रवी शास्त्री यांची बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाकडे या मंडळाच्या कारभाऱ्यांच्या ‘व्यावहारिक कौशल्या’चे प्रतीक म्हणूनच पाहावे लागणार आहे. रवी शास्त्री हे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. कोणे एके काळी विश्वचषक सामन्यात त्यांना ऑडी नावाची तेव्हाची प्रचंड अप्रुपाची महागडी गाडी मिळाली तेव्हापासून सगळ्यांनीच मान्य केले आहे. त्यांची त्यानंतरची कारकीर्द विचारात न घेतल्यास त्यांच्या महानतेबाबत शंका उपस्थित होणार नाहीत. शास्त्री हे उत्कृष्ट समालोचकही आहेत. निवृत्तीनंतर अनेक क्रिकेटवीर समालोचनाच्या व्यवसायात शिरतात. त्यातील काहींना त्या क्षेत्रातही यश मिळते. रवी शास्त्री हे त्या काहींपैकी एक असून, त्यांच्या समालोचनकौशल्याबद्दलही शंका घेण्याचे कारण नाही. मात्र ते उत्तम प्रशिक्षक आहेत का हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. चांगला खेळाडू हा चांगला प्रशिक्षक असतोच असा काही नियम नाही. असे असताना बीसीसीआयने शास्त्री यांच्यावर ही जबाबदारी टाकली याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे बीसीसीआयच्या व्यावहारिक कौशल्यामध्ये दडलेले आहे. बीसीसीआयवर बऱ्याच वर्षांपासून राजकारणी आणि उद्योजकांचा वरचष्मा आहे. पण त्यांना खेळाचे ज्ञान असून असून किती असणार? त्यामुळे त्यांचे बरेसचे निर्णय म्हणजे माजी क्रिकेटपटूंना टीका करण्याची संधीच. तेव्हा अशा टीकेचे चेंडू टोलवत बसण्याऐवजी कोणी गोलंदाजी करणारच नाही अशी व्यवस्था करण्याचे सूत्र बीसीसीआयने अवलंबिल्याचे दिसते. त्यामुळेच माजी क्रिकेटपटूंना विविध पदे देऊन त्यांना अंकित करण्याचे किंवा आपल्या ताब्यात ठेवण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न दिसतात. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, लक्ष्मण या माजी दिग्गज क्रिकेटपटूंची बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर वर्णी लावण्याच्या खेळीकडे याच दृष्टाने पाहता येईल. सध्या ट्वेन्टी-२० क्रिकेटला बीसीसीआयने आयपीएलच्या रूपात आणून सोन्याची अंडे देणारी कोंबडी बनवले आहे. तेथे खेळाडू विकले जातात आणि खेळाचाही खेळखंडोबा होतो. त्याविरोधात किमान माजी क्रिकेटपटूंनी तरी आवाज उठवावा, असे अनेकांना वाटते. ते तसे बोलले तर बीसीसीआयची पंचाईत होणार हे उघडच आहे. बीसीसीआयने सल्लागार समितीचा जो घाट घातला आहे त्याचा उगम यात आहे. थोडक्यात माजी क्रिकेटपटूंकडून कोणतीही समस्या ओढवू नये, यासाठी बीसीसीआयने केलेले हे आपत्ती व्यवस्थापन आहे. या अशा विविध समित्यांवर खेळाडूंची वर्णी लावणे, त्यांना निवृत्तिवेतन देणे हे सर्व मुखबंदीचेच उपाय आहेत यात शंका नाही. पूर्वीच्या काही क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर हलाखीची परिस्थिती भोगावी लागली होती. पण सध्याच्या घडीला माजी क्रिकेटपटू समालोचन किंवा स्तंभलेखन करून बरेच पैसे कमावत आहेत. त्यांना खरे तर बीसीसीआयची अशी गुलामी पत्करण्याची काहीच गरज नाही. आपण जो खेळ खेळलो, ज्या खेळाने आपल्याला नाव, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसा मिळवून दिला त्या खेळासाठी आपण काही तरी करण्याची गरज असल्याचे त्यांना शिवतही नाही. बीसीसीआय पैसा किंवा पद देऊन शांत राहण्यासाठी सांगत असली तरी खेळाच्या विकासासाठी ते नाकारण्याचे धारिष्टय़ एकाही स्वाभिमानी माजी क्रिकेटपटूला दाखवता आले नाही, ही खरी क्रिकेटप्रेमींच्या मनातील खंत आहे. अर्थात क्रिकेट हा खेळच स्वार्थाधळ्यांची कोशिंबीर बनला आहे. तेथे कोणाकडून काय अपेक्षा करणार?

Story img Loader