विराट वृक्षाचं बीज पेरताक्षणी काही जमिनीतून विराट वृक्ष उगवत नाही! बीज पेरणाऱ्याच्या आणि झाडाची निगा राखणाऱ्याच्या वाटय़ाला झाडाची फळं येत नाहीत.. पुढल्या आणि अनेकदा तर त्याही पुढल्या पिढय़ांना ती फळं चाखायला मिळतात.. पण फळं आपल्याला चाखायला मिळणार नाहीत, मग कशाला बीज पेरा, असा विचार कुणी केला तर? तुकाराम महाराजांच्या वंशजांनी भक्तीचं बीज पेरलं आणि त्या भक्तीचा विराट वृक्ष तुकाराम महाराजांच्या जीवनात बहरला.. हृदयेंद्रच्या या चित्रदर्शी शब्दांतून जणू प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर भक्तीचा तो बहरलेला वृक्ष उभा ठाकला होता. त्या दर्शनात स्वत:ही रमलेला हृदयेंद्र मग सांगू लागला..
हृदयेंद्र – तुकाराम महाराज अखेरच्या चरणात काय सांगतात? की, वंशपरंपरा दास मी अंकिता। तुका मोकलितां लाज कोणा।। म्हणजे तुझं दास्य वंशपरंपरेनं माझ्याकडे आलं आहे.. मी तुझा अंकित आहे.. आता मला जर दूर केलंस तर कुणाची लाज निघेल, हे तूच बघ!
तोच हृदयेंद्रचा मोबाइल वाजला. आध्यात्मिक चर्चा सुरू झाली की तो खरंतर मोबाइल बंदच ठेवत असे. याचवेळी त्याचा विसर पडला आणि मोबाइल पाहाताच त्याचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. ‘ज्ञान्या बुवांचा फोन आहे..’ तो म्हणाला आणि मग बोलू लागला. चौघं मित्रं एकत्र आहेत आणि अभंगांवर चर्चा सुरू आहे, हे ऐकून बुवांना आनंद वाटला असावा. सध्या नामदेवांचे पुत्र नारा महाराज यांच्या अभंगावर चर्चा सुरू आहे, असं हृदयेंद्र म्हणाला आणि तो अभंगही त्यानं ऐकवला.. पुंडलिका द्वारीं होतसे वेव्हार। नामयाचीं पोरें भांडतातीं।। येऊनियां चौघे उभे ठेले सत्वर। बोलतातीं पोरे नामयाची।। आमुचा अंकीं लागताती पुराणीं। नामयाचे ऋणी बांधलासी।।नामयाचा नारा बैसलासे द्वारीं। विठोबावरी आळ आला।।.. नंतर त्या अनुषंगानं तुकाराम महाराजांच्या ‘माझ्या वडिलांची मिरासी’ या अभंगावर झालेली चर्चा त्यानं थोडक्यात सांगितली. बुवा तिकडून काहीतरी सांगत होते आणि उत्सुकतेनं हृदयेंद्र ते ऐकत होता. ‘असं? बरं.. मी पाहातो.. हो हो..’ असं तो शेवटी म्हणाला. मोबाइल ठेवून त्यानं पुन्हा गाथा हातात घेतली. त्याच्याकडे पाहात ज्ञानेंद्रानं विचारलं..
ज्ञानेंद्र – काय सांगितलं बुवांनी?
हृदयेंद्र – (काहीसं गोंधळून) अरे ज्ञान्या तुला फोन द्यायला विसरलोच बघ..
ज्ञानेंद्र – (हसत) असू दे.. माझ्या ओळखीचे असले तरी तुझ्या जवळीकीचे झाल्येत ते! पण काय बोलले ते तर सांग.. तू काय शोधतोयस?
ज्ञानेंद्र – त्यांनी तुकाराम महाराजांचाच आणखी एक अभंग पहायला सांगितला.. त्याच्या आधारानं नारा महाराजांच्या अभंगाची उजळणीच होते, असं म्हणाले.. (गाथेची सूची चाळत पुटपुटतो.. आमुचा तू ऋणी.. आमुचा तू ऋणी.. मग आनंदून) हं मिळाला.. अभंग क्रमांक पंधराशे पन्नास.. ऐका.. आमुचा तूं ऋणी ठायींचाची देवा। मागावया ठेवा आलों दारा।। वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं। धरियेलें चित्तीं दृढ पाय।। बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं। आंतूनि बाहेरी येवों नेदीं।। तुजमज सरी होईल या विचारें। जळो भांडखोरें निलाजरीं।। भांडवल माझें मिरविसी जनीं। सहस्त्र वोवणी नाममाळ।। तुका म्हणें आम्हीं केली जिवें साठी। तुम्हां आम्हां तुटी घालू आता।। या अभंगाचा अर्थ खाली दिला आहे तो वाचतो..
योगेंद्र – वा! नामदेव महाराजांची मुलंही विठ्ठलाच्याच दारी भांडायला उभी ठाकली होती इथे तुकाराम महाराजही देवाला सांगताहेत की तू आमचा ऋणी आहेस! आमचा तो ठेवा परत घ्यायला आम्ही आलो आहोत.. पहिल्या चरणाचा अर्थ तर लगेच कळतोय, पण पुढल्या सर्व चरणांत विठ्ठलाची आळवणीही आहे आणि काही कठोर शब्दही आहेत, पण ते विठ्ठलासाठीच आहेत का, हे समजत नाही.. आणि जो ऋणी आहे त्याची आळवणी कशी काय? गोंधळ वाटतोय थोडा..
कर्मेद्र – त्यासाठीच हृदू अर्थ वाचतोय ना?
योगेंद्र – खाली अर्थ असतो, पण गूढार्थ नसतो रे..
कर्मेद्र – एवढं जर होतं तर फोनचा स्पीकर सुरू करून बुवांशीच बोलता आलं नसतं का? जरा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा! तेच सांगतील की गूढार्थ!
चैतन्य प्रेम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा