सहजासहजी कोणतेही यश मिळविता येत नाही. त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अंगी आत्मविश्वास असावा लागतो. तरच अनेक अडथळ्यांवर मात करून यशाला गवसणी घालता येते, हे मॅग्नस कार्लसन आणि लुइस हॅमिल्टन यांनी जगज्जेतेपदावर मोहोर उमटवत दाखवून दिले. मुळातच वयाच्या तिशीच्या आत फॉम्र्युला-वनमध्ये खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात येत असते, तर बुद्धिबळात वयाचे कोणतेही बंधन नसते. पण कार्लसनने २३व्या वर्षी, तर हॅमिल्टनने २९व्या वर्षी दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. गेल्या वर्षी कार्लसनने अफाट गुणवत्ता, उत्तम तयारी आणि विश्वनाथन आनंदच्या खेळाचा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे पाच वेळा विश्वविजेत्या आनंदला १०व्या चालीपर्यंत मात देण्यात कार्लसनला फारसे कष्ट पडले नाहीत. मात्र या वर्षी कार्लसनच्या खेळाचा आनंदने बारकाईने अभ्यास केला होता, हे त्याच्या खेळातून जाणवत होते. दुसऱ्या डावात कार्लसन विजयी ठरला, त्या वेळी आनंद पुन्हा एकदा निष्प्रभ ठरणार असे, दिसू लागले होते. पण तिसऱ्या डावात चोख प्रत्युत्तर देऊन आनंदने कार्लसनवर सरशी साधली. तब्बल १४६२ दिवसांनंतर आनंदने कार्लसनवर विजय मिळवण्याची करामत साधली होती. त्यानंतरच्या प्रत्येक डावात आनंद वरचढ होता. संगणकाविरुद्धही विजय मिळवणारा आणि अफाट गुणवत्ता लाभलेला कार्लसन बुद्धीच्या या खेळात आनंदविरुद्ध हतबल झाला होता. नंतर मात्र कार्लसनने स्वत:ला सावरले. सहाव्या डावात विजय मिळविल्यामुळे कार्लसनकडे एक गुणाची आघाडी होती. पण आनंदची उत्तम तयारी आणि भन्नाट चालींमुळे कार्लसनचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला होता. कार्लसनच्या प्रत्येक चालीला आनंद चोख प्रत्युत्तर देत होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळची जगज्जेतेपदाची चुरस आणखीनच वाढली होती. पण बुद्धिबळ या खेळात एक छोटीशी चूक किती महागात पडते, हे आनंदला कळून चुकले. दुसऱ्या आणि ११व्या डावात केलेली छोटी चूक आनंदला भोवली. त्याउलट चुका करूनही आत्मविश्वासाने डाव बरोबरीत सोडवण्याची क्षमता असलेला कार्लसन वयाच्या २३व्या वर्षी दुसऱ्यांदा जगज्जेता ठरला. कार्लसनने यापुढे आपल्यालाही तयारी करावी लागेल हे मान्य केले. फॉम्र्युला-वन हा कार रेसिंगमधील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्य यांचा सुरेख मिलाफ. हॅमिल्टन आणि त्याचा सहकारी निको रोसबर्ग यांच्यासाठी मर्सिडिझ संघाने अमाप पैसा खर्च करत अभियंत्यांची मोठी फौज कामाला लावत सर्वोच्च तंत्रज्ञान असलेल्या कार बनवल्या होत्या. त्यामुळे गेली सलग चार वर्षे विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवणाऱ्या रेड बुल आणि सेबॅस्टियन वेटेलचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. मोसमाच्या सुरुवातीपासूनच अनेक शर्यतींची जेतेपद मिळवणाऱ्या हॅमिल्टन आणि रोसबर्ग यांच्यातच विश्वविजेतेपदाची खरी शर्यत रंगली होती. मोसमातील २०पैकी ११ शर्यतींमध्ये हेच दोघे पहिल्या दोन क्रमांकावर होते. या वर्षीपासून बदललेल्या नियमांमुळे हॅमिल्टनचे जगज्जेतेपद लांबणीवर पडले. अखेरच्या शर्यतीत दुहेरी गुणांचा बोनस असल्यामुळे रोसबर्गला विश्वविजेता होण्याची संधी होती. या शर्यतीत हॅमिल्टन १७ गुणांनी आघाडीवर असला तरी रोसबर्गला जेतेपदाचा वहिवाटदार मानले जात होते. फॉम्र्युला-वनमध्ये पहिल्या क्रमांकावरून सुरुवात करणारा ड्रायव्हर बहुतांशी विजयी ठरत असतो. पण शर्यतीपूर्वी रोसबर्गच्या टीकेला कोणतेही प्रत्युत्तर न देता पहिल्याच वळणावर हॅमिल्टनने त्याला मागे टाकले. अर्थात, रोसबर्गच्या कारच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे हॅमिल्टनला सहजपणेच शर्यतीचे जेतेपद मिळवता आले. परंतु जगज्जेतेपद त्याला मिळण्यासाठी हे एवढेच कारण नव्हते. या शर्यतीसाठी आपण कोणतीही तयारी केली नव्हती, या प्रतिक्रियेतून हॅमिल्टनचा उंचावलेला आत्मविश्वास दिसला आहे.. त्याचा गाफीलपणा नव्हे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा