पन्नाशीत पदार्पण करणाऱ्या शिवसेनेला मागे वळून आपल्या कर्तृत्वाचा विचार करताना, त्यात काळाचा रेटा किती आणि स्वनियंत्रित धोरणे किती याचा विचार करावा लागेल. पुढे वाढण्यासाठी, आपल्या प्रादेशिक निष्ठा प्रामाणिक आहेत आणि भूमिका कृतीतदेखील स्पष्टच आहे, हे सेना नेत्यांना दाखवून द्यावे लागेल.
शिवसेनेस पन्नासाव्या वर्षांत पदार्पणाच्या शुभेच्छा. वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर व्यक्ती वा संघटना वा राजकीय पक्ष यांनी मागे वळून आपल्या कर्तृत्वाचा हिशेब जसा करणे अपेक्षित असते तसेच या हिशेबाच्या श्रीशिलकीच्या आधारे पुढचा मार्ग आखणेदेखील आवश्यक असते. राजकीय पक्षांनी असे करणे अधिक गरजेचे. कारण त्यांना दुहेरी रेटय़ांस तोंड द्यावे लागते. एक रेटा कालानुरूप असतो. त्यामुळे आसपास घडत जाणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांना आपापल्या मार्गाची आखणी करावी लागते. याचा अर्थ हा मार्ग निश्चित करणे त्यांच्या हातात नसते. परंतु दीर्घकालीन स्वप्ने पाहणाऱ्या राजकीय पक्षासाठी दुसरा रेटा अधिक महत्त्वाचा असतो. तो स्वनियंत्रित असावा लागतो आणि काही निश्चित ध्येयधोरणांचा आधार त्यासाठी आवश्यक असतो. काळावर आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा सोडून जाणारे दुसऱ्या घटकास अधिक प्राधान्य देतात. वयाच्या पन्नाशीच्या मुहूर्तावर प्रामाणिक आत्मपरीक्षण केल्यास शिवसेनेस आपल्यामध्ये या दुसऱ्या घटकाची उणीव जाणवू शकेल. याचे कारण शिवसेनेचा जन्म ते आतापर्यंतच्या वाटचालीस थंड डोक्याने, शांतचित्ताने आखलेल्या धोरणांपेक्षा काळाचा रेटाच अधिक कारणीभूत होता. त्यामुळे आपल्या काळास आकार देत त्यावर आरूढ होण्याचे धाडस दाखवण्याऐवजी शिवसेनेने काळाच्या आहारी जाणे पसंत केले. हे कसे वा का झाले हे समजून घेण्यासाठी सेनेच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकावा लागेल.
संयुक्त महाराष्ट्र समिती फुटल्यानंतर सेनेचा जन्म झाला. राज्यस्थापनेला सहा वर्षे झालेली असताना, अन्य भाषकांकडून महाराष्ट्रावर होणारा अन्याय हे चलनी नाणे होते. सेनेने ते आपल्या मस्तकी धारण केले. त्या वेळी सेनेस तो विषय महत्त्वाचा वाटला आणि त्यास पाठिंबाही मिळाला. यामागचे कारण म्हणजे मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंड. कोणी तरी आपल्या मुळावर उठले आहे आणि आपणास स्थानभ्रष्ट करू पाहत आहे, असा समज बाळगणे हा मराठी माणसाचा आवडता छंद. टपाल खात्यातील कारकुनापासून ते खासगी क्षेत्रातील वरिष्ठापर्यंत मराठी माणूस कोठेही असला तरी असा समज करून घेणे त्यास आवडते. त्यामुळे मराठी माणसाच्या मनात एक कायमस्वरूपी अन्यायग्रस्तता वास करीत असते. शिवसेनेने याचाच फायदा उठवला. मराठी माणसाचा जाज्वल्य अभिमान, मर्द मराठय़ांचा हुंकार, रणरागिण्या आदी शब्दांच्या फुलबाज्या उडवत आपण म्हणजे जणू काही मराठी माणसाच्या उद्धारासाठीच जन्माला आलो आहोत, असा सेनेचा आविर्भाव होता. नोकरीचाकरीचीच अपेक्षा असणारा मुंबईकर मराठी माणूस त्यास फसला. पण म्हणून सेनेमुळे त्याचे काही मोठय़ा प्रमाणावर भले झाले असे नाही. दोनपाच मोठय़ा आस्थापनांतील कामगार संघटना, काही पुंड आणि नाक्यानाक्यावर शाखांच्या आश्रयाने उभ्या राहिलेल्या वडापावच्या गाडय़ा यांचे तेवढे सेनेमुळे रक्षण झाले. त्यातच त्या पक्षाने समाधान मानले. या समाधानात एकाच वेळी गिरणीमालक आणि मराठी गिरणी कामगार या दोन्ही परस्परविरोधी घटकांना सेना नेतृत्वाने झुलवले. आपली कथित ताकद त्या पक्षाने गिरणीमालकांसाठी डाव्या संघटनांचे कंबरडे मोडण्यासाठी सहज वापरू दिली. गिरणी संप त्यातूनच चिघळला. परिणामी मुंबईतून मराठी माणसाचे सर्वात मोठे स्थलांतर सेनेच्या नाकाखालीच झाले. मुंबईत तोवर दक्षिण भारतीयांचा प्रभाव होता. पण ते बहुतांशी नोकरीपेशात होते. गिरणी संपानंतर मुंबईत उत्तर भारतीयांचा पगडा वाढला आणि ते प्राधान्याने व्यावसायिक होते. या दोहोंतील फरक हा सेनेच्या यशापयशाचे निदान करणारा आहे. तेव्हा मुंबईवर आज दिसणारा उत्तर भारतीय प्रभाव हा सेनेच्याच चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे, हे नाकारता येणार नाही. सेनेच्या तोंडी भाषा होती मराठी माणसाच्या हिताची. परंतु त्यांच्याकडून राजकारण होत होते ते अमराठींची धन करण्याचेच. मराठी मनाचा मानिबदू वगरे असणाऱ्या सेनेकडून राज्यसभेवर पाठवल्या गेलेल्या व्यक्तींची नावे जरी पाहिली तरी त्यावरून याचा अंदाज यावा. चंद्रिका केनिया ते मुकेश पटेल ते प्रीतीश नंदी अशी अनेक सेना खासदारांची उदाहरणे देता येतील. यांची राज्यसभा खासदारकी अर्थातच मराठीच्या प्रेमापोटी होती असे म्हणता येणार नाही. यांना खासदारकी देऊन सेना नेत्यांस काय मिळाले, याची चर्चा न केलेलीच बरी. तेव्हा अशा तऱ्हेने सेना नेत्यांनी आपल्या हातानेच आपला मराठीचा कार्यक्रम बुडवण्यास मदत केली. एव्हाना देशात िहदुत्वाचे वारे वाहू लागले होते. सेनेने ते आपल्या शिडात भरून घेतले. वास्तविक त्या आधी सेनेस िहदुत्वाचे प्रेम होते असे नाही. परंतु तोपर्यंत मराठीचा टक्का घसरल्यामुळे सेनेस नव्या चलनी नाण्याची गरज होती. ते िहदुत्वाने पुरवले. परंतु सेनेने जे मराठीचे केले तेच िहदुत्वाचेही. त्यात या िहदुत्वाच्या मुद्दय़ावर त्या पक्षास आद्य िहदुत्ववादी भाजपची स्पर्धा होती. परिणामी मराठी की िहदुत्ववादी या दोन डगरींवर या पक्षाचे पाय राहिले. आता पंचाईत ही की मुंबईतूनच मराठी माणूस बाहेर गेलेला असल्याने मुंबईत मराठीच्या नाण्यास तितकी किंमत नाही. आणि पूर्ण िहदुत्ववादी म्हणावे तर त्या बुरुजावर आधीच भाजप जाऊन बसलेला. तेव्हा या पाश्र्वभूमीवर शिवसेनेस आपल्या धोरणांची आखणी नव्याने करावी लागेल. ती करावयाची असेल तर काही चुका सुधाराव्या लागतील.
त्यातील एक म्हणजे त्या पक्षाकडून बुद्धिजीवींचा होणारा अपमान. आईमाईचा उद्धार करीत चार दगड फेकण्याची दांडगाई करणारे टपोरीच सेनेच्या आश्रयास गेले. त्यामुळे बहुसंख्य पांढरपेशा, बुद्धिजीवी वर्ग सेनेपासून दुरावला. त्या वेळी तर असे असणे हा सेनेच्या टिंगलीचा विषय होता. लेखक, साहित्यिकांना ज्या तऱ्हेने सेना नेत्यांकडून वागणूक मिळत होती, त्यावरून हे दिसत होते. त्यामुळे मराठी संस्कृतीशी नाळ जुळलेला चांगला वर्ग सेनेने हातून गमावला. या वर्गाला सेनेचे दुटप्पी राजकारण कळत होते. कोणताही सकारात्मक कार्यक्रम या पक्षाकडे नाही, तोडाफोडाखेरीज करण्यासारखे दुसरे काही त्या पक्षाकडे नाही आणि बरे, मराठीसाठी तरी काही संस्थात्मक उभारणी त्या पक्षाने केली असे म्हणावे तर तेही नाही. तेव्हा पुढे वाढावयाचे असेल तर या वर्गाचा गमावलेला विश्वास कमावण्यासाठी सेनेस खास प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबरीने आपल्या प्रादेशिक निष्ठा प्रामाणिक आहेत हे सेना नेत्यांना दाखवून द्यावे लागेल. सध्या त्याचा अभाव आहे. त्यामुळे द्रमुक, अण्णा द्रमुक किंवा इतकेच काय अगदी अलीकडचा तृणमूल काँग्रेस या पक्षांइतकी सबळ प्रादेशिकता सेना कधीही कमावू शकली नाही, हे त्या पक्षाच्या अप्रामाणिक निष्ठांचे द्योतक आहे. या मुद्दय़ांच्या जोडीला आणखी एक गंभीर आव्हान सेनेसमोर आहे.
ते भूमिकेचे. एकाच वेळी केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी व्हायचे आणि तरीही आम्ही हे होऊ देणार नाही वगरे विरोधी पक्षाची भाषा बोलायची हा उद्योग सेनेस बंद करावा लागेल. सत्तेत असणाऱ्यांनी सत्तेचा आब राखावयाचा असतो. तो राखता येत नसेल तर सरळ विरोधी बाकांवर बसण्याची िहमत दाखवावी. सत्तेतही वाटा हवा आणि वर विरोधी पक्ष म्हणूनही दांडगाई करायची हे मर्दुमकीची भाषा करणाऱ्यांना शोभत नाही. पन्नाशीच्या टप्प्यावर सेनेने जरूर याचा विचार करावा. ही पन्नाशीची आठवण करून द्यायचे आणखी एक कारण म्हणजे व्यक्ती असो वा राजकीय पक्ष. वयाप्रमाणे त्यांची भाषाही बदलावी लागते. बडबडगीते मोहकच असतात. पण त्यांचेही एक वय असते. पन्नाशीच्या टप्प्यावर तरी सेना नेतृत्वाचा बडबडगीतांचा मोह सुटेल अशी अपेक्षा मराठी माणूस बाळगून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा