मराठीत मासिकं, नियतकालिकं आज कमी असली तरी एक काळ मासिका-साप्ताहिकांचाच कसा होता, हे  ‘ललित’च्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं अनेकांना सहज आठवलं असेल.. ‘साधना’सारखा अपवाद वगळता माणूस, किलरेस्कर, मनोहर, सत्यकथा आदी ‘ललित’ची धाकटी-थोरली भावंडं आज नाहीत, पण नियतकालिकं आणि त्यांच्या लेखकांची प्रभावळ आजही स्थान टिकवून आहे….
आजच्या टीव्ही-इंटरनेटच्या जमान्यात वाचनसंस्कृती लोप पावत चालली असल्याची तक्रार अनेक ठिकाणांहून होत असताना ‘ललित’ मासिकाने सुवर्ण महोत्सव साजरा करावा, ही मराठी साहित्यप्रेमींच्या दृष्टीने निश्चितच सुखद घटना म्हणावी लागेल. या मासिकाची मातृसंस्था असलेल्या मॅजेस्टिक प्रकाशनाचा त्यामध्ये स्वाभाविकपणे मोलाचा वाटा आहे. तरीसुद्धा ‘मॅजेस्टिक’च्या अंगणात ५० वर्षांपूर्वी लागलेलं हे रोपटं आधुनिक प्रसार माध्यमांच्या वावटळीत तग धरून आहे, याचं श्रेय त्याच्या पालनकर्त्यांना द्यावं लागेल.
‘ललित’चा जन्म झाला, त्या काळात मराठीमध्ये इतरही काही नियतकालिकं वाचकप्रिय होती, पण ग्रंथव्यवहाराला वाहिलेलं हे एकमेव मासिक होतं. अर्थात तेच केवळ त्याचं वैशिष्टय़ नव्हतं, तर त्याचे जनक केशवराव कोठावळे यांचं धोरण आणि कार्यशैलीमुळे मॅजेस्टिक प्रकाशन आणि या मासिकाचीही भरभराट झाली. प्रसन्न, सदा हसतमुख आणि मितभाषी केशवरावांनी मराठी साहित्यिक आणि वाचकांनाही प्रेमाने जपलं, जोपासलं. त्या काळात सोन्याचा वर्ख लावलेल्या निबाचा पेन आपल्या लेखकाला सप्रेम भेट देणारे केशवराव हे प्रकाशन क्षेत्रातलं वेगळंच व्यक्तिमत्त्व होतं. या व्यवसायाला पुढे त्यांनी ‘साहित्यिक गप्पां’ची कल्पक जोड दिली आणि त्याद्वारे मराठी साहित्य व्यवहारात ‘मॅजेस्टिक’च्या हितचिंतकांचं उत्कृष्ट जाळं निर्माण केलं. पुण्यातल्या नारायण पेठेत ‘मॅजेस्टिक’च्या गच्चीवर सलग १५ दिवस रंगणाऱ्या या गप्पा म्हणजे मराठी साहित्य रसिकांसाठी उत्कृष्ट मेजवानी असायची, त्याचबरोबर खालच्या मजल्यावर भरलेल्या ग्रंथप्रदर्शनाद्वारे ग्रंथप्रसाराचंही कार्य मूकपणे साधलं जात असे. मराठी साहित्यातील यच्चयावत साहित्यिक-विचारवंत इथे हजेरी लावत. संध्याकाळच्या जाहीर कार्यक्रमानंतर रात्री पाहुण्यांबरोबर निवडक निमंत्रितांची मैफल जमत असे आणि ती कधी कधी उत्तररात्रीपर्यंत रंगत असे. अशाच एका मैफलीत ‘पोएट’ बोरकरांच्या गप्पा व अर्थातच कविता ऐकण्याची अविस्मरणीय संधी मिळाली. त्या रात्री ‘सरीवर सरी आल्या गं, सचैल गोपी न्हाल्या गं’ यांसारख्या खास बोरकरी रोमँटिक कवितेपासून ‘ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, ग्रंथ झाले रानभरी गोंधळले संत’ यासारख्या भक्तिरसात बुडलेल्या कविता शेजारी पसरलेल्या चोपडय़ांमधून शोधत, बोरकर त्यांच्या खास अनुनासिक स्वरात सादर करत होते आणि दोन बोटांमध्ये धरलेल्या सिगरेटचे झुरके मारत निरूपणही करत होते.
या गच्चीवरील गप्पांची सांगता दरवर्षी मॅजेस्टिक परिवाराला आमरस-पुरीची मेजवानी देऊन होत असे. दुटांगी धोतर आणि झब्बा घातलेले केशवराव सस्मित चेहऱ्याने पंगतीमधून फिरत. तो एक प्रकारचा कौटुंबिक सोहळा असे. पण दुर्दैवी योगायोग असा की, १९८३च्या मेमध्ये साहित्यिक गप्पांचा पंधरवडा चालू असतानाच केशवरावांचं आकस्मिक निधन झालं आणि त्याबरोबरच या गप्पांमधली गंमतही संपली.
योगायोगाचा भाग म्हणजे ‘ललित’ आणि साप्ताहिक ‘माणूस’चा जन्मकाळ १९६१-६२ चा, पण नंतर ही दोन्ही नियतकालिकं वेगवेगळ्या प्रकारे फुलत गेली. संघाच्या मुशीत घडलेल्या, पण ‘मळ्यास माझ्या कुंपण असणे अगदी न मला साहे’ या काव्यपंक्तीनुसार विकसित झालेल्या लोकशाही उदारमतवादी श्रीगमांनी (श्री. ग. माजगावकर यांनी) त्यानंतर सुमारे अडीच दशकं दर्जेदार साहित्यिक लेखनाबरोबरच नवनव्या सामाजिक-राजकीय स्पंदनांसाठी ‘माणूस’चं व्यासपीठ खुलं ठेवलं. दि. बा. मोकाशी, वि. ग. कानिटकर, विजय तेंडुलकर, रवींद्र पिंगे, अनंत भावे अशा बिनीच्या लेखकांची सदरं हे या साप्ताहिकाचं वैशिष्टय़ होतंच, पण त्यापेक्षाही अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर यांसारख्या त्या काळातील तरुण, आश्वासक पत्रकारांव्यतिरिक्त अनेकांना श्रीगमांनी हाताला धरून लिहितं केलं. तरुण वयात सावरकरांचा प्रभाव असूनही सर्वधर्मसमभावाची (सेक्युलर) वृत्ती व्यक्तिगत जीवनात जोपासली आणि त्याचंच प्रतिबिंब ‘माणूस’च्या पानापानांमधून पडत राहिलं. तत्कालीन ज्वलंत राजकीय-सामाजिक विषयांवरील खास पुरवण्या किंवा विशेषांक हेही ‘माणूस’चं वेगळेपण मानावं लागेल.
या साप्ताहिकाची आर्थिक स्थिती कायमच बेताची असताना केवळ जिद्द आणि कल्पकतेच्या बळावर वाचकाला सतत काहीतरी नवं, वेगळं देण्याचा हा छंद तब्बल २५ र्वष पडेल ती किंमत मोजून श्रीगमांनी जपला. पण त्यानंतर तसं काही देण्याची क्षमता मंदावत गेल्याची जाणीव त्यांना होऊ लागली आणि ‘सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे’ या आरती प्रभूंच्या काव्यपंक्तीला साजेशा पद्धतीने १९८६मध्ये या साप्ताहिकाची अखेर झाली.
‘ललित’पूर्वी सुरू झालेलं आणि ‘माणूस’प्रमाणेच आणीबाणीला प्राणपणाने विरोध करणारं साप्ताहिक म्हणून ‘साधना’चा उल्लेख करावा लागेल.  समाजवादी विचाराची बैठक लाभलेल्या या साप्ताहिकाचा जन्म देशाच्या स्वातंत्र्यापाठोपाठ एका वर्षांने, १५ ऑगस्ट १९४८ रोजी झाला आणि आनंदाची बाब म्हणजे, समाजवादी चळवळीला सध्या बरे दिवस नसले तरी त्या विचाराचा पुरस्कर्ता असलेलं हे साप्ताहिक भक्कम आर्थिक पाठिंब्यामुळे दमदार वाटचाल करत आहे. कै. यदुनाथ थत्ते यांनी दीर्घकाळ या साप्ताहिकाची धुरा सांभाळली. त्यानंतर प्रा. ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे, वसंत बापट इत्यादींनी चिकाटीने ‘साधना’ चालू ठेवलं, पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून साप्ताहिकाचं भविष्य सुरक्षित करण्याचं काम १९९८मध्ये संपादकपदाची धुरा हाती घेतलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलं. समाजामध्ये ‘साधना’चं उत्तम गुडविल असूनही त्याचा योग्य उपयोग फारसा झाला नव्हता, हे हेरून दाभोलकरांनी एकीकडे नवनव्या लेखकांचं सहकार्य मिळवतानाच आर्थिक स्थैर्याकडेही लक्ष पुरवलं. डावीकडे झुकणाऱ्या आणि उदारमतवादी धोरणाशी अजिबात फारकत न घेता या साप्ताहिकाला समाजवादी परिवार पत्रिकेच्या स्वरूपातून बाहेर काढणं, हेही दाभोलकरांपुढे मोठं आव्हान होतं. ते त्यांनी यशस्वीपणे पेलल्यामुळे ‘साधना’च्या वाचक वर्गाचं जाळं विस्तारलं आणि त्याचा ‘विवेक’ झाला नाही. त्याचबरोबर भविष्याचा वेध घेऊ शकणाऱ्या तरुण पिढीकडे हे साप्ताहिक सोपवण्याची दूरदृष्टीही डॉ. दाभोलकरांनी दाखवली आहे.
