शेअर बाजारात दोन छावण्या असतात. एक छावणी बाजार वर नेणाऱ्यांची आणि वर जाणार असा होरा मानून व्यवहार करणाऱ्यांची. बाजारभाव चढणार  असे मानणाऱ्यांची छावणी. या चौखूर उधळण्याखातर त्यांना म्हणतात, नंदी ! दुसरी छावणी बाजार एकुणात निवळणार, उतरणार असे भाकीत धरून व्यवहार करणाऱ्यांची.  त्यांना  संबोधतात ‘अस्वल’ ऊर्फ भालू!
दिनांक १८ फेब्रुवारी १९९२. स्थळ- योजना भवन, नवी दिल्ली. योजना आयोगाचे सदस्य व्ही. कृष्णमूर्तीचे दालन. व्ही. कृष्णमूर्ती हे नावाजलेले सनदी अधिकारी. उद्योग खात्याचे सचिव म्हणून, त्या अगोदर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, मारुती उद्योग, स्टील अ‍ॅथॉरिटी इंडिया लिमिटेड ऊर्फ ‘सेल’सारख्या मातब्बर सरकारी कंपन्यांचे मुख्य व्यवस्थापक व संचालक होते. इतकी वर्षे सरकारदरबारी लौकिक कमावल्यावर बडय़ा नेत्यांच्या वर्तुळात जमा होणे पण स्वाभाविकच. त्यांची राजीव गांधी आणि काही वेचक काँग्रेस नेत्यांशी जवळीक होती. त्यांची स्वत:ची राजकीय महत्त्वाकांक्षासुद्धा पालवली होती, असे म्हटले जायचे. सतीश चतुर्वेदींनी गळ घातली म्हणून गुलाम नबी आझादांनी कृष्णमूर्तीना एका मुंबई शेअर बाजारातील बडय़ा शेअर दलालाचे म्हणणे ऐकून घ्या, अशी ‘दरख्वास्त’ केली. हा शेअर मध्यस्थ ऊर्फ दलाल म्हणजे हर्षद मेहता. हर्षद मेहताने आपल्या पहिल्याच भेटीमध्ये व्ही. कृष्णमूर्तीना थक्क केले!  बाजारात एसीसीचा लौकिक (गुडविल) आहे. त्या बळावर एसीसी फार स्वस्तात फार मोठे भांडवल उभारू शकते, असे सांगत हर्षदने अनेक कंपन्यांचे मूळ भागभांडवल आणि बाजारमूल्याने दिसणारे भांडवल याची जंत्री म्हणून दाखविली.
कोण हा हर्षद मेहता? आठ-दहा वर्षांपूर्वी हर्षद मेहता आणि अश्विन मेहता हे दोघे बंधू शेअर बाजारामध्ये दलाली व्यवसायात उतरले. धडपडत, ठेचकाळत या बाजाराचे टक्केटोणपे खात यातल्या वाटा धुंडाळू लागले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे मेंबरशिप कार्ड खरेदी केले. त्यांची  ग्रो मोअर ही कंपनी जमेल ते वित्तीय व्यवहार हाताळायला उत्सुक होती. आशा एकच, या ना त्या रूपाने खेळविता येईल अशी रोकड लाभली पाहिजे. हाती येत जात राहिली पाहिजे. या दोघांपैकी अश्विन मेहता पूर्वी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये नोकरी करीत होता. नीट पारखून, संशोधन करून मगच गुंतवणूक करावी या पद्धतीवर त्याचा अधिक सबळ विश्वास होता. याउलट त्याचा भाऊ हर्षद अधिक ठोकशाही गुंतवणुकीवर, आक्रमक चाली करून आपल्याला अनुकूल स्थिती पैदा करण्यावर भर बाळगणारा होता. कालांतराने हर्षद मेहताची बेडर, चारचौघांवर छाप पाडणारी प्रतिमा अधिकाधिक आकर्षक ठरू लागली. १९८५च्या नंतर कुजबुज रूपाने शेअर बाजारामध्ये त्यांच्या किमती वर नेण्याच्या हातोटीच्या अफवा फैलावत होत्या.
शेअर बाजारात दोन छावण्या असतात. एक छावणी बाजार वर नेणाऱ्यांची आणि वर जाणार असा होरा मानून व्यवहार करणाऱ्यांची. बाजारभाव चढणार जणू चौखूर उधळणार, असे मानणाऱ्यांची छावणी. या चौखूर उधळण्याखातर त्यांना म्हणतात, नंदी ऊर्फ सांड! दुसरी छावणी बाजार एकुणात निवळणार, उतरणार असे भाकीत धरून व्यवहार करणाऱ्यांची. किमती लोळत लोळत घसरणार या पक्षाचे लोक. त्यांना म्हणतात, ‘अस्वल’ ऊर्फ भालू! बहुधा अस्वल शिकार लोळवते म्हणून. ही वर्णने प्रत्यक्ष व्यक्तींची नसतात. बाजारातील वृत्तींची असतात. पण काही जणांची वृत्ती सातत्याने एका धर्तीची असते त्यांना व्यक्तिश: नंदी किंवा अस्वल म्हणून ओळखले जाऊ लागते. हर्षद मेहता ज्या वेळी शेअर बाजारात व्यवहार करू लागला त्या वेळेस सरकारी मालकीची युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही म्युच्युअल फंड कंपनी सर्वाधिक बलाढय़ होती. त्यांच्या जोडीला काही विमा कंपन्या असत. नुकत्याच काळाने बँकांना म्युच्युअल फंड काढायला आणि चालवायला मुभा मिळू लागली होती. पण युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ऊर्फ यूटीआय म्हणजे कर्ताकरविता संस्थान होते. त्या संस्थानाचे एके काळचे अध्यक्ष होते. त्यांना बाजारात ‘बडा नंदी’ म्हटले जायचे. ‘यूटीआय’कडील एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे शेअर्स त्यांनी ‘सुखासुखी’ रिलायन्सला विकले आणि मालकीत मोठा हिस्सा पैदा करून दिला. त्यामुळे विश्वनाथ प्रताप सिंहांनी त्यांची उचलबांगडी केली! (पुढे शरद पवारांनी त्यांना महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष केले, तर चंद्रशेखर यांनी त्यांना नॅशनल हौसिंग बँकेचे अध्यक्ष म्हणून नेमले). फेरवानी किंवा यूटीआय अध्यक्षांनी ‘घ्या’ असा इशारा केला की त्या कंपन्यांच्या किमती ऊध्र्वगामी व्हायच्या. यूटीआयचा मध्यस्थ झाल्याखेरीज कुणाही मध्यस्थाला (ब्रोकर) मोठे बनणे दुरापास्त होते. खरेदी-विक्रीची मोठी ऑर्डर देणारा कुणी त्राता नाही तर दलालीचा धंदा फोफावणार कसा? अश्विन मेहता एके काळी यूटीआयमध्ये चाकरी करीत असे. पण यूटीआयप्रमुखांकडे जाणारी वाट काही मिळत नव्हती. त्यांच्या दारी अगोदर अनेक बडे मध्यस्थ ताटकळून असायचे. मग धंदा पोसवून वाढायला येणारा पैसा कुठून तरी निराळ्या मार्गाने उभा करणे जरुरीचे होते.
दरम्यान, आपल्या सांडझुंडीने किमती वर-खाली करण्याचा लौकिक वापरून हर्षद मेहताने आणखी एक उद्योग जोडीने आरंभला होता. त्याची आणखी एक लाडकी उपपत्ती असे, बाजार चालतो तो बाजाराकडे पाहणाऱ्यांच्या नजरअंदाजाने. त्यांना काय ‘भावते’ ते महत्त्वाचे. बाजारातल्यांचे ‘भावणे’ (इंग्रजी परसेप्शन) बाजारातील किमती ठरवतो. प्रत्यक्ष कामगिरीपेक्षा ‘भावणे’ संभाव्य असणे मोलाचे! फेरउभारणी मोलाच्या उपपत्तीप्रमाणेच अनेकांना हे बाजारबुजुर्गाचे ‘भावणे’ फार लोभस भावू लागले. बाजाराची ही आस्वादक समीक्षा अनेक कारखानदारी मालकांना सोयीची होती. त्यांच्या शेअरधारणेचे मोल वाढवून मिळणार होते. त्यासाठीची नंदीधाव बाजारात पैदा करायला हर्षद मेहता नावाचा बडा सांड तयार होता, पण एका अटीवर. त्यांच्या कंपनीत त्यालासुद्धा हिस्सा द्यायचा. एका मुलाखतीमध्ये हर्षदने स्वत: बढाई मारत सांगितले होते, ‘कंपन्यांचे व्यवस्थापक त्यांच्या स्वत:च्या कंपनीच्या मूल्याकडे कधीच नीट न्याहाळून बघत नव्हते. मी शिकविली त्यांना ही अक्कल!’ हर्षद मेहता कुठले शेअर्स घेतोय अशी आवई उठली की त्या शेअर्सच्या किमती वधारू लागायच्या. हर्षद स्वत:ला गारुड चालविणारा गारुडी मानायचा. ‘ज्याला कुणाला या भाव चढविणाऱ्या गारुडयात्रेत यायचे त्याने यावे, स्वप्ने विकावीत, मत्ता कमवावी! यात काय गुन्हा आहे का,’ असा सवाल तो करीत असे. नंतर हर्षदची नजर वळली बँका-बँकांमध्ये होणाऱ्या सरकारी कर्जरोख्यांच्या व्यवहाराकडे. पण ही बाजारपेठ काही मूठभर बँका आणि त्यांचे दलाल यांच्या कब्जामध्ये होती. मध्यस्थीचा हा व्यवसाय दलाली देत होता आणि कदाचित शेअर्स व्यवहार खेळविण्यासाठी जरुरी ते वित्त घबाड पुरवठा देण्याची शक्यता खुणावत होती. हर्षदने या रोखे व्यवहारातील चौकडी फोडून घुसायची तयारी केली. त्यातून या महानंदीची कथा अधिक गुंतागुंतीची आणि फसवाफसवीची बनत गेली. या नंदीपुराणात बव्हंशी नायक असा कुणी नाहीच, आहेत ते बव्हंशी खलनायक! कोण मोठा होणार व राहणार यासाठी झगडणारे. त्यात परदेशी बँका, देशी, सरकारी बँका, रिझव्‍‌र्ह बँकेच्या अधीन असणारी नॅशनल हौसिंग बँक आणि त्यांचा रोखे व्यवहार सांभाळणारे मध्यस्थ (त्यातले काही आडनावानेसुद्धा दलाल!) यांची ही जटिल कहाणी. त्याचा पुढचा अध्याय पुढील भागात.
*लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा