राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी व्याकूळ झालेल्या सोनिया गांधी यांनी आंध्र विभाजनाचा निर्णय घेतला हा जगन रेड्डी यांचा आरोप तर्काच्या पातळीवर टिको वा न टिको, मात्र युवराज राहुलबाबा विरुद्ध युवराज जगन यांच्यातील या संघर्षांत घराणेशाहीचा काँग्रेसी वग नव्या मंचावर रंगू लागल्याचे दिसत आहे.
आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्याच्या निर्णयामुळे जगन रेड्डी यांना फारच सात्त्विक संताप आलेला दिसतो. त्यांचे म्हणणे असे की राज्य विभाजनासारख्या महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना जी एक किमान प्रक्रिया पाळली जाणे आवश्यक होते ती पाळण्यात आलेली नाही आणि केवळ-आले काँग्रेस  श्रेष्ठींच्या मना.. या पद्धतीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे. जगन हे काही काळ का होईना काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष कसा चालतो याचा त्यांना अनुभव असणारच. तेव्हा काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेविषयी ते जेव्हा काही टीका करतात तेव्हा ती ग्राह्य मानण्यास त्या पक्षाच्या भाटांचाही प्रत्यवाय नसावा. राज्य विभाजन करण्याचा निर्णय वा त्या बाबतचा ठराव आंध्र प्रदेश राज्य विधानसभेने मंजूर केलेला नाही. तेव्हा ज्यास राज्य सरकारनेदेखील अद्याप मान्यता दिलेली नाही. तो निर्णय राज्यावर लादायचे कारणच काय, असे त्यांचे म्हणणे. त्यात निश्चितच तथ्य आहे. यावर काँग्रेस शहाजोगपणाची भूमिका घेत निर्णयाचे समर्थन करू शकेल. परंतु त्याबाबतही ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी या नात्याने जगन यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, ते रास्तच आहेत. जगन यांचे म्हणणे असे की राज्य विभाजनाबाबत केंद्र इतके आग्रही असेल आणि तो त्या दृष्टीने केंद्राचा धोरणात्मक निर्णय असेल तर ज्या राज्यांनी आपापल्या प्रदेशांच्या विभाजनाचे जे निर्णय घेतले आहेत, त्यांची प्रथम अंमलबजावणी व्हायला हवी. त्यांनी या संदर्भात बोडोलँड आदीचा दाखला दिला आहे. जगन यांचा युक्तिवाद बिनतोड आहे. त्यांच्या प्रतिपादनाचा अर्थ असा की जी राज्ये विभाजनासाठी तयार आहेत, त्यांच्याबाबत काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला काही करावयाचे नाही आणि जी राज्ये तयार नाहीत तेथे मात्र थेट राज्य विभाजनाचाच काँग्रेसचा आग्रह आहे. जगन रेड्डी तेथेच थांबावयास तयार नाहीत. आंध्र विभाजनाचा घाट सोनिया गांधी यांनी चि. राहुलबाबा गांधी यांना पंतप्रधानपदी बसवता यावे या उद्देशानेच घातला असे जगन यांचे म्हणणे. ते खोडून काढताना काँग्रेसने आंध्र विभाजनाचा आम्हाला काहीही राजकीय लाभ नाही, असा खुलासा केला. पण त्यात जोर नाही. कारण आंध्रतील घडामोडी घडवून आणण्यात राजकीय हेतू नाही, असे काँग्रेस म्हणू शकत नाही. जगन रेड्डी यांच्या अतिरिक्त संपत्तीची चौकशी असो वा त्यांना १६ महिन्यांनी मिळत असलेल्या जामिनाच्या पाश्र्वभूमीवर तेलंगण निर्मितीचा मंत्रिमंडळाचा निर्णय असो. दोन्हीतही एक कोणती गोष्ट समान असेल तर ती म्हणजे राजकारण. तेव्हा या संदर्भात जगन यांचे आरोप खोडून काढणे हे सोनिया समर्थकांनाही शक्य होणार नाही.
परंतु यातील गंभीर मुद्दा हा की जगन जे काही बोलत आहेत वा करू इच्छितात त्या मागे राजकारण नाही, असे तेही म्हणू शकत नाहीत. जगन वा अन्य काही प्रमुख नेत्यांचा आंध्र विभाजनास विरोध आहे तो केवळ हितसंबंधीयांच्या राजकारणामुळेच. जगन यांचे तीर्थरूप वाय. एस. राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी हैदराबादच्या परिसरात प्रचंड प्रमाणावर जमिनीत गुंतवणूक केलेली आहे. आंध्रचे विभाजन झाले तर ही सारी गुंतवणूक ही नव्या तेलंगणात जाईल. म्हणजे नेतृत्व करावयाचे ते आंध्रचे आणि जमीनजुमला तेलंगणात अशी अवस्था अनेक नेत्यांची होणार आहे. त्यात जगन रेड्डी हेही एक आहेत. तेव्हा त्यांच्या तेलंगणनिर्मिती विरोधात काही तत्त्वाचे राजकारण आहे, असे अजिबात नाही. वायएसआर रेड्डी हे आपल्या जमीनदारी वृत्तीसाठी आणि या वृत्तीसमवेत येणाऱ्या अन्य बऱ्याच दुर्गुणांसाठी कुख्यात होते. परंतु त्यांची आंध्रच्या राजकारणावर पकड होती. इतकी की प्रसंगी काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वास बाजूला करून आपल्याला हवे ते करण्याइतकी त्यांची ताकद होती आणि आंध्रलगतच्या कृष्णागोदावरी खोऱ्यात मिळणाऱ्या वायूचा मोठा साठा आपल्याला हवा अशी मागणी करण्याइतके औद्धत्य त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांच्या हयातीत काँग्रेसला तेलंगणनिर्मितीची आठवण आली नाही. परंतु त्यांना संशयास्पद पद्धतीने मृत्यू आला आणि आंध्र काँग्रेसवर जगन वारसा हक्क सांगू लागले तेव्हाच काँग्रेसने बरोबर हे तेलंगणाचे पिल्लू सोडले, हा दिसतो तितका योगायोग नाही. तीर्थरूपांच्या कृपेने जगन रेड्डी यांच्याकडे अफाट माया आहे. त्या मायेच्या जोरावर ते काँग्रेसच्या आंध्रतील किल्ल्यास भगदाड पाडू शकतील हे स्पष्ट झाल्यावर लगेच त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरू झाली आणि ते तुरुंगात राहतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्यात गैर काही नाही. जगन यांना तुरुंगात राहावे लागत असेल तर आपण टिपे गाळण्याचे काहीच कारण नाही. राजकीयदृष्टय़ा एखादा अडचणीचा वा डोईजड वाटत असेल तर त्याच्या विरोधात चौकशीचा, कारवाईचा ससेमिरा मागे लावण्याची काँग्रेसी परंपरा अजूनही जात नाही, हे या निमित्ताने अधोरेखित होते इतकेच. अवैध संपत्ती निर्मिती हा काँग्रेसजनांच्या काळजीचा विषय असता तर कु. रॉबर्ट वडेरा याच्याही उद्योगांकडे लक्ष देण्याची गरज काँग्रेसजनांस वाटली असती. परंतु कु. रॉबर्ट यांच्या उद्योगाबाबत कोणा काँग्रेसजनाने चकार शब्द काढल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा जगन म्हणतात त्यात काहीच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही.
त्यामुळे राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी व्याकूळ झालेल्या सोनिया गांधी यांनी आंध्र विभाजनाचा निर्णय घेतला हा जगन यांचा आरोप तर्काच्या पातळीवर टिकला नाही, तरी राजकीय पातळीवर आंध्रमध्ये त्यावर विश्वास ठेवला जाईल हे नक्की. गेल्या दोन निवडणुकांत आंध्रने दिल्लीतील सत्तानिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदी सुखाने राहता आले कारण त्यांच्या मागे आंध्रचे चंद्राबाबू नायडू एकगठ्ठा तेलुगू देसमचे खासदार घेऊन उभे राहिले म्हणून. तसेच रालोआची सत्ता गेली ती चंद्राबाबूंच्या हातून आंध्र गेले म्हणून. तेव्हा लोकसभेच्या आंध्रातील ४२ जागा या आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत याचा अंदाज काँग्रेसला नाही, असे म्हणणे दुधखुळेपणाचे ठरावे. त्यामुळेच तेलंगणची मागणी लावून धरणारे चंद्रशेखर राव यांच्या आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठी काँग्रेसने हे नवराज्यनिर्मितीचे गाजर पुढे केले आणि ते पाहात जगन रेड्डी आणि राव यांनी स्वस्थ बसावे अशी अपेक्षा केली. परंतु तो अंदाज चुकला. त्याचवेळी तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले जगन रेड्डी आपल्याशी आघाडी करण्यास उत्सुक असतील ही काँग्रेसची अपेक्षाही फोल ठरली. त्यामुळे जगन रेड्डी, चंद्राबाबू नायडू आदींनी आपापल्या सोयीच्या भूमिका घेतल्याने हा प्रश्न चिघळला.
तेव्हा काँग्रेसचे युवराज चि. राहुलबाबा विरुद्ध एकेकाळच्या काँग्रेसचे आंध्रचे माजी युवराज जगन रेड्डी यांच्यातील हा संघर्ष आहे. दोघेही एकाच राजकीय विचारांचे मणी. तेव्हा राहुलबाबांच्या घराणेशाहीविरोधात जगन रेड्डी यांनी बोलणे हास्यास्पद आणि जगनच्या राजकीय स्थानाबाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित करणेही हास्यास्पद. त्यामुळेच आंध्रातील संघर्ष हा वारसाहक्कांची पोरखेळी लढाई आहे.