शरद पवार आणि उद्धव ठाकरे. थोडय़ाफार फरकाने नाशिक दौऱ्यास आलेल्या राज्यातील मोठय़ा पक्षांच्या या दोन्ही नेत्यांनी एक सूत्र पाळले. अन्य पक्षांवर टीकेऐवजी स्वपक्षीयांवर रोख ठेवला. कार्यकर्त्यांना निवडणुकीचे वेध लागले असताना हे आत्मपरीक्षणाचे सूर लागल्यामुळे आपले आणि स्थानिक नेत्यांचे काय होणार, याच्या चर्चेला मात्र आणखीच बळ मिळाले..
संयमशीलतेला बाधाच आणणारे प्रकार घडल्यावर, जाणीवपूर्वक आक्रमकतेची झूल पांघरून स्वपक्षातील नेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मागील आठवडय़ात नाशिक दौऱ्यात आली. या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यातील हे साम्य सर्वानाच चकित करणारे ठरले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सजग करण्यासाठी अशाच प्रकारच्या आक्रमक बोलांचे सिंचन आवश्यक आहे. तरच, आपणांस अनुकूल असे राजकीय पीक भरघोस येऊ शकेल याची जाणीव केंद्रीय कृषीमंत्रीपद सांभाळणाऱ्या पवारांना असली तरी उद्धव ठाकरे यांचे मात्र तसे नाही. पक्षाची स्वभाव वैशिष्टय़े स्वत:च्या मूळ स्वभावाला मुरड घालून अंगिकारताना उद्धव यांचा नाईलाज होत असल्याचे याआधीही अनेकवेळा दिसून आले असून त्याचेच दर्शन या दौऱ्यातही पुन्हा एकदा झाले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागवार मेळावे होत आहेत. या मेळाव्यांना शरद पवार यांनी हजेरी लावलेली नव्हती. परंतु नाशिक विभागीय मेळाव्यास त्यांनी मार्गदर्शन तर केलेच, शिवाय नांदगाव आणि मनमाडसारख्या ग्रामीण भागात आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून राजकारणात सामाजिक गणिताची मांडणी कशी करावी ते दाखवून दिले. या मांडणीत पवार यांच्या दौऱ्यातील सर्व कार्यक्रमांचे आयोजन भुजबळ कुटुंबियांशी संबंधित लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये असावे हा केवळ एक योगायोग समजावा. भुजबळ त्रिकुटांनी नाशिक जिल्ह्यात केलेल्या दृश्य स्वरूपाच्या विकासात्मक कामांचा गवगवा सर्वत्र झालेला आहेच. पवार यांच्या दौऱ्यातही त्याची प्रचीती आली.  भुजबळांनी केलेल्या विकासकामांचे जाहीरपणे कौतुक करतानाच जिल्हय़ातील सर्वच लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा मुद्दाही पवार यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत मांडला. शेतकरी हाच राष्ट्रवादीचा प्रमुख तारणहार असल्याने त्यांच्याशी जुळलेली नाळ जर तुटली तर त्याची भरपाई होणे मुश्कील असल्याचे जाणत पवार हे सातत्याने शेतकऱ्यांविषयी कळवळा असल्याचे दाखवीत आले आहेत. जिल्हा दौऱ्यातील त्यांच्या भाषणांचेही हेच सूत्र राहिले. कांद्याचे भाव वाढत असताना आणि ते गडगडत असताना शेतकऱ्यांची बाजू घेऊन नाशिक जिल्हय़ातील एकही मायेचा पुत उभा राहिला नाही. तेव्हा केवळ आपणच कांदा उत्पादकांच्या बाजूने होतो, असे सुनावत शरद पवार यांनी भुजबळांसह इतर सर्वच लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत झणझणीतपणे अंजन घातले. साधारणपणे दशकापूर्वी याच नाशिक जिल्हय़ात पवार यांना कांदा उत्पादकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. जाहीर सभेत तेव्हा पवार यांच्या दिशेने कांदे भिरकावण्यात आले होते. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांप्रती सदैव कणव व्यक्त करणाऱ्या पवार यांना स्वपक्षातील लोकप्रतिनिधींना योग्य ती समज देण्यासाठी कांद्याचाच आधार घ्यावा लागला. पवार यांच्या या कांदेपुराणमुळे जिल्हय़ात राष्ट्रवादीतील नेमक्या कोणाच्या डोळ्यांत पाणी आणले, याची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात आरोप किंवा टीका करताना कधीही कोणाच्या नावाचा वापर करावयाचा नाही. पवार यांच्या या स्वभाव वैशिष्टय़ाचा धाक त्यामुळे पक्षातील सर्वानाच बसतो. पवारांच्या नाराजीपेक्षा ते नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला मिळणार या संदर्भात काही सूचक इशारे करतात काय, याकडे कार्यकर्त्यांचे अधिक लक्ष होते. परंतु चुचकारणे आणि फटकारणे यांमध्ये पारंगत असलेल्या पवार यांच्या या स्वभावाची चुणूक पुन्हा अनुभवावयास आल्याने उमेदवारीविषयी तर्कवितर्क करण्यास कार्यकर्त्यांना अजून काही दिवस तरी वेळ मिळाला. नाशिक शहरात मनसेचे वर्चस्व असल्याने किमान त्यांच्या कारभाराविषयी तरी पवार काही बोलतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु ‘व्होट फॉर इंडिया’ च्या आवाहनावरून भाजपचे नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता केलेल्या टीकेचा अपवाद वगळता पवार यांनी विरोधी पक्षांचा उल्लेखही केला नाही. शहरात तीन आमदार आणि महापालिकेत सत्तास्थानी असतानाही मनसेला कोणताच प्रभाव पाडता आलेला नाही. त्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून विविध कारणे प्रत्येक दौऱ्यात पुढे करण्यात आली. राज यांचा दौरा झाल्यानंतर दर वेळी नाशिककरांना आता तरी महापालिकेच्या कारभारात काही बदल घडेल, अशी आस लागून राहत असे. प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशा पडत गेली. नाशिककरांचे हे दुखणे ओळखून असेल कदाचित, शरद पवार यांनी मनसेला अनुल्लेखाने फटकारणे योग्य ठरविले.
पवार यांच्याप्रमाणेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या तीन-चार तासांच्या दौऱ्यात इतर पक्षांची कोणतीही दखल घेतली नाही. कोणताही जाहीर कार्यक्रम न ठेवता शिवसेनेच्या मोजक्या स्थानिक नेत्यांशी बंद दाराआड त्यांनी हितगुज केले. बंद दाराआड बैठक असल्यानेच आतमध्ये काय झाले त्याची चर्चा अधिक त्वरेने बाहेरही पसरली. ठाकरे यांना लोकशाहीपेक्षा आपल्या वडिलांनी शिवसेना ज्या पद्धतीने वाढविली. ती पद्धतच कशी पक्षासाठी हितकारक आहे त्याचा साक्षात्कार झाल्याचे नमूद करावे लागले. मागील दोन लोकसभा निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लोकशाही पद्धतीप्रमाणे सुचविल्यानुसार उमेदवार ठरविण्यात आले. परंतु त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे आता आपण उमेदवार ठरविणार आणि तुम्ही त्याला विजयी करण्यासाठी झटणार, असा आक्रमक अवतार त्यांनी धारण केल्याने कोणाची कशी गोची झाली, याचीच चर्चा उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली. मागील लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीला जेरीस आणणारे हेमंत गोडसे हे आता शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तसे संकेत मिळाल्याचा दावा करीत त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण भाग पिंजण्यास सुरुवातही केली. परंतु उमेदवारीच्या भोज्याला शिवण्यापर्यंतचा मार्ग अत्यंत अवघड असल्याची जाणीव त्यांना दररोज पक्षांतर्गत वेगवेगळ्या स्पर्धकांची नावे चर्चेत येऊ लागल्याने झाली होती. या बैठकीत ठाकरे यांनी त्यांची जिल्हा संघटकपदी नेमणूक करून टाकली.
शहरातील गुन्हेगारीच्या मुद्दय़ावरून महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी राष्ट्रवादीच्या विरोधात कौल दिला होता. त्या वेळी प्रचारात शिवसेनेनेही गुन्हेगारीविरोधात आवाज उठविला होता. अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेले सुहास कांदे हे असेच एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळेच सर्वप्रथम मनसे, नंतर राष्ट्रवादीने त्यांना दूर केले. तेव्हापासून कोणत्या तरी राजकीय छत्रछायेच्या शोधात असलेल्या कांदे यांना त्यांच्या अगदी विरुद्ध स्वभाव असलेल्या ठाकरे यांनी शिवसेनेत दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कांदेंमुळे सेनेला कितपत फायदा होईल हे सांगता येणे अवघड असले तरी सेनेचा मात्र कांदेंना निश्चितच लाभ होणार आहे. कांदे शिवसेनेत गेल्याने गुन्हेगारीला पाठबळ देत असण्याच्या विषयावरून सातत्याने नाशिक शहरात टीकेचा भडिमार सहन करावा लागलेल्या राष्ट्रवादीच्या ‘भुजां’मध्ये नवीन ‘बळ’ येण्याची चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये वाहतूक, विकास वगैरे समस्यांपेक्षा गुन्हेगारी हा विषय नागरिकांना अधिक जाऊन भिडणारा असल्याचे विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळेच महानगरप्रमुखपदाची दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजय बोरस्ते यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘वॉर्ड तिथे भगवा गार्ड’ केलेल्या या घोषणेस महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षानंतर लगेच शिवसेना पक्षप्रमुखांचा दौरा होणे हा योगायोग असला तरी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये दिवसेंदिवस निर्माण होत असलेल्या ‘सौहार्दपूर्ण’ संबंधांची किनार त्यास चिकटणे साहजिकच. याआधी ठाकरे-भुजबळ या कुटुंबीयांमधील अशाच प्रकारच्या संबंधांची चर्चा मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान रंगली होती. त्यावेळी पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ उमेदवारी करीत असलेल्या अनुक्रमे नांदगाव आणि येवला मतदारसंघातील जाहीर सभा अचानक रद्द करीत उद्धव ठाकरे यांनी निफाडमध्ये सभा घेतली होती. त्यामुळे नाराज उमेदवार संजय पवार यांनी निकाल लागल्यानंतर थेट राष्ट्रवादीतच प्रवेश केल्याचा इतिहास शिवसैनिकांना चांगलाच ज्ञात आहे. अशी पाश्र्वभूमी असल्यानेच शिवसेना किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यातून कोणता शोध आणि बोध घ्यावा हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आकलनापलीकडील ठरते. त्यामुळे राजकीय पातळीवर पक्षनिष्ठेचे वारंवार उठणारे तरंग किती दिवस टिकतात, याची चर्चा करीत राहणे एवढेच त्यांच्या हाती उरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा