घुमान येथील साहित्य संमेलनात शरद जोशी यांची दखल घेतली गेली नाही म्हणून प्रतिक्रिया उमटत आहेत. खरं तर शरद जोशी पडले शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारे विचारवंत नेते. ज्या देशात शेतकऱ्याला केवळ ‘मतपेटी’पुरतंच मानलं जातं तिथे साहित्यविश्वातही त्यांना कोण विचारणार? साहित्यिकांसाठी ‘शेतकरी’ आणि ‘काळी आई’ म्हणजे लिखाणासाठी कच्चा माल.
मी स्वत: शेतकरी संघटनेचा कार्यकता असूनही साहित्य संमेलनाचा निषेध वगरे करण्याच्या भानगडीत न पडता एक आठवण मात्र नमूद करतो. १९९५ मध्ये जवळाबाजार (ता. वसमत, जि. िहगोली) येथे जिल्हा साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे समारोपाचे पाहुणे म्हणून शरद जोशी यांना आमंत्रित केले होते. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या संदर्भात जे विचार २० वर्षांपूर्वी व्यक्त केले होते ते आजही किती तंतोतंत लागू पडतात हे बघा. शरद जोशी म्हणाले होते, ‘मी तुम्हाला प्रेमानं आणि कळकळीनं सांगतो, मराठीतील जे ग्रामीण म्हणून साहित्य आहे, ते खेडय़ांशी संबंधित आहे असं मला खरंच वाटत नाही. तुम्ही संमेलनं भरवाल, डेरे घालाल, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि आणखी काही ‘साहित्यं’ निघालीत, त्यांची संमेलनं भरवाल, त्यांचे मंच उभे कराल, निधी जमवाल; पण तुम्हाला असं वाटत असेल, की यातून मराठी भाषा जगणार आहे तर तो तुमचा भ्रम आहे. याने मराठी भाषा जगणार नाही. मराठी भाषा मोठी करायची असेल तर मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. लहान माणसाची भाषा-मातृभाषा मोठी असूच शकत नाही एवढंच मला सांगायचं आहे.’ (अंगारमळा, पृ. १४६, आ. २)
आज जवळपास सगळी शेती धोक्यात आली आहे. असं असताना साहित्य संमेलन मात्र मोठय़ा जोमात भरवले जाते. साहित्यिकांना विमानाच्या वाऱ्या घडविल्या जातात. बहुजन समाजातून संमेलनाचा अध्यक्ष झाला तरी यात फरक पडत नाही. सणसणीत टीका करणारे तुकारामाचे वंशज सत्तादरबारी एका साध्या अध्यक्षपदासाठी लाचार होतात. आपले इतर बांधव आत्महत्या करत असताना संमेलनाचे सोहळे साजरे होताना त्यात सहभागी होतात आणि ज्याच्या जातीवर टीका होते त्या जातीतील शरद जोशी संमेलनांवर बहुजनांची बाजू घेऊन सडेतोड टीका २० वर्षांपूर्वीच करतो याला काय म्हणायचे? कुठे नेऊन ठेवलाय शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र साहित्यिकांनी?
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना पद्म पुरस्कार हिमाचल प्रदेश सरकारच्या शिफारशीवरून मिळाला होता. शरद जोशी यांना पद्म पुरस्कार पंजाबच्या किसान युनियनच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाने हट्टाने मिळाल्यास आश्चर्य नको. कारण महाराष्ट्राला तर त्यांचे नाव कधी सुचवावेसे वाटणारच नाही. आधी काँग्रेसचे शासन होते म्हणून नाही आणि आता भाजपचे. त्यांनी जी शेतीविरोधी धोरणं राबविली आहेत ती पाहता तेही सुचविणार नाहीत. मराठी साहित्यिक तर शरद जोशींना लेखक मानतच नाहीत.
शरद जोशींचे संमेलनाबाबतचे लिखाण तरी वाचा!
घुमान येथील साहित्य संमेलनात शरद जोशी यांची दखल घेतली गेली नाही म्हणून प्रतिक्रिया उमटत आहेत. खरं तर शरद जोशी पडले शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारे विचारवंत नेते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-04-2015 at 12:40 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad joshis writings on sahitya sammelan