‘कृषिप्रधान देश’ असलेल्या आपल्या भारतात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या अद्यापही सुरूच आहेत. नापिकी, नैसर्गिक आपत्ती, सरकारी धोरण आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतो. ज्या वेळी तो समाजात अपमानित होतो, त्याची पसे फेडण्याची कुवत संपते, त्यावेळी तो हतबल झालेला असतो. सरतेशेवटी तो आपली जीवनयात्रा संपवतो. मात्र जिवंत असताना त्याने कर्ज फेडण्यासाठी ज्या यातना भोगल्या असतात, त्याहून किती तरी अधिक पटींनी यातना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे तसेच त्यांची मुले भोगतात. त्यांच्या पित्याचे छत्र हरपते, त्या वेळेपासून त्या कुटुंबाच्या मरणयातना सुरू होतात. ज्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून केवळ लाखाची मदत केली जाते, ती आत्महत्या ही शासनाच्या निकषात बसावी लागते. देशात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची आज जवळपास पाच लाखांहून अधिक मुले अनाथ आहेत. त्यांना कुणाचाच सहारा नाही. त्यांच्या शिक्षणाचे काय? पुढे ती मुले काय करतात? असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे ठाकलेले आहेत. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी त्या कुटुंबाच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागलेले असते. कारण त्या शेतकऱ्याचे थकीत कर्ज त्यांनाच फेडावे लागते. थोडय़ा दिवसांनी बँकेचे अधिकारी वसुलीला येतात. खऱ्या मरणयातना त्या शेतकऱ्याच्या कुटुंबालाच भोगाव्या लागतात. शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून त्यांच्यावरील कर्ज फिटत नाही, अथवा माफ होत नाही. तद्नंतर अनाथ मुलांना वाली कोण उरत नाही. मृत शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीलाही मुलांचे पालनपोषण, शैक्षणिक खर्च पेलवत नाही. राज्यातील या मुलांची अवस्था अतिशय विदारक आहे. पित्याचे छत्र हरवलेल्या अनाथ मुलांच्या संगोपनाचा प्रश्नदेखील गंभीरपणे उभा राहतो. आई आणि बाबा म्हणायला शिकायच्या अगोदरच त्यांच्या पित्याने गळफास घेतलेला असतो. मायेची फुंकर घालणारा आपला बाप या जगातून आपल्याला सोडून गेला आहे, याची जाणीव त्याला हळूहळू होऊ लागते. कर्जाला कंटाळून पती आणि पत्नीनेदेखील आपली जीवनयात्रा संपवल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या मुलांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करतातच असे नाही. एक तर त्या मुलांना अनाथ आश्रमात टाकले जाते, नाही तर अशा मुलांना मजुराची वागणूक दिली जाते. कोवळ्या वयातच त्यांचे बालपण हिरावलेले असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा