मोदी मंत्रिमंडळात फक्त एकच, तेही ‘अवजड’ खाते मिळाल्यामुळे शिवसेना नाराज आहे. त्यांच्या नाराजीचे कारण रास्त असले तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आता हे हट्ट सोडले पाहिजेत! बाळासाहेबांचा मान ठेवून नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला एक तरी मंत्रिपद दिले आहे! काहीच नसते दिले तर काय केले असते? ज्या राज्याचे नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करतात त्या राज्यालाही नरेंद्र मोदींनी जास्त मंत्रिपदे दिली आहेत असेही नाही. त्यामुळे हा आमच्यावर अन्याय आहे असे गुजरातने आणि शिवसेनेनेही मानण्याचे कारण नाही, कारण नरेंद्र मोदींचा भर हा आत्ता तरी छोटय़ा मंत्रिमंडळावर आहे.
 महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. हेही लक्ष्य साध्य करायचे असेल तर शिवसेनेला भाजपशिवाय तरणोपाय नाही. स्वत: एकटे उद्धव ठाकरे स्वबळावर महाराष्ट्रातील सत्ता मिळवू शकत नाहीत.
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला महाराष्ट्रात जे यश मिळाले आहे ते मोदी लाटेमुळे आणि आधीच्या सरकारच्या अंदाधुंद कारभारामुळे! मिळालेली सत्ता ही अशा प्रकारे आपापसात भांडणे करून घालवण्यापेक्षा केंद्राला बळ कसे मिळेल, ही सत्ता अबाधित कशी राहील अशा प्रयत्नात राहिले पाहिजे.  मंत्रिपद नाही तर नाही. त्यामुळे शिवसेनेने केंद्राच्या सत्तेच्या दुधात साखर होण्याचे नाही तर नाही, पण मिठाचा खडा होण्याचे तरी काम करू नये!

सेनेने स्वबळावर विधानसभा लढवावी
महाराष्ट्रात महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेले यश खरोखर अद्वितीय असे आहे. त्या यशामागे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचे पाठबळ आणि नरेंद्र मोदी यांचा करिश्मा यांचे महत्त्वाचे योगदान आहेच, पण शिवसनिकांनी निवडणुकीच्या प्रचारात जीव ओतून काम केले हेही तितकेच खरे. याचे फलित म्हणजे महायुतीला मिळालेले यश होय; परंतु देशभरातून भाजपला इतके प्रचंड यश मिळाले की, सध्या त्यांना रालोआच्या घटक पक्षांचा केवळ विसर पडला नसून त्यांना आता हवे तसे वागवले जात आहे.
शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवणाऱ्या शिवसेनेस सध्या मिळत असलेली अपमानास्पद वागणूक पाहता कुणीही उद्विग्न होईल. केवळ महिन्यापूर्वी खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरलेल्या शिवसेनेला सत्ता मिळताच ‘हवे असेल तर घ्या, नाही तर विसरा’ असे भाजपने सांगणे म्हणजे मराठी अस्मितेचा अपमान नाही का? खरे म्हणजे शिवाजी महाराजांचा बाणेदारपणा आठवत सेना नेत्यांनी कसलीही कदर न करता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी अन्यथा ‘शत प्रतिशत..’ नारे ऐकत गप्प राहावे लागेल. कदाचित विधानसभेतही ढोकळे खावे लागतील!
मुरली पाठक, विलेपाल्रे (पू.), मुंबई</strong>

सरकारला जरा वेळ तर द्या!
मोदी सरकार सत्तेवर येताच अनेकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या स्मृती इराणी यांना मनुष्यबळ विकास खाते दिल्याबद्दल काही जणांचे आक्षेप, मोदी सत्तेवर आल्यावर न्यायपालिकेच्या ‘स्वातंत्र्याची’ अशोक राजवाडे (लोकमानस, २८ मे) यांना वाटणारी चिंता, पाकिस्तानशी सुरू क     रण्यात आलेल्या चर्चेवर काँग्रेसची टीका अशा निरनिराळ्या मुद्दय़ांवरील प्रतिक्रिया नवे सरकार सत्तेवर येताच येऊ लागल्या आहेत.   स्मृती इराणी आपल्या लहान बहिणीप्रमाणे आहेत, असे  मोदी प्रचारसभेत आवर्जून सांगत, तसेच प्रचारसभांतून कसलीही उणीव न ठेवता स्मृती या मोदी यांचे कसे समर्थन करीत होत्या हे अनेक जणांनी पाहिले आहे. आता स्मृती इराणी केवळ बारावी पास असूनही त्यांना मनुष्यबळ खाते दिले यावर केलेली टीका केवळ असूयेमुळे होत नाही तर त्यात कुत्सितपणा आहे असे वाटते.  बाबरी मशीद व गुजरात दंगल ही प्रकरणे गेली अनेक वष्रे चच्रेत आहेत. त्यामधून वेळेचा अपव्यय  सोडल्यास दुसरे काही चांगले होईल असे राजवाडे यांना अजूनही वाटते का? मला वाटते सर्वानी नव्या सरकारचा कारभार तीन-चार महिने पाहावा आणि नंतर  मतप्रदर्शन करावे
श्रीराम गुलगुंद,  कांदिवली, मुंबई

मंत्र्यांवरही आरोप असताना आक्षेप सलमानवरच  का?
‘दबंग हवे, सत्यमेव जयते नको’ तसेच ‘जॉर्ज ऑर्वेलसाहेब ! तुमच्या आठवणीने आज गहिवरून येतंय..’ ही पत्रे आणि ‘शिष्टाचाराची ऐशीतैशी’ हा अन्वयार्थ (२८ मे) वाचला.  नवरे यांच्या पत्रात सलमान खानला पंतप्रधानांचे शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण, मग आमिर खानला का नाही? असा गैरलागू प्रश्न आहे. मुळात हा कुठलाही पारितोषिक वितरण सोहळा नव्हता. त्यामुळे भाजप अथवा मोदींशी ऋणानुबंध असणारे, त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे प्रतिष्ठित व प्रभावशाली लोक हे सोहळ्याचे प्रमुख निमंत्रित होते. सलमानचे वडील सलीम खान यांनी गुजरात दंग्यांवरून मोदींना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांचा कायम उघडपणे विरोध केला व मोदींना नैतिक पाठिंबा दिला. स्वत: सलमाननेही मोदींबरोबर पतंग उडवून, ते मुसलमानांचे शत्रू नसल्याचा संदेश अप्रत्यक्षपणे दिला. तसेच सलीम खान व मोदी यांचा परिचय पूर्वीपासून होताच. या सगळ्याची परिणती म्हणजे हे आमंत्रण.
राहता राहिला प्रश्न शिष्टाचाराचा. आसनव्यवस्थेमध्ये राजनैतिक महत्त्व हा निकष होता की नाही हे कळायला मार्ग नाही. विविध क्षेत्रांतील तीन-चार हजार व्यक्तींच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा राजकीय किंवा संसदीयही राहिला नव्हता, तर ते एक प्रकारचे ‘सेलिब्रेशन’ झाले होते. त्यामुळे आसनव्यवस्था इतकी गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. त्यातून त्याकडे गंभीरपणे पाहायचेच असेल तर मोदींच्या राजकीय विरोधकांसाठी यातून काही संदेश तर दिला गेला नव्हता ना, या दृष्टीने त्याकडे पाहावे लागेल; फक्त सलमान पुढे का? अशा संकुचित दृष्टीने नव्हे. एक अपघात आणि एक सिद्ध न झालेले शिकार प्रकरण यापेक्षा किती तरी मोठे गुन्हे करणारी मंडळी सत्ताधारी पक्षाचे खासदार, मंत्री आणि व्यूहरचनाकार म्हणून मिरवताहेत, त्यांचे काय? विविध गंभीर आर्थिक आणि सामाजिक गुन्हे करणारे उद्योग क्षेत्रातील आणि अन्य क्षेत्रांतील ‘मान्यवर’ या सोहळ्यात होते. त्यांचे काय?  माध्यमांची न्यायप्रियता आणि नैतिकतेचे कैवार घेणे नेहमी सलमान खानपाशीच येऊन का थांबते?
मंजूषा पाटील, दादर, मुंबई

..अन्यथा शिवसेनेचा केजरीवाल व्हायचा!
खवळलेल्या समुद्रात फाटके शीड घेऊन बुडण्याच्या तयारीत असलेली बोटसुद्धा कुशल नावाडी आपल्या अफाट कौशल्याने सुखरूपपणे किनारी लावू शकतो हे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या उदाहरणाने लोकसभा निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बोट एकदाची किनाऱ्यावर लागल्यानंतर आपला जीव वाचला आहे हे पाहून, ‘संपूर्ण बोटीला आपल्या पंधरा-वीस फळ्या लागल्या आहेत म्हणून पूर्ण बोट वाचली’, असे ओरडून सांगत शिवसेनेचे रुसवेफुगवे आणि ‘चांगल्या’ खात्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणे हे जोमाने सुरू झाले, हे पाहून खूपच वाईट वाटले.  देशहितासाठी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवणे आवश्यक असताना शिवसेनेसारख्या पक्षाकडून एवढय़ा खालच्या पातळीचे राजकारण अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहासारखे कुशल नावाडी आपले वल्हे घेऊन तयार आहेत, हे शिवसेना नेतृत्वाने विसरू नये. नाही तर ‘शिवसेनेचा केजरीवाल व्हायला वेळ लागणार नाही’..
संजय खानझोडे, ठाणे</strong>

दृक् -श्राव्य माध्यमातील (अ)शुद्धीकरणाचे काय?
‘मनेका’ या नावाबद्दलचे पत्र (लोकमानस, २८ मे) वाचले. पत्रलेखकानुसार हजारो अशुद्ध प्रयोग प्रचलित आहेत, परंतु काही शब्द छापील माध्यमातून शुद्ध लिहिले जात असूनही दृक् -श्राव्य माध्यमातून अशुद्ध उच्चारले जातात त्याचे काय?  उदाहरणार्थ, ‘परंपरा’ या नामापासून ‘पारंपरिक’ असे विशेषण होते, पण दूरचित्रवाहिन्या व आकाशवाणीवरून रात्रंदिवस ‘पारंपारिक’ असाच अशुद्ध उच्चार केला जातो. त्यामुळे कानावर सतत पडणारा शब्द हाच योग्य अशी धारणा होते. तेव्हा दृक्-श्राव्य माध्यमांनी बातम्या किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये अट्टहासाने अशुद्ध उच्चार रूढ होणार नाहीत याचे भान ठेवावे.                             
मुकुंद कालकर, बदलापूर      
 

Story img Loader