जैन धर्मातील दिगंबर आणि श्वेतांबर या दोन पंथांच्या लाखो अनुयायांनी जयपूर येथे पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने एकत्र यावे, ही एक महत्त्वाची घटना आहे. पर्युषण म्हणजे पुन: पुन: उषणम्. आत्म्यामध्ये पुन:पुन्हा स्थिर होणे. हे आत्मसाधनेचे पर्व. चातुर्मासात ते केले जाते. पण दिगंबर आणि श्वेतांबरांचे ते साजरे करण्याचे दिवस आणि काळही वेगळे असतात. दिगंबर ते दहा, तर श्वेतांबर आठ दिवस साजरे करतात. हे बदलावे, सगळ्यांनी एकत्र येऊन हा आत्मशुद्धीचा महोत्सव साजरा करावा असे प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून सुरू होते. ‘ना आठ, ना दस, अथारा को याद रखो बस,’ अशी घोषणा दिगंबर संत तरुणसागरजी महाराज आणि श्वेतांबर संत ललितप्रभूजी महाराज यांनी दिली होती. त्याला प्रतिसाद म्हणून यंदा २ ते १९ सप्टेंबरदरम्यान दोन्ही पंथांचे अनुयायी हे महापर्व साजरे करीत आहेत. हे असे अडीच हजार वर्षांत पहिल्यांदाच घडत आहे. याचा अर्थ यापूर्वी ते एकत्र येऊन उत्सव साजरा करीत नव्हते असा नव्हे. श्रवणबेळगोळ येथे दर १२ वर्षांनी महामस्तिकाभिषेक उत्सव होतो. दोन्ही पंथांचे अनुयायी त्यात सहभागी होत असतात. मात्र पर्युषणपर्वासाठी दोन्ही पंथ पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. ही घटना ऐतिहासिक तर आहेच, पण भविष्यावरही परिणाम करू शकणारी आहे. आणि म्हणूनच तिचे महत्त्व नेमके कशात आहे ते समजून घेतले पाहिजे. असे म्हणतात की प्रत्येक धर्म शांततेचा संदेश देतो. माणसाने माणसांवर प्रेम करावे असे सांगतो. हे खरेही आहे. त्यात समस्या एवढीच असते, की व्यवहारात हे सगळे केवळ त्या-त्या धर्माच्या अनुयायांपुरतेच सीमित असते. म्हणजे हिंदू हिंदूंवरच प्रेम करणार आणि मुसलमानांची दया-क्षमा-शांती मुसलमानांपुरतीच असणार. एवढेच नव्हे, तर एकाच धर्मातील भिन्न पंथांचेही एकमेकांशी पटत नसते. हे काही आजचे नाही. हजारो वर्षांपासून हे चालत आले आहे. दिगंबर आणि श्वेतांबर यांना पर्युषणासाठी एकत्र येण्यास अडीच हजार वष्रे लागावीत, हे लक्षणीय आहे. त्यांच्यात मतभेदाचे जे मुद्दे आहेत, ते बहुतांशी धर्माच्या बाह्य़स्वरूपाशी निगडित आहेत. जैन हे मूलत: अिहसावादी तत्त्वज्ञान असल्याने या अशा मतभेदांमुळे त्यांनी एकमेकांवर तलवारी धरल्याचा इतिहास नाही. त्याचे एक कारण जैनांच्या अनेकांतवादी धारणेतही असावे. मात्र ख्रिश्चनांमधील कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट, इस्लाममधील शिया, सुन्नी, अहमदिया, शिखांमधील अकाली, खालसा, निरंकारी, हिंदूंमधील शैव, वैष्णव यांच्या इतिहासाची काही पाने प्राय: रक्ताने भरलेली आहेत. त्यांच्यातील वाद हे वरवर धर्मतत्त्वांविषयीचे वाटत असतात. परंतु खोलवर पाहता त्यामागे व्यवहारातलेच मुद्दे दिसतात. जगातल्या मुस्लिमांनो एक व्हा, अशी हाक देणारेसुद्धा धर्मधर्मातरीची भांडणेही सोडवू शकत नाहीत आणि हिंदूंमध्ये चारऐवजी ३२० शंकराचार्याची फौज उभी होते आणि शाब्दिक लाथाळ्यांतच रमते, याची कारणे अंतिमत: भौतिक आहेत. जैन धर्माचे अनुयायी एकत्र आले म्हणजे त्यांनी एकमेकांची मते मान्य केली असा होत नसतो. त्याचा अर्थ मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवूनही व्यवहारात एकत्र येता येते असा होत असतो. अन्य धर्माभिमान्यांनी ही बाब लक्षात घेतली तर बरेच प्रश्न आपापत: सुटतील.
पंथीय अस्मिता, धर्म आणि व्यवहार
जैन धर्मातील दिगंबर आणि श्वेतांबर या दोन पंथांच्या लाखो अनुयायांनी जयपूर येथे पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने एकत्र यावे, ही एक महत्त्वाची घटना आहे.
First published on: 17-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sectatrian identity religion and behavior