इंदिरा गांधी यांच्या काळातील मुंदडा ते आताच्या रॉबर्ट वढेरा प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यापासून  हरवलेली आहेत. आता सुखी राहायचे तर पंतप्रधानांना जमते तसे आपल्यालाही हरवून जाणे जमायला हवे. कोणत्या तरी प्रकरणाच्या कसल्या तरी फायली हरवल्या म्हणून आपण अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही.
हरवणे हा तसा कोणत्याही वस्तूचा स्थायिभावच. आणि जे जास्त महत्त्वाचे ते हरवण्याची शक्यताही जास्त. उदाहरणार्थ लहानपणी आपली आवडती खेळणी हरवतात. शाळा सुरू झाली की महत्त्वाचे ते बाल्य हरवते. आणि तारुण्य तर हरवण्याचाच काळ. कवितेच्या वहय़ा हरवतात, गुलाबाच्या पाकळय़ा हरवतात, पाऊस आल्यावर छत्री हरवते आणि छत्री सापडल्यावर कोणासाठी धरावी तर पाऊसच हरवतो. येथे जे हरवते ते आयुष्यभर आठवत राहते आणि पुढच्या गृहस्थाश्रमात तर सगळेच हरवते. रविवारची झोप हरवते, दोस्तांबरोबरच्या रात्रीच्या निवांत गप्पा हरवतात, कार्यालयात हरवायला हवे ते हरवत नाही आणि जे नको तेच नेमके हरवते आणि फुरसत आयुष्यभरासाठीच हरवते. यानंतर येणारे वार्धक्य तर आयुष्याने काय काय हरवले याचे स्मरणरंजन करायचा काळ. त्या टप्प्यावर बऱ्याचदा लक्षात येते ते हे की हाती जे काही लागले त्यापेक्षा हातातून निसटले त्याचीच यादी मोठी. परंतु आयुष्यात एकदा का काही हरवले एखादे की ते परत मिळेलच असे नाही. तेव्हा हरवणे हे आपल्या समाजजीवनाचे तसे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावयास हवे. इतके महत्त्वाचे की ते आपल्या भावकवितांतही दिसते. तेव्हा या सगळय़ाचा मथितार्थ इतकाच की हरवणे हे तसे आपल्या पाचवीलाच पुजलेले असते. आता नमनाला इतके घडाभर तेल हरवल्यानंतर हा विषय येथे का बरे काढला, असा प्रश्न पडून आमचे सुजाण वाचक त्रस्त झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हरवण्यास कारण की आपल्या मनमोहन सिंग सरकारच्या तावडीतून काही महत्त्वाच्या नस्त्या (फाइल या शब्दास नस्ती असे शासकीय मराठीत म्हणतात. पाहा- कोणतेही सरकारी कागद) हरवल्या असल्याचे वृत्त असून त्यामुळे बराच गहजब उडाल्याचे राजकीय जाणकार आणि बखरकार सांगतात. हे असे का व्हावे, आम्हास कळत नाही. ‘हे असे’ म्हणजे हरवणे नव्हे. तर काही हरवले म्हणून इतके परेशान का बरे व्हावे हे आम्हास कळत नाही. तर या सरकारी नस्त्यांमध्ये विस्तवाशी संपर्क आल्यावर काळीकुट्ट धूम्रवलये सोडणाऱ्या आणि दक्षिणेस राख नामक निरुपयोगी भुकटी मागे ठेवणाऱ्या कोळसा या विषयासंबंधात गुहय़ मजकूर होता असे म्हणतात. या गुहय़ मजकुराचा संबंध देशातील अनेक चिजा हरवण्यास जबाबदार असणाऱ्या महाजनांशी असल्याने या नस्त्या गायब होण्याने या महाभागांच्या कळपात आनंद व्यक्त झाला तर प्रामाणिकपणाचे सूक्ष्म अंश शिल्लक असणाऱ्या कारकून आदींना वैषम्य वाटले. परंतु अशा मंडळींची संख्या नगण्य असल्याने आणि लोकशाहीत बहुमताचा निर्णय मान्य करण्याची प्रथा असल्याने नस्त्यांचे हरवणे साजरे करणाऱ्यांची संख्या अधिक निघाली आणि परिणामी त्याबद्दल दु:ख व्यक्त करणाऱ्यांनी मौन पाळणे पसंत केले.
