इस्तंबूलमधील एका सार्वजनिक बागेतील झाडे तोडण्याचे साधेसे कारण. पण गेल्या सोमवारी त्यातून ठिणगी पडली आणि आज संपूर्ण तुर्कस्तान पेटला आहे. अनेक शहरांमध्ये निदर्शने, हिंसक आंदोलने सुरू आहेत. तुर्कस्तानचे पंतप्रधान रिजेप तय्यिप एर्दोगन यांच्याविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांचा निर्मम लाठीमार, अश्रुधूर यामुळे १,७०० लोक जखमी झाले आहेत. १७५० जणांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. तरीही लोकांचा संताप शांत होण्याची चिन्हे नाहीत. तीन वर्षांपूर्वी टय़ुनिशियात निर्माण झालेल्या आणि इजिप्त, लिबिया, येमेन, बहारिन अशा अनेक देशांना कवेत घेतलेल्या ‘अरब स्प्रिंग’च्या मार्गाने तुर्कस्तानातील आंदोलन जाते की काय, अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. स्वत: एर्दोगन यांना मात्र तसे वाटत नाही. देशातील जनभावनांचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहत आहे, याचे भान नसल्याचाच हा परिणाम. सत्ता अधिक काळ हाती असली की सत्ताधारी लोकांपासून तुटत जातात आणि आपण हुकूमशहा कधी बनलो हेही त्यांना कळत नाही. एर्दोगन यांचे तेच झाले आहे. त्यांच्या सरकारने विविध शहरांमध्ये बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत इस्तंबूलमधील एका भागात त्यांना एक चकचकीतमहादुकान बांधायचे आहे. त्यासाठीच शासकीय अधिकाऱ्यांनी तेथील एका बागेतील झाडांची कत्तल केली. आधीच प्राचीन इस्तंबूल सिमेंटचे जंगल झाले आहे. त्यात तेथील बागांवरही कुऱ्हाडी चालविल्या जाऊ लागल्या. त्यामुळे रहिवासी खवळले. त्यांनी आधी तेथे धरणे आंदोलन केले. सरकारने ते पोलिसांच्या मदतीने चिरडण्याचा प्रयत्न केला. एरवी हे आंदोलन चिरडलेही गेले असते. कारण त्याची दखल कोणी घेतलीच नाही. तुर्कस्तानातील प्रसारमाध्यमांनी केव्हाच सरकारपुढे गुडघे टेकलेले आहेत. ती इतकी लाचार झाली आहेत, की आज हे आंदोलन एवढे पेटलेले असताना, सीएनएनसारख्या चित्रवाणी संस्थेची तुर्कस्तान वाहिनी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. अन्य वाहिन्यांची तर बातच नको. मुख्य प्रवाहातील माध्यमे अशी वाळूत तोंड खुपसून बसली असली, तरी समाज-माध्यमे मात्र गप्प नाहीत. किंबहुना एका साध्या धरणे आंदोलनाला फेसबुक, ट्विटर या समाज-माध्यमांनी देशव्यापी चेहरा दिला. झाडे वाचविण्यासाठी सुरू झालेली चळवळ देशाची धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठीचे, सरकार हटविण्यासाठीचे आंदोलन बनले. त्यामुळेच एर्दोगन या समाज-माध्यमांवर प्रचंड चिडलेले आहेत. ट्विटर म्हणजे शाप आहे अशा शब्दांत त्यांनी त्यावर टीकेची झोड उठवली. ही माध्यमे पूर्णत: नियंत्रणमुक्त असल्याने तेथे स्वातंत्र्याचा अर्थ अनेकदा स्वैराचार होतो, कुणालाही उत्तरदायी नसल्याने गोबेल्सी प्रचारही होतो, हे खरेच. पण तो या माध्यमांचा अंगबाह्य परिणाम आहे. त्यांचे खरे बळ लोकांना व्यक्त होण्यास स्वतंत्र, अ-व्यापारी व्यासपीठ देणे हे आहे. या माध्यमांस लक्ष्य करण्यात अर्थ नाही. लक्ष द्यायचे असेल, तर त्यांतून येणाऱ्या संदेशाकडे द्यायला हवे. तुर्कस्तानातले लोक आज वैयक्तिक जीवनातील सरकारी हस्तक्षेपास वैतागले आहेत. निम्मा तुर्कस्तान हा स्वत:ला युरोपचा भाग मानणाऱ्यांचा देश आहे. अशा देशात दारूबंदी लादणे, गर्भपातविरोधी वक्तव्ये करणे आणि त्यांना धर्माचा मुलामा देणे, असे धर्मनिरपेक्षतेवरील आक्रमण तुर्की मध्यमवर्गाला सहन होण्यासारखे नाही. खरे तर एर्दोगन सरकारच्या प्रयत्नांमुळेच तुर्कस्तान आर्थिक मंदीच्या वादळातही ठाम उभे आहे. पण लोकांना केवळ भाकरीच नको असते. त्यांना स्वातंत्र्याचा चंद्रही हवा असतो. नेमके तेथेच एर्दोगन सरकार घसरले आहे. तुर्कस्तानातील सध्याचे आंदोलन हा तेथील सरकारच्या धार्मिक नीतिमत्तावादी धोरणांचाच परिणाम आहे.