‘शिवछत्रपती’ हे सलग ४३ वष्रे जवळपास तसंच राहिलेलं जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. मात्र २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले. पण हे बदल करताना जी राजकीय चलाखी दाखवली गेली त्याला पाठय़पुस्तकांच्या इतिहासात तोड नाही. त्या बदलांवर आक्षेप घेणे, हा या लेखाचा हेतू नाही. हे पुस्तक गोठलेलेच राहिल्यामुळे शिक्षणशास्त्रीय निकषांशी ते कसे विसंगत ठरते, हे दाखवायचा आहे..
इयत्ता चौथीचं इतिहासाचं पाठय़पुस्तक – शिवछत्रपती – या वर्षी तब्बल ४३ वर्षांचं झालं. नऊ-दहा वयोगटाच्या मुलांना एकाच व्यक्तीचा इतिहास शिकविणारं आणि १९७० पासून सलग ४३ वष्रे जवळपास तसंच राहिलेलं ‘शिवछत्रपती’ हे जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. या पाठय़पुस्तकात छोटय़ाशा बदलाचा प्रस्तावदेखील तणाव निर्माण करत असल्याचं या पाठय़पुस्तकाचा इतिहास आपल्याला सांगतो. १९९२ साली अशाच एका तणावाच्या काळात विधिमंडळातल्या प्रचंड गोंधळानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘हे पुस्तक कोणत्याही बदलाशिवाय आहे तसेच ठेवले जाईल’ अशी घोषणा विधानसभेत केली होती. याच घोषणेची री ओढत गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासक्रमातदेखील ‘इयत्ता चौथीच्या इतिहासात कोणताही बदल असणार नाही’ याची ग्वाही देण्यात आली आहे. ही ग्वाही ‘विद्या परिषदे’मार्फत (SCERT) राबवली गेली आहे. १९७० पासून कोटय़वधी मुलांनी ज्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला ते पुस्तक कोणतं संदर्भसाहित्य वापरून बनवलंय, याबाबत या पुस्तकाच्या निर्मितीसाठी जबाबदार असणाऱ्या ‘बालभारती’कडेच कसलीही माहिती नसल्याचं, माहितीच्या अधिकारात विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या उत्तरांदाखल खुद्द ‘बालभारती’ने म्हटलंय.
मूळ संदर्भाच्या अनुपस्थितीत चकित करणारी गोष्ट म्हणजे या पाठय़पुस्तकाचं भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘छत्रपती शिवाजी’ या १९५२ सालच्या चित्रपटाशी असणारं साम्य. चित्रपटातील काही प्रसंग ‘फ्रेम बाय फ्रेम’ पाठय़पुस्तकात आलेले दिसतात. पाठय़पुस्तकातली अनेक चित्रं तर पडद्यावरच्या हलत्या प्रतिमा स्थिर करून चितारल्यासारखी हुबेहूब आहेत. कुणी म्हणेल की चित्रपटातून प्रेरणा घ्यायला हरकत का असावी? ऐतिहासिक चित्रपट किंवा कादंबरीतदेखील कल्पनाविलासात दडलेला ‘इतिहास’ असू शकतो. एखादा ऐतिहासिक चित्रपट किंवा कादंबरी पाहताना किंवा वाचताना प्रेक्षक-वाचक त्यात पूर्णपणे गुरफटला अथवा झपाटला जाऊ शकतो, किंबहुना ते त्या निर्मितीचं उद्दिष्ट असतं. पण इतिहासाचं पाठय़पुस्तक म्हणजे ऐतिहासिक सिनेमा किंवा कादंबरी नव्हे. तो वैध ज्ञानाचा स्रोत आहे. शिकणाऱ्यांना ‘झपाटून टाकणं’ किंवा ‘रोमहर्षति करणं’ हे इतिहास शिक्षणाचं उद्दिष्ट नसतं. चिकित्सक विचारसरणीचा अवलंब करत वर्तमानाच्या संदर्भात भूतकाळाची रचना करायला शिकवणं, भूतकाळाच्या मांडणीतली विविधता समजावून घेऊन तिचा आदर करायला शिकवणं, ‘इतिहास म्हणजे मती गुंगवणाऱ्या कथा’ या इतिहासाच्या मर्यादित, पुरातनकालीन अर्थाला आव्हान देणं ही आधुनिक इतिहास शिक्षणाची मुख्य उद्दिष्टं असतात. इतिहासाच्या नुसत्या कथा मुलांना सांगण्याऐवजी समाजाच्या सर्व वैविध्यांचं प्रतिबिंब असलेल्या, समाजाच्या बहुविधतेला सामावून घेणाऱ्या इतिहासाची निर्मितीप्रक्रिया मुलांना शिकवणं हे शालेय इतिहास शिक्षणाचं काम आहे, असं जगभरात मानलं जातं. थोडक्यात सांगायचं तर इतिहास म्हणजे ‘चिकित्सक पद्धतीनं केलेली भूतकाळाची रचना’ हे सूत्र मान्य करून ही ‘रचना’ कशी समजावून घ्यायची, कशी करायची हे शिकवणं म्हणजे इतिहास शिक्षण देणं, असं आपण म्हणू शकतो.
१९७० पासून तसंच ठेवण्यात आलेल्या या पाठय़पुस्तकाच्या २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले आहेत. या बदलांचा मुख्य हेतू राजमाता जिजाबाई आणि शहाजीराजांच्या संदर्भात न्याय्य मांडणी करणं हा होता, असं संबंधित समितीचं म्हणणं होतं. पण हे बदल करताना इतर ठिकाणी अत्यंत जुजबी बदलांतून जी राजकीय चलाखी दाखवली गेली त्याला पाठय़पुस्तकांच्या इतिहासात तोड नाही. स्वराज्याची पहिली राजधानी (राजगड) कशी उभी राहिली हे सांगताना, ‘गडावर पाथरवटांनी दगड घावले. लोहाराने भाता फुंकला. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी मराठी माणसं कामाला लागली’ (पान ३९) असा उल्लेख करण्यात आला आहे. सन १९७० पासून २००८ पर्यंत हेच विधान ‘गडावर पाथरवटांनी दगड घावले. लोहाराने भाता फुंकला. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती सारे कामाला लागले’ असं होतं. वारंवार हिंसेवर उतरणारी ‘मराठी माणूस’ ही सध्याची पश्चिम महाराष्ट्रीय, शहरी अस्मितादर्शी ओळख शिवकाळात अस्तित्वातदेखील नव्हती. असं असताना स्वराज्य ‘घडवण्याचं’ काम करणाऱ्यांना ‘मराठी माणूस’ हे बिरुद चिटकविण्याचं कारण स्पष्ट आहे. महाराजांच्या प्रतिमेचा वापर सद्यकालीन राजकारणासाठी करायचाय. मराठी माणसांचा अर्थ तत्कालीन समाजातील मराठी भाषा बोलणारे लोक, असा घेतला तर ‘स्वकीय’ शत्रूंच्या संदर्भात ‘अनेक मराठी माणसांनी स्वराज्यनिर्मितीला विरोध केला’ असंदेखील म्हणावं लागेल; पण पाठय़पुस्तकात तसं झालेलं दिसत नाही.
१९७० पासून मुस्लिमांचं ज्या प्रकारचं चित्रण या पाठय़पुस्तकात करण्यात आलंय ते पाहता शिवाजी महाराजांना केवळ हिंदू धर्मीय बनवून त्यांच्या उदार धार्मिक प्रतिमेला पुस्तकानं तडा दिलाय, असं म्हणावं लागेल. महाराजांच्या सेवेतल्या मुस्लिमांचा उल्लेख करतानाचं हे विधान पाहा – ‘त्यांच्या आरमारातील अधिकारी दौलतखान, सिद्दी मिसरी तसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते, पण ते सारे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते’ (पान १०१). २००९ पर्यंत पाठय़पुस्तकात असणाऱ्या या विधानात ‘पण’ हे केवळ उभयान्वयी अव्यय नाही. हेतू मुस्लिमांच्या निष्ठांविषयी थेट शंका व्यक्त करण्याचा आहे. मुस्लिमांना ‘परकीय’ म्हणणं आणि त्याच वेळी महाराजांच्या हिंदू धर्मीय शत्रूंना ‘स्वकीय’ म्हणणं, मुस्लिमांची चित्रं काढताना केवळ हिरव्याच रंगाच्या छटांचा वापर करणं, स्वाध्यायांमधून मुस्लिमांच्या ‘दुर्गुणां’चं दृढीकरण करणं, महाराजांच्या बाबतीत वारंवार ‘स्वधर्माचा’ उल्लेख करणं आणि पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरात त्याचं भाषांतर ‘हिंदू’ असं करणं अशा अनेक प्रकारे महाराजांच्या प्रतिमेचा वापर हिंदुत्ववादी राजकारणासाठी केल्याचं स्पष्ट दिसतं.
पुस्तकामध्ये भरून वाहणारी युद्धजन्य हिंसा ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. या संपूर्ण पुस्तकात थेट हिंसेची ३० पेक्षा जास्त उदाहरणं आहेत. ‘नाही तर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार’ (पान ४७); ‘खानाची आतडी बाहेर पडली’ (पान ५१); ‘फेका आणखी दगड. ठेचा गनिमांना’ (पान ५८); ‘कापा, तोडा, मुडदे पाडा’ (पान ६९); ‘.. आणि तुफान कत्तल करत सुटला’ (पान ६९) ही त्यातली काही उदाहरणं. नऊ-दहा वर्षांच्या मुलांना शिकवलं जाणारं आणि तीव्र हिंसेची अशी ‘ग्राफिकल’ वर्णनं असणारं पाठय़पुस्तक या भूतलावर सापडणं शक्य नाही. विशेष म्हणजे पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरात िहसेची तीव्रता बरीच कमी झाली आहे. हा योगायोग की भाषांतरकाराची अक्षमता की महाराष्ट्रातला कारभार जगापासून लपवण्याचा प्रयत्न हे मात्र सांगता येत नाही.
एखाद्या समाजाला आवश्यक वाटणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तींचा इतिहास शिकवण्याचा निर्णय त्या समाजाचा असतो. पण तो शिकवण्याची पद्धत, त्यासाठी योग्य वयोगट, योग्य शिक्षणशास्त्र (पेडागॉजी) याचा कसलाही विचार न करता शिकवलेला इतिहास उपयुक्त ठरणं तर सोडा, त्याचा गरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
शिक्षणाला आधुनिक करावं, जगातल्या बदलांशी सुसंगत असावं म्हणून महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजी शाळांमधून संगणक शिक्षण अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. पण अशा आधुनिकतेची मागणी इतिहास शिक्षणात का केली जात नाही? गेल्या चार दशकांमध्ये इतिहासातल्या ‘कथनां’ची जागा ‘रचनां’नी घेतली आहे. स्त्रिया, शोषित जात-वर्ग समूहांच्या इतिहासलेखनाच्या नवनव्या पद्धती उदयाला आल्या आहेत. ‘बालपण’ ही संकल्पना मोठ्ठय़ा प्रमाणात बदलली आहे. बाल मानसशास्त्राचे आयाम बदलले आणि नागरिकत्व-शिक्षणाचा विचार आणि पद्धती बदलल्या. इतिहास आणि सामाजिक शास्त्रांच्या शिक्षणाचा उपयोग ‘शांतता शिक्षणा’साठी करण्याचे प्रयत्नदेखील चार ते पाच दशके जुने झाले आहेत. शिक्षण हक्ककायद्यानुसार बंधनकारक असणाऱ्या ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा- २००५’ नेदेखील ‘शांततेसाठी शिक्षणा’चा पुरस्कार केला आहे. या कशाचाही विचार न करता एखादं पाठय़पुस्तक, त्यातला शब्दन्शब्द तसाच ठेवणं हा शिक्षणातल्या आधुनिकतेचा कुठला प्रकार आहे? ‘रचनावादा’वर (कन्स्ट्रक्टिव्हिझम) आधारित नवा अभ्यासक्रम तयार करतानादेखील काळाच्या पट्टीवर गोठवलेलं पाठय़पुस्तक आहे तसं ठेवण्याची घोषणा म्हणजे हे पुस्तक शिक्षणशास्त्राच्या पलीकडचं म्हणजेच ‘पेडागॉजी प्रूफ’ (pedagogy proof) मानलं गेल्याचं लक्षण आहे.
इतिहास शिक्षण कल्पकतेने कथनापलीकडे गेलं तर आधुनिक काळातल्या मुलांसाठी महाराजांचा इतिहास अधिक प्रेरक ठरेल. शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचा, तो त्यातून प्रेरणा घेऊन मुलांनी वर्तमानकालीन आवाहनांना तोंड द्यायला तयार व्हावं म्हणून, की भालजी पेंढारकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘युगप्रवर्तक पुरुषोत्तमाची त्यांच्या भक्तांनी पूजा मांडावी’ म्हणून, याचा निर्णय महाराष्ट्राने करायचा आहे.
लेखक शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांचा ईमेल : kishore_darak@yahoo.com
उद्याच्या अंकात राजीव साने यांचे‘गल्लत, गफलत, गहजब!’ हे सदर
गोठलेल्या पाठय़पुस्तकाची गोष्ट
‘शिवछत्रपती’ हे सलग ४३ वष्रे जवळपास तसंच राहिलेलं जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. मात्र २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले.
आणखी वाचा
First published on: 19-12-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv chhatrapati history book for class 4th