामध्ये संसाराच्या प्रेमाऐवजी सद्गुरूंचं प्रेम उत्पन्न व्हावं लागतं. लहानशी ठिणगी पाहता पाहता कचऱ्याचा ढीग जाळून टाकते. तशी सद्गुरूप्रेमाची लहानशी ठिणगी जरी उत्पन्न झाली तरी ती अंतरंगातला पसारा वेगानं नष्ट करू शकते. त्यासाठी ‘मज हृदयी सद्गुरू’ ही जाणीव सतेज व्हावी लागते. तसं झालं की विवेकाचा खरा अर्थ उकलेल. आपलं जगणं विवेकानुसार आहे की नाही, याची समज वाढेल. विवेकपूर्ण जगणं लगेच साधू लागेल, असं नाही. त्यासाठीच्या अभ्यासासाठी निदान मन अनुकूल तरी होईल. विवेकापाठोपाठ वैराग्य येईल. वैराग्यानं खरा भाव आणि खरी भक्ती उमलेल. विवेक, विरक्ती, भाव-भक्तीच्या अभावानं असलेलं जीवन किती रखरखीत असतं, त्याची जाण येईल. स्वामी स्वरूपानंद सांगतात, ‘‘अंतरीं विरक्ति नाहीं भाव-भक्ति। तयां अधोगति चुके चि ना।। लोळती शेणांत सुखें शेणकिडे। तैसे ते बापुडे प्रपंचात।। गुंतुनियां देहीं बुडाल संदेहीं। अंतीं तयां नाहीं समाधान।।
३५. आचरणयोग
जे आपल्या खरं हिताचं नाही ते हिताचं वाटतं आणि त्याच्या प्राप्तीसाठीच आपण तळमळत राहतो, हेच जीवनातील दु:खाचं खरं मूळ आहे.
First published on: 19-02-2014 at 03:56 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawroop chintan strength in the mind