‘माणूस’-‘साधना’बरोबरच त्या काळात ग. वा. बेहरे यांचं ‘सोबत’ हे साप्ताहिकही फॉर्ममध्ये होतं. ‘माणूस’पाठोपाठ १९६७मध्ये सुरू झालेल्या या साप्ताहिकामध्ये त्यांनी गंगाधर गाडगीळ, रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकर, सुभाष भेंडे, रमेश मंत्री इत्यादींची सदरं सुरू करत साप्ताहिकाला दर्जेदार ललित साहित्याचं रूप देण्याचा प्रयत्न केला. त्या काळात ‘सोबत’मध्ये ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांचं नाटय़ समीक्षण अतिशय वाचनीय असे. स्वत: बेहरेही टोपणनावांनी भरपूर लेखन करत. हिंदुत्ववादी विचाराचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या बेहरेंनी त्या विचाराच्या प्रचारासाठीही या साप्ताहिकाचा उपयोग केला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला आक्रमकपणा आणि काहीसा धसमुसळेपणाही त्यात उतरलेला असे. त्यापायी त्यांनी अनेक शत्रू ओढवून घेतले. थेट हल्ल्यांनाही तोंड दिलं. त्यामुळे त्यांच्याबद्दल हिंदुत्ववादी गटामध्ये वेगळं आकर्षण होतं. पण तीच या साप्ताहिकाची मर्यादा ठरली. आणीबाणीमध्ये मात्र ‘सोबत’ने वाचकप्रियतेचा असा उच्चांक गाठला की, काही वेळा आठवडय़ातून दोनदा हा अंक प्रकाशित करावा लागत असे. पण एकखांबी तंबू असलेल्या या साप्ताहिकाचं अवतार कार्य १९९०मध्ये समाप्त झालं.
त्याधीपासून उद्योगसमूहाने मराठी नियतकालिकाच्या क्षेत्रात उतरण्याचा वेगळा प्रयोग ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ आणि ‘मनोहर’च्या रूपाने याच काळात मराठी वाचकांना पाहायला मिळाला. त्यातही ‘मनोहर’ या साप्ताहिकाला संपादक कै. मुकुंदराव किर्लोस्कर यांनी खास कॉर्पोरेट टच दिला. उद्योगसमूहाचं पाठबळ हे त्यामागचं एक कारण असलं तरी गळ्यात कायम कॅमेरा अडकवून सफारी पोशाखात तरुणाच्या उत्साहाने वावरणारे मुकुंदराव हे एक वेगळं व्यक्तिमत्त्व होतं. त्या काळात या नियतकालिकाच्या संपादक विभागाच्या नियोजनविषयक खास बैठका मुकुंदरावांच्या स्टाइलने होत असत. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, अनिल अवचट, अशोक जैन, अनिल थत्ते, मुकुंद टांकसाळे यांसारख्या लेखकांबरोबरच त्या काळात केवळ इंग्लिश फिल्मी नियतकालिकांमध्ये लिहिणाऱ्या देवयानी चौबळचा फिल्मी कॉलम हे या साप्ताहिकाचं वैशिष्टय़ ठरलं. पण व्यवस्थापनाच्या बदललेल्या धोरणामुळे या नियतकालिकांची मालकी बदलत गेली आणि त्यांचा प्रभावही क्षीण होत गेला.
या साप्ताहिकांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकृतीचं ‘सत्यकथा’ हे नियतकालिक म्हणजे १९७०च्या दशकातही मराठी साहित्याचा मानदंड होता. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन या कमालीच्या चिकित्सक पण साहित्याची जबरदस्त जाण असलेल्या संपादकांनी ‘सत्यकथे’द्वारे रूपवाद आणि सौंदर्यवाद जपत अभिजात मराठी वाङ्मयाचे मानदंड निश्चित केले. त्यामुळे त्यांच्याकडे नव्या पिढीचे लेखक काहीशा धास्तावलेल्या मनानेच साहित्य पाठवत आणि धडधडत्या हृदयाने त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असत.  पण काळाच्या ओघात नवे साहित्य प्रवाह आले. बंडखोर, