आपल्या माणसांचा स्वीकार गुणदोषांसह करावा लागतो. मग, मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांना वेगळी वागणूक कशासाठी ? मानसिक अपंग मुलेही अ-पंग अर्थात पंगुत्वरहित म्हणून जीवन निश्चितपणे जगू शकतात. त्याकरिता मानसिक अपंग मुलांना स्वावलंबी करण्यासाठी पालकांनी प्रथम खंबीर होणे आवश्यक आहे. परदेशात अशी मुले पालकांसमवेत बाहेर सर्वत्र फिरतात. तिथे त्यांच्याकडे कुचेष्टेने पाहिले जात नाही. पाश्चात्त्यांच्या चालीरीती, पोशाख, खाणे-पिणे याचे अनुकरण करण्यात आपण नेहमीच चार पावले पुढे असतो. मग, अशा मुलांना समजावून घेण्यात आपण कमी पडणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे.. हा संदेश देत मानसिक अपंग व्यक्तींचा सर्वागीण विकास, त्यांना घर अन् समाजात आदरयुक्त स्थान मिळवून देण्यासाठी साडेतीन दशकांपासून कोणत्याही अडथळ्यांची पर्वा न करता अविरतपणे झटणारी संस्था म्हणजे नाशिकची प्रबोधिनी ट्रस्ट..
मानसिक अपंग मुलांनाही इतरांप्रमाणे आनंदाने जगण्याचा, आरोग्य, शिक्षण व व्यवसायाचा हक्क आहे. या मुलांना समाजात वावरता यावे याकरिता त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांना विशेष शिक्षण द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. तिच्या स्थापनेमागील इतिहास विलक्षणच. स्वत:चा मुलगा गौतम गतिमंद असल्याचे समजल्यावर तेव्हा पेशाने शिक्षिका असणाऱ्या रजनीताई लिमये अक्षरश: हादरल्या. त्यातून कसेबसे सावरत त्यांनी वास्तवाचा अर्थात मुलाचा मानसिक अपंगत्वासह स्वीकार केला आणि १ जानेवारी १९७७ रोजी या विशेष शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहरातून कसेबसे चार मुले मिळवून भाडेतत्त्वावरील दोन खोल्यांच्या जागेत सुरू झालेल्या संस्थेच्या कार्याचा विस्तार आज वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी तीन शाळा तसेच १८ वर्षांनंतर शालेय वयोगट संपुष्टात आल्यावर प्रौढ व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रबोधिनी कार्यशाळेपर्यंत असा तब्बल ४०० जणांपर्यंत विस्तारला आहे. वास्तविक, गतिमंद मुले जितक्या लवकर शाळेत येतील, तितके त्यांच्या फायद्याचे असते. त्यांना चांगले वळण लावणे आणि वर्तनसमस्या कमी करणे या दोन्ही गोष्टी सुकर होतात. परंतु, पालकांना ही बाब उमगत नाही. परिणामी, अशी मुले उशिराने म्हणजे वयाने बरीच मोठी झाल्यावर विशेष शाळेकडे वळतात. त्यात दोष पालकांचा असला तरी प्रबोधिनीने मोठय़ा मुलांना त्याची शिक्षा न देता कधी प्रवेश नाकारलेला नाही.
मानसिक अपंग मुलांसाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम बालवाडी सुरू करण्याचे श्रेयही प्रबोधिनीचेच. अजूनही अशी बालवाडी असलेली प्रबोधिनी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था होय. तीन ते सहा वयोगटातील विद्यार्थ्यांना ‘सावली’ अर्थात बालवाडीमध्ये प्रवेश दिला जातो. सहा ते अठरा वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी प्रबोधिनी विद्या मंदिर आणि श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर कार्यरत आहे. या शाळेत इयत्ता नसल्या तरी मानसिक अपंग मुलांच्या बुद्धय़ांकानुसार गट पाडून त्यांना शिक्षण दिले जाते. लेखन, वाचन, अंकगणित हे शिक्षण तुलनेत कमी विद्यार्थ्यांना घेणे शक्य होते. परंतु, प्रत्येकाला सुलभ शारीरिक हालचाली, स्वावलंबन, सामाजिक जाण, संपर्क कौशल्य विकसित करण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांना स्पर्धा, खेळ, गायन, वादन, नृत्य याचे शिक्षण देऊन त्यांच्या जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये मुलांनी मिळविलेली पारितोषिके ही त्याची पावती. मुलांची वर्तनसमस्या कमी करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व्यक्तिगत लक्ष, वाचनालय, मनोरंजनाची साधने, हस्तव्यवसाय शिक्षण आदी उपक्रमांसोबत मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी व वार्षिक वैद्यकीय तपासणी याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते.
१८ वर्षे पूर्ण झाल्यावर ही शाळा सोडावी लागते. त्यापुढे प्रौढ गतिमंदांना प्रत्येकाची मानसिक, शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा पार पाडते. कार्यशाळेतील १०७ जण फाईल व द्रोणनिर्मिती, कापडी पिशव्या व खुच्र्यावरील कापडी आच्छादन शिलाई, स्क्रीन प्रिंटिंग, मसाला व पूजा साहित्य पिशवीबंद करणे, आकाश कंदील व छोटय़ा गुढींची निर्मिती, पापड बनविणे, बाइंडिंग आदी कामांत पारंगत झाले आहेत. या कामातून होणाऱ्या उत्पन्नातून संस्था संबंधितांना दर तीन महिन्याला काही मानधनही देते. काही जणांनी द्रोणनिर्मितीची यंत्रणा खरेदी करून घरातच आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. प्रबोधिनीत येऊन काम करायला शिकलेली ५० हून अधिक मुले बाहेर काम करून अर्थार्जन करू लागले आहेत.
गतिमंदत्वाबरोबर शारीरिक अपंगत्व असलेल्या आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांना व्यायामाचे पाठ देण्याकरिता फिजिओथेरपी विभाग तसेच मानसशास्त्र मार्गदर्शन केंद्रही कार्यान्वित आहे. सर्वेक्षणानुसार लोकसंख्येतील दोन टक्के लोक मानसिक अपंग असतात. नाशिक जिल्हय़ाचा विचार केल्यास ही संख्या सर्वसाधारपणे दहा हजाराहून अधिक असू शकते. त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची तितकीच आवश्यकता आहे. असे प्रशिक्षण पूर्वी केवळ मुंबई व पुण्यात मिळायचे. यामुळे प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्रामार्फत विशेष मुलांना शिकविण्यासाठी आवश्यक असलेला पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. मानसिक अपंग मुलांच्या पालकांची गरज लक्षात घेऊन त्यावर मुले व मुलींसाठी स्वतंत्र प्रबोधिनी वसतिगृहाची उभारणी करून तोडगा काढण्यात आला. शाळा व वसतिगृहात मुले इतकी आनंदाने राहतात की, दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीतदेखील ती घरी जाण्यास नकार देतात. या ठिकाणी त्यांना आपले खरे मित्र भेटतात. शाळेविषयी निर्माण झालेल्या ऊर्मीमुळे रविवार वा तत्सम सुट्टीच्या दिवशीही ते गणवेश चढवून सज्ज होतात. मानसिक अपंग मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी प्रयत्न करतानाच पालकांचे प्रबोधन, मातांना खंबीर बनविणे, अशा विद्यार्थ्यांचे विवाह करू नयेत म्हणून जनजागृती यातही संस्था काम करीत आहे.
संस्थेच्या कार्याचा अफाट विस्तार झाला असला तरी आजवर जी उभारणी झाली, जे कार्य सध्या सुरू आहे, ते त्याच ताकदीने टिकवून ठेवण्याचे खरे आव्हान प्रबोधिनी ट्रस्टसमोर आहे. शाळेत विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. प्रबोधिनी संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ४०० विद्यार्थी असले तरी शासकीय मान्यता केवळ निम्म्याहून कमी विद्यार्थ्यांना. म्हणजे, केवळ मान्यता असणाऱ्या विद्यार्थी संख्येसाठीच शिक्षकांचे वेतन शासन देते. निकषानुसार दहा विद्यार्थ्यांचा एक वर्ग असतो.
त्यानुसार सध्या शाळेत एकूण १०८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ४२ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन शासन देत असले तरी उर्वरित ६६ जणांचे वेतन संस्थेला द्यावे लागते. मानसिक अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा निम्म्याहून अधिक शिक्षक व सेवकवृंद अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहे. महागाईच्या काळात त्यांना समाधान वाटेल, असे वेतन इच्छा असूनही संस्था देऊ शकत नाही. तशीच अवस्था विद्यार्थ्यांच्या शालेय बस वाहतुकीची. हे विद्यार्थी स्वत: शाळेत येऊ शकत नाहीत. बससेवा हा तर त्यांच्या शाळेचा खऱ्या अर्थाने पाया. यामुळे देणगीदारांच्या मदतीतून संस्थेने चार बसेसची उपलब्धता केली. परंतु, ही बस वाहतूक चालविताना अनंत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासन शालेय बस वाहतुकीसाठी मदत देत नाही. साधे चालकाचे पदही मंजूर करीत नाही. परिणामी, बसचालक, मदतनीस यांचे वेतन संस्थेला द्यावे लागते. शिवाय, डिझेलवरही महिन्याकाठी प्रचंड खर्च होतो. हा भार पेलणे प्रबोधिनी ट्रस्टच्या आवाक्याबाहेर जात आहे. मंजूर नसलेली शिक्षक व सेवकपदे तसेच बसचालक, मदतनीस, डिझेल यासाठी प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये खर्च येतो. शासन मंजूर शिक्षक पदांच्या वेतनाच्या रकमेवर आठ टक्के वेतनेतर अनुदान देते. परंतु, त्यात दैनंदिन व्यवस्थापन खर्च भागविताना दमछाक होत आहे. ही बससेवा अव्याहतपणे सुरू ठेवणे हे देखील संस्थेसमोर आव्हान आहे. काही अनाथ गतिमंद बालकांना संस्थेने दत्तक घेतले आहे. अनेक गरीब विद्यार्थीही शाळेत आहेत. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी संस्थेवर आहे. गरीब मुलांचे एक अथवा त्याहून अधिक वर्षांसाठी पालकत्व स्वीकारता येईल. पूरक आहार योजना, विद्यार्थी वाहतूक व्यवस्था तसेच संपूर्ण उपक्रमातील लहानसहान खर्चासाठी मदतीची आवश्यकता आहे.
देणगीदार व दानशूरांकडून मिळालेल्या मदतीतून शाळेची इमारत बांधण्यात आली. प्रबोधिनी ट्रस्टच्या वाटचालीतील हा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा. कारण, त्यानंतर संस्थेने कधी मागे वळून पाहिले नाही. मुलांची वाढती संख्या, बालवाडी आणि पुढील शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची असणारी गरज यामुळे संस्थेला पुन्हा जागेची गरज भासू लागली. त्याकरिता सध्याचे आमदार हेमंत टकले यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमावलीत तेव्हा औद्योगिक क्षेत्रातील मोकळी जागा गतिमंद विद्यार्थ्यांची शाळा वा तत्सम उपक्रमांसाठी देण्याचे प्रयोजन नव्हते. या नियमावलीत बदल करण्यात आला. त्यामुळे प्रबोधिनी ट्रस्टला १९९३ मध्ये औद्योगिक वसाहतीत भूखंड मिळाला आणि प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. अमेरिकास्थित जगन्नाथ वाणी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने मिळालेल्या ३५ लाखांच्या देणगीतून या जागेवर सुनंदा केले विद्या मंदिर, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा व सावली बालवाडी यांच्याही इमारती उभ्या राहिल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यातील गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या इतर संस्थांनाही या पद्धतीने औद्योगिक क्षेत्रात जागा उपलब्ध होऊ लागली. काही पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाची नितांत गरज भासते. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना एकाच वेळी बाहेर जाणे अशक्य होते. आई किंवा वडील यापैकी कोणाला तरी मुलाजवळ थांबावेच लागते. पालकांची ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने तात्पुरत्या स्वरूपात अशा पाल्यांची निवासव्यवस्था करण्यासाठी वसतिगृहाची संकल्पना मांडली. अंबड भागातील तीन एकर जागेवर मानसिक अपंग मुले व मुलांसाठी स्वतंत्र इमारत असणारे प्रबोधिनी वसतिगृहाची उभारणी करीत संस्थेने मानसिक अपंगांच्या निकडीच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याचे वर्तुळ पूर्ण केले आहे. संस्थापिका रजनीताई लिमये यांच्या अध्यक्षतेखाली सुलभा सरवटे, शलाका पंडित, पूनम यादव हे कार्यकारी मंडळ संस्थेची धुरा सांभाळत आहे. या कामात त्यांना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीष सुळे यांचेही सहकार्य
लाभले आहे.
संस्थेपर्यंत कसे जाल?
प्रबोधिनी ट्रस्टचे मुख्य कार्यालय नाशिक शहरातील अगदी मध्यवर्ती अशा भागात आहे. बस अथवा खासगी वाहनाने ंमध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस) चौकात आल्यास शरणपूर रस्त्याकडे जावे. पायी अवघ्या १० ते १५ मिनिटात जुनी पंडित कॉलनीतील कार्यालयात पोहोचता येते. या ठिकाणी प्रबोधिनी विद्या मंदिर कार्यरत आहे. शहरातील इतर भागातील इतर शाळा व प्रशिक्षण केंद्रांना भेट देण्याकरिता संस्थेमार्फत मदतनीसाची उपलब्धता केली जाईल.
प्रबोधिनी ट्रस्ट नाशिक
“दररोजच्या खर्चाचा भार पेलणे प्रबोधिनी ट्रस्टच्या आवाक्याबाहेर जात आहे. पूरक आहार योजना, विद्यार्थी वाहतूक व्यवस्था तसेच संपूर्ण उपक्रमातील लहानसहान खर्चासाठी संस्थेला मदतीची आवश्यकता आहे.
प्रबोधिनी ट्रस्ट ही केवळ नाशिकमधील नव्हे तर राज्यातील अग्रगण्य संस्था आहे. शेकडो मतिमंद मुला-मुलींना स्वावलंबी बनवून त्यांच्या आयुष्याला वळण देण्याचे श्रेय संस्थेचे आहे. अनेक नि:स्वार्थ कार्यकर्त्यांचे सहकार्य संस्थेला लाभल्यामुळे ती सतत प्रगतिपथावर आहे..”
कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर
खास अभ्यासक्रम सुरू करणार
शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि पालकांचा बरोबरीने सहभाग यांची साथ मिळाल्यास गतिमंद मुलांच्या अनेक उणिवांवर मात करता येते. दैनंदिन व्यवहारात इतरांवर अवलंबून रहावे लागू नये म्हणून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या त्या गोष्टी या मुलांच्या विशेष अभ्यासक्रमात स्वावलंबन कौशल्ये म्हणून शिकविल्या जातात. आपल्या गतिमंद मुलाला भविष्यकाळात कोणाच्या तरी आश्रयाने राहावे लागणार असल्याने त्याला जास्तीत जास्त स्वावलंबी करणे हे माता-पित्यांचे कर्तव्य आहे. स्वत:ची स्वच्छता, नीटनेटकी राहणी, मुलगा असेल तर दाढी, मुलगी असेल तर केसांची निगा व मासिक पाळीची स्वच्छता आणि काळजी, घरातील लहानसहान कामे त्यांना शिकविता येतात. या विषयावर पालकांना प्रशिक्षित करण्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मनोदय आहे.
धनादेश या नावाने काढावेत
प्रबोधिनी ट्रस्ट, नाशिक
(देणगीदारांना ८० जी अन्वये आयकर सवलत)
धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट
नागरोड, उंटखाना,
नागपूर -४४०००९. ०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद. ०२४०-२३४६३०३.
नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
आशिष, सथ्थ्या
कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.