तेव्हा असे काही तरी हरवणे हे आपणास काही नवीन नाही. विशेषत: आपल्या भारतवर्षांला तर अशा हरवण्याचा उदात्त इतिहास आहे आणि आपण त्या इतिहासाचे पाईक असल्याचे भान प्रत्येक सुजाण नागरिकाने ठेवावयास हवे. अशा हरवण्यामुळे ज्या काही गोष्टी विसरणे समाजमनासाठी आवश्यक असते त्या विसरण्याची सवय आपणास लागते. हे फार मोठे राष्ट्रीय कर्तव्य आहे. उदाहरणार्थ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात मुंदडा नावाचे प्रकरण घडले होते. त्या प्रकरणाचा तपशील आपण योग्य पद्धतीने हरवला. त्याच इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा देऊन गरिबी सोडून राजकीय शत्रूंनाच कसे हटवले, याचे ज्ञान आपण हरवले. त्यांच्या काळातील आणीबाणीने आपणास अनेक गोष्टी अशाच हरवण्यास शिकवले. अन्यथा कोणी कोणापुढे कशासाठी लोटांगण घातले होते याचा अनावश्यक तपशील आपण चघळीत बसलो असतो. संजय गांधी यांच्या मारुती मोटारीबाबतही आपण अनेक  तपशील सुयोग्यपणे हरवून गेलो. इंदिरा गांधी यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या सरकारने पहिला निर्णय घेतला तो अणुऊर्जा आयोगातून जेआरडी टाटांना काढून टाकण्याचा. ते का, या प्रश्नाचे उत्तर आपण हरवले. तसे बरे चाललेल्या या सरकारात दुहेरी सदस्यत्व आदी मुद्दे अचानक येत गेले त्यामागे कोणत्या शक्ती होत्या त्याचा छडा लावण्याची गरज आपण हरवली. संजय गांधी यांचे विमान नक्की पडले कसे, ते आपणास कधीच कळले नाही. पुढे जर्नेलसिंग भिंद्रनवाले नावाच्या माथेफिरूस इतके महत्त्व कोणामुळे आले, ती मोलाची माहिती आपण हरवली. श्रीमती गांधी यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या धर्मनिरपेक्ष वगैरे राजीव गांधी यांना अयोध्येतील वादग्रस्त स्थळी रामाची पूजा करू देण्याची बुद्धी का झाली? विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजीव गांधी भ्रष्ट असल्याचा साक्षात्कार नक्की कधी झाला? काही बडय़ा उद्योगपतींवर छापे घातल्यानंतर आणखी बडय़ा उद्योगपतींवर विश्वनाथ प्रताप सिंग हे छापे घालणार असल्याचे कळल्यावर ते अचानक अर्थखात्यातून संरक्षण खात्यात कसे काय गेले? पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासारखा धूर्त राजकारणी राजीव गांधी यांच्यावर नजर ठेवण्याचे काम दोन हवालदारांना सांगण्याचा मूर्खपणा करेल का? देवेगौडांना पेंग का आवरायची नाही?
बाबरी मशीद नक्की पाडली कोणी? त्या वेळी नरसिंह रावांची भूमिका काय होती? काँग्रेसचेच एरवी मऊ मेणाहून असणारे मनमोहन सिंग अमेरिकेबरोबरच्या अणुकराराच्या प्रश्नावर शूरवीर कसे आणि का झाले? आणि मुळात भारताने अणुऊर्जा बनवूच नये असे मानणारी अमेरिका अचानक भारताबरोबर अणुकरार करायला कशी काय राजी झाली? या अणुकराराच्या बदल्यात आपण कशावर पाणी सोडले आणि किती अमेरिकी अणुऊर्जा कंपन्यांना किती लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाचे आश्वासन दिले? टू-जीतील निर्णय मंत्रिमंडळाने घेऊनदेखील आपणाला त्यातले काहीच माहीत नाही, असे सरकार कसे म्हणू शकले? राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी यांच्यावर कारवाई करण्यास सरकार ..आणि त्यातही काँग्रेस श्रेष्ठी.. का भीत होत्या? अनेक वादग्रस्त निर्णयांत कनिष्ठांवर कारवाई होते. पण वरिष्ठ का आणि कसे सुटतात? नैसर्गिक वायूला २०१४ सालातील एप्रिलपासून किती भाव द्यावा याचा निर्णय सरकार आताच कसा काय करू शकते? त्यामुळे कोणत्या कंपन्यांचा किती फायदा होणार आहे, हे जनतेस सांगितले जाते का? सोनिया गांधी यांचा एकटीचाच जावई इतका भला का? तो इतका थोर निपजावा की  त्याला बडय़ा कंपन्यांनी आधी पैसे द्यावेत आणि मग जागा द्यावी?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यापासून हरवलेली आहेत. त्याची कोठे आपणास चाड असते? त्यामुळे यातल्याच काही प्रश्नांची उत्तरे ज्यात दडली आहेत, अशा नस्त्या हरवल्या म्हणून बिघडले कोठे? इतके काही हरवले आहे आपल्याकडे की त्यात आणखी दोन-चार कागद हरवले तर इतका बभ्रा व्हायचे कारणच काय? मुंबईतल्या आदर्शची नस्ती अशीच हरवली. मुंबईच्याच महापालिकेच्या तावडीतूनही हजारो नस्त्या गायब झाल्यात म्हणे. देशाचे काय हरवले आहे या हरवाहरवीमुळे? या हरवण्याचे महत्त्व समजल्यामुळेच पंतप्रधान मनमोहन सिंग अलीकडे हरवल्यासारखे दिसतात. त्यांच्या सुखी आणि समाधानी असण्याचे रहस्य हे या अशा हरवण्याच्या दुर्मीळ गुणात आहे, अशी आमची खात्री आहे. सुखी राहायचे तर पंतप्रधानांना जमले तसे आपल्यालाही हरवून जाणे जमायला हवे. तेव्हा उगाच कोणत्या तरी प्रकरणाच्या कसल्या तरी फायली हरवल्या म्हणून आपण अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही.
म्हणूनच यातून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतला तसा हरवण्याचा धडा आपणही घेऊ आणि सुखी, समाधानी होऊ. तेव्हा चला आपण हरवून जाऊ या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा