संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस या सर्वात महत्त्वाच्या पदासाठी २००६ मध्ये भारताने शशी थरूर यांचे नाव पुढे केले होते. बान की मून यांच्या स्पर्धेत थरूर यांना मिळालेली मतेही काही कमी नव्हती. संयुक्त राष्ट्र संघटनेत तीन दशके काम केलेल्या थरूर यांना ते पद मिळाले नाही, तरी त्यानंतरच्या आयुष्यात त्या पुण्याईवर दोन वेळा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मात्र मिळाले. राजकारणात आल्यापासूनच वादंग आणि थरूर यांची जी भागीदारी सुरू झाली, ती आजपर्यंत अनेकविध कारणांनी गाजत राहिली. प्रवक्तेपदावरून त्यांना हटवण्यासाठी काँग्रेस पक्षाला नाही तरी काही सबळ कारण हवेच होते. २ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी होताना, थरूर यांनी काढलेले उद्गार, लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक होते. इंडियन प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यांमध्ये कोची शहराच्या संघाचा समावेश व्हावा आणि या संघाची मालकी सुनंदा पुष्कर या महिलेला मिळावी, यासाठी केंद्रीय मंत्री असलेल्या थरूर यांनी केलेले प्रयत्न जेव्हा उघड झाले, तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेसची मोठी पंचाईत झाली होती. सरकारी खर्चात बचत करण्याच्या त्या वेळच्या मोहिमेत सहभागी होण्याऐवजी पंचतारांकित हॉटेलातच वास्तव्य करणाऱ्या थरूर यांनी काँग्रेसची अडचणच करून ठेवली होती. संयुक्त राष्ट्र संघटनेतील कारकिर्दीत महत्त्वाची पदे भूषविलेले शशी थरूर हे एक नामांकित लेखक आहेत. त्यांच्या नावावर असलेल्या डझनभर ग्रंथांना वैचारिक विश्वात महत्त्वाचे स्थानही मिळाले आहे. वृत्तपत्रांमधून त्यांनी केलेले लेखनही राजकीय विश्वात वाचले गेले आहे. हुशार, चाणाक्ष आणि बुद्धिमान म्हणून ओळखल्या गेलेल्या थरूर यांना सोनिया आणि राहुल यांच्या पाठिंब्यामुळे केरळमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली. सारे आयुष्य भारताबाहेर घालवलेल्या व्यक्तीला आपल्यावर लादले गेले अशीच केरळातील काँग्रेसजनांची भावना होती. तोंड दाबून बुक्क्यांचा हा मार सहन करण्यापलीकडे जाऊ लागल्यानंतर मोदी प्रशंसेचे कारण पुढे करीत केरळ प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली. वरवर पाहता हे सारे तर्कशुद्ध वाटेलही. परंतु खरे कारण जाहीरपणे सांगता येण्यासारखे नसल्यामुळे सगळ्यांचीच पंचाईत होऊन बसली आहे. ज्या सुनंदा पुष्कर यांच्यासाठी थरूर यांना मंत्रिपद सोडावे लागले होते, त्यांच्याशी नंतरच्या काळात विवाह करून थरूर यांनी आपली भूमिका एका अर्थाने स्पष्ट केली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतील एका हॉटेलात या सुनंदाबाईंच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे पुन्हा थरूर यांच्याभोवती संशयाचे वादळ घोंघावू लागले. या बाईंनी विषप्राशन केल्याचा अहवाल बाहेर आल्यानंतर या वादळाचे रूपांतर राजकीय वादंगात होणे अगदीच स्वाभाविक होते. अशा मृत्यूप्रकरणात संशयाचा काटा थरूर यांच्याकडे झुकत असल्याने, नंतरच्या काळात काँग्रेस पक्षावर येणारी नामुष्की टाळण्यासाठी पक्षाला काही तरी करणे आवश्यक होते. पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता अभियानाचे दूत म्हणून ज्या नऊ जणांची निवड केली होती, त्यामध्ये थरूर हेही होते. पक्षाचे प्रवक्ते असलेल्या या महाशयांनी त्यामध्ये सहभागी होणे हा त्यांच्या व्यक्तिगत इच्छेचा प्रश्न होता की पक्षाच्या प्रतिष्ठेचा, या प्रश्नावर खलबत्त्यात कुटून बाहेर आलेली विचारमौक्तिके पाहता, याच पक्षाचे दिग्विजय सिंह, गुलाम नबी आझाद यांनी केलेली मोदीस्तुती कोणत्या प्रकारात मोडेल, असाच प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडेल. प्रवक्तेपद हे फार मोठे पद आहे असे भासवत, थरूर यांच्यावर कारवाई करून पक्षाच्या नेत्यांनी केरळ काँग्रेसची मनधरणी करीत असतानाच, पक्षावर नजीकच्या भविष्यात येऊ शकणारे संकट टाळण्याचाही प्रयत्न केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा