साधकानं प्रवृत्तीचं दास्य सोडून निवृत्तीचं दास्य पत्करायला पाहिजे, मगच सद्गुरूंचा बोध खऱ्या अर्थानं मन ग्रहण करू शकेल आणि त्यानुरूप आचरण करू शकेल, असं माऊली सांगतात. अर्थात शब्दार्थानं हे उमगलं तरी कृतीतून ते साधणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. कारण, साधक द्वैताच्या कात्रीतून पूर्णपणे बाहेर आलेला नसतो. आत्मसुखाची इच्छा त्याच्या मनात असते, पण देहसुखाची गोडीही कमी झालेली नसते. उत्तुंग आध्यात्मिक तत्त्वांनी तो जसा भारावतो तितकाच भौतिकाच्या भपक्यानेही तो प्रभावित होतो. थोडक्यात मायेच्या तावडीतून तो पूर्ण बाहेर आलेला नसतो आणि त्यामुळेच शब्दार्थानं ज्ञान कितीही समजलं तरी त्याचं जगणं पूर्णपणे त्या ज्ञानाला धरून नसतं. हीच स्थिती सूचित करणारी आणि द्वैतातही भरून राहिलेल्या परमशक्तीला वंदन करणारी ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढली आणि तिसरी ओवी अशी आहे-
आतां अभिनववाग्विलासिनी। जे चातुर्यार्थकलाकामिनी। ते श्रीशारदा विश्वमोहिनी। नमिली मियां।। ३।। (१/२१).
प्रचलितार्थ :  आता, जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून, चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे व जिने हे सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो.
गूढार्थ  विवरण :  दरवेळी आपण प्रचलित अर्थ सांगून झाला की थोडक्यात गूढार्थ मांडतो आणि नंतर त्याचं विवरण करतो. या ओवीचा गूढार्थ मात्र शब्दाशब्दागणिक व्यापक आहे, त्यामुळे तो प्रथम थोडक्यात न मांडता आपण शक्य तितक्या विस्तृतपणे तो जाणून घेऊ आणि नंतर अखेरीस एकत्रितपणे पाहू. आता थोडं विषयांतर वाटेल, तरी सांगितलं पाहिजे. ‘ज्ञानेश्वरी’तला एक शब्दही मला कळत नसे. अजूनही तो कळतो, असा दावा नाही. ओवी कळल्यासारखं वाटावं आणि उत्साहाने तिचा अर्थ वाचावा तर आणखीनच गोंधळून जाई. आजही जातो. पण सर्वात गोंधळलो ते याच ओवीपाशी. हे श्रीशारदेचं स्तवन आहे, असा अर्थ प्रत्येकानं सांगितला होता. सरस्वती ही तर ज्ञानाची देवता. ज्ञान हे समस्त भ्रम दूर करतं आणि मोहातून बाहेर काढतं. मग या शारदेला माऊली ‘विश्वमोहिनी’ कसं म्हणतात, असा मोठा पेच मनात सलत होता. या जगावर ज्ञानाची कधीच मोहिनी नव्हती आणि नाही. मोहिनी ही मायेच्या प्रभावातून असते आणि जिथे शुद्ध ज्ञान आहे तिथे माया कशी असणार? त्यामुळेच ही ओवी वाचताना तिचा अर्थ उमगत नसल्याच्या जाणिवेनं व्यथित होत असे. मग वेड लागल्यासारखा ही एकमेव ओवी मनात सदोदित म्हणू लागलो आणि श्रीमहाराजांची प्रार्थनाही करू लागलो की हा अर्थ सांगा. एका बेडकीनं मोठा बैल पाहिला आणि नंतर त्या अजस्त्र प्राण्याचं वर्णन ती दुसऱ्यांना सांगू लागली. अजस्त्र म्हणजे कसा, या प्रश्नावर ती अंग फुगवून दाखवू लागली तरी बेडकी बिचारी किती ‘अजस्त्र’ होणार? तसा हा व्यापक अर्थ झळकला तरी माझ्या अल्पमतीला तो कितीसा कळला आणि तो शब्दांतून कितीसा पोहोचवता येणार, हा प्रश्नच आहे. तरी त्या अर्थाकडे वळू.