सामान्यपणा टिकवण्याचे योग्य मार्ग तिनं असामान्यत्व अबाधित ठेवूनही शोधले..
हे  तसं सगळीकडेच असतं तसं. ती आणि तो. आपल्यासारखेच. जगावेगळे वगैरे अजिबातच नाहीत. गरीब म्हणता येईल अशाच घरातनं आलेले. तेव्हा घरची परिस्थिती बेताची असणार हे ओघानं आलंच. त्याची आई आणि वडील तर पुढे विभक्त झालेले. सगळं गुंतागुंतीचंच म्हणता येईल असं सगळं.
त्या मानानं तिची परिस्थिती जरा बरी. कुटुंब म्हणून असं काही होतं तरी तिला. लहानसं घर. आई गृहिणी आणि वडील नोकरी करणारे. पोरांनी संध्याकाळी सातच्या आत घरात यायचा नियम. रात्रीचं जेवण सगळय़ांनी एकत्र घ्यायचं म्हणजे घ्यायचं. उगाच आगाऊपणा केला तर तो खपवून घेतला जायचा नाही. घराची शिस्त ही पाळण्यासाठीच असते.. हे संस्कार.
तसं बघायला गेलं तर कोणत्याही सांस्कृतिक, पारंपरिक अर्थानं मध्यमवर्गीय संस्कार व्हावेत अशी काही त्यांची पाश्र्वभूमी नव्हती. परंपरेनं आलं ते उपेक्षितांचंच जगणं. आजोबा कुठे हमाल तर त्यांचे भाऊ कोणा जमीनदाराचे गुलाम. अशा हलाखीच्या परिस्थितीत जगताना संस्कारांची कल्पनाही करता येत नाही. सगळा लढा असतो तो जगण्यासाठीचा. असं जगणं पिढय़ान्पिढय़ा नशिबी आलं की एक प्रकारचा कडवटपणा तरी येतो किंवा भाबडेपणा तरी. आपल्या आसपास अशी उदाहरणं काही कमी नाहीत. कडवटपणा आलेले कंठाळी होतात आणि या प्रस्थापितांना, साडेतीन टक्केवाल्यांना ठोकून वगैरेच काढलं पाहिजे असं काही तरी बरळत राहतात. त्यांना ज्यात त्यात जात दिसते आणि एखादी कलाकृती चांगली किंवा वाईट आहे हेसुद्धा कलाकारांच्या जातीवर ठरतं अशी एकेरी मनोभूमी त्यांची बनलेली असते. ही माणसं मग कर्कश होऊन जातात आणि ते काही बोलले नाहीत तरीसुद्धा ध्वनिप्रदूषण होतं.
दुसरे भाबडे असतात..किंवा तसं दाखवतात.. ते आपल्या व्यक्तिमत्त्वाभोवती बालपणीच्या हलाखीची महिरप घेऊनच जगत असतात. मग कुठेही गेलं तरी यांच्या आईनं त्यांच्यासाठी कशा खस्ता खाल्ल्या ते सतत ऐकावं लागतं. यांनी रस्त्यावरच्या दिव्याखालीच अभ्यास कसा केला आणि तरीही पहिला क्रमांक कसा सोडला नाही त्या यशोगाथेची टेप सारखी सारखी वाजत राहते. त्यांचा बाप आणि ते याच्या बऱ्याचशा खोटय़ा आणि बढय़ाचढय़ा कहाण्या ऐकून आपले कान किटतात. यातल्या काहींचे बाप शहरांत नोकरीला असतात. पण मग सांस्कृतिक रोमँटिसिझम म्हणून शहरातल्या बापाला ते शेतात कामाला पाठवतात. कारण यांना आपल्या परिस्थितीचं दुकान मांडायचं असतं. अशा कहाण्यांचं मार्केटिंग करणाऱ्यांचा मिळून एक दबावगट तयार होतो. यातले काही माध्यमातले असतात. त्यामुळे त्यांची एक दहशत तयार होते. मग ते इतरांना दरडावायला लागतात आणि स्वत:भोवती आरत्या सतत ओवाळल्या जातील याची पुरेशी काळजीही घेतात. आपल्या बालपणीच्या कष्टांचं पुरेसं मार्केटिंग होत राहील, याची खात्री ही माणसं सतत घेत असतात.
पण या आपल्या दोघांचं तसं नव्हतं. कष्ट झाले ते झाले. त्याचं कधी त्यांनी भांडवल केलं नाही. ज्या समाजाच्या इतिहासानं त्यांच्या पूर्वजांवर अन्याय केला होता, त्या समाजाच्या वर्तमानानंच त्यांना उभं राहायची संधी दिली. या सगळय़ांचंच मोठेपण हे की अमुकांच्या पूर्वजांनी अन्याय केलेत म्हणून त्यांच्या वंशजांना झोडपत सुटा असं त्या दोघांच्या समाजांनादेखील कधी वाटलं नाही. त्यामुळे या दोघांनाही शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाल्या. प्रस्थापितांच्या मुलांना मिळतील तशाच. दोघांनीही वकिलीचं शिक्षण घेतलं. त्याच्यापेक्षा ती जास्त चटपटीत होती. आग्रहीदेखील तितकीच. आत्मविश्वास अर्थातच तिच्याकडे अधिक होता. त्यामुळे नोकरी तिला आधी लागली. बौद्धिक संपदा कायदा हा तिच्या विशेषाभ्यासाचा विषय. त्यात चांगलंच नैपुण्य मिळवलं तिनं.
त्या अर्थाने ती स्थिरावली. तर पुढे योगायोगानं तोही तिथेच आला. उमेदवार म्हणून. त्यालाही त्याच कंपनीत शिकायचं होतं. मग तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला सांगितलं, नवा उमेदवार येतोय आपल्याकडे.. त्याला जरा तयार करायचं तू बघ. आता ऑफिसचंच काम. ती नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता. ती त्याला शिकवू लागली. बघता बघता.. किंवा न बघतादेखील.. दोघांचा परिचय वाढत गेला. काही काळानं त्यांना लक्षात आलं. आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय. दोघांनाही जाणवत होतं आपला भूतकाळ समान आहे आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे ते. प्रश्न होता आता कष्ट उपसण्याचा. त्याची दोघांनाही फिकीर नव्हती. नोकरीशिवाय दोघांचंही आपापल्या समाजात, ज्ञातिबांधवांत काही ना काही काम सुरूच होतं. आपल्या समाजात आपल्याहीपेक्षा मागास असणाऱ्यांना मदत करणं, त्यांनाही शिक्षणाच्या संधी मिळाव्यात अशी त्यांची इच्छा होती. आपलं भलं झालं.. आता समाज वाऱ्यावर गेला तरी चालेल.. असं काही यांचं वागणं नव्हतं.
..बघता बघता तो मोठा होत गेला. राजकारणात त्याची पत वाढत गेली. मुळातच तो हुशार. त्याच्यात एक झपाटा होता. कामाची बांधीलकी होती आणि मुख्य म्हणजे काही तरी करून दाखवायची आच होती. तिला ते लक्षात आलं. दोन्ही गाडय़ा वेगानं जाऊन चालणार नाही. तिच्या वकिलीचीही मागणी वाढू लागली होती. पण जाणीवपूर्वक तिनं गती कमी केली. कारण आता ती आई झाली होती. नवऱ्याच्या उडत्या कारकीर्दीपेक्षा पोटच्या मुलींची रांगती वाढ तिला आता जास्त महत्त्वाची होती. तिनं ठरवलं आठवडय़ात एकच रात्र नवऱ्याबरोबर राजकारणाच्या धबडग्यात घालवायची. नवऱ्याच्या निवडणूक प्रचार वगैरे प्रासंगिक गरजांसाठी फक्त एकच दिवस द्यायचा. बाकी सगळा वेळ मुलींबरोबर घालवायचा. वाढत्या कामाच्या व्यापामुळे मुलींना बाबा मिळणार नव्हताच.. आपण त्या मुलींची आई आहोतच.. बाबाही व्हायचं.. तिनं ठरवलं.
नाही म्हटलं तरी त्याचा प्रभाव आता भलताच वाढला होता. सारं जग ज्या सिंहासनाला दबून असतं त्या सिंहासनावर बसायची संधी त्याच्या डोळय़ांसमोर होती. तिला प्रश्न पडला. आपण ज्या लहानशा संसाराचं स्वप्न पाहत होतो, तो संसार आता आपल्याला सांभाळता येईल इतक्याच आकाराचा राहणार नाही, याची जाणीव तिला घाबरवून गेली. आपला प्रिय नवरा आणि त्याहूनही प्रिय आपल्या दोन मुलींचा जन्मदाता त्यांना आता पुरेसा वेळ देऊ शकणार नाही, या भावनेनं ती कातर झाली. अस्वस्थ झाली. पण तरी तिचा एक निर्धार होता. आपल्या भावनेचे वळ त्याच्या व्यक्तिमत्त्वावर उमटू द्यायचे नाहीत. ती त्याला म्हणाली, तू पुढे हो.. मी घर सांभाळते.
त्याला तिच्याविषयी आदर होताच. आता अभिमानही वाटायला लागला. अशा भावनेच्या भरात तो विचारून गेला..एवढं तू करतीयेस माझ्यासाठी..मी काय करू? ती म्हणाली : एकच कर. सिगरेट सोड. ते सोडण्याचं वचन देत असशील तर तुझा सगळा भार हलका करीन मी.
त्यानं नाही म्हणणं शक्यच नव्हतं.. साऱ्या जगाला ऐकायला लावणारा तो. पण तिच्यासमोर काहीही बोलला नाही.. तिचं त्यानं मुकाट ऐकलं.
आणि त्यांच्या आयुष्यातली ती घटका आली.
यशाच्या सर्वोच्च शिखरावर तो गेला. त्याच्या यशाचे नवलाख दिवे जिकडे तिकडे तळपू लागले.. परंतु त्याला आपल्या माजघरातल्या मंद दिव्याची आठवण होती.. तो सगळय़ांना सांगायचा- माझ्या यशात तिचाच तर वाटा आहे.
मग एकदा एक भलंमोठं मासिक तिची मुलाखत घ्यायला आलं. नेहमीचे नमस्कार चमत्कार सोपस्कार झाले. ती दिसते कशी. फॅशन कशी करते. तिला काय आवडतं. काय आवडत नाही. वगैरे सर्वसामान्यांना आवडेल असा मालमसाला बराच जमवला त्यांनी. पण महत्त्वाचा प्रश्न शेवटीच आला.
 त्या मासिकवाल्यांनी विचारलं.आता तुम्ही जगातल्या सगळय़ात प्रसिद्ध अशा घरात राहायला जाणार.. गाव सोडणार.. जगातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीची पत्नी म्हणून तुझ्यावर प्रकाशाचा प्रसिद्धीचा झोत पडणार. तुला काय वाटतंय.
ती म्हणाली.. छानच वाटतंय.. त्याची प्रगती हा माझ्याही अभिमानाचा विषय आहे.
त्यांनी विचारलं.. एखादी काही काळजी वगैरे..
ती म्हणाली हो..आहे ना..
काय..
आता जानेवारी महिन्यात तो पदग्रहण करणार.. हा मधलाच महिना.. शाळांचं अर्धच वर्ष संपलेलं असणार.. तेव्हा माझ्या मुलींच्या शाळाप्रवेशाचं काय करायचं याची काळजी मला आहे..
ते मुलाखतकर्ते सुन्न होऊन बघत राहिले.
पात्र परिचय :
ती : मिशेल ओबामा, तो : बराक ओबामा
प्रसंग :  बराक ओबामा २००८ साली पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेल्यावर मिशेल हिची प्रसिध्द फॅशन नियतकालिकानं घेतलेली मुलाखत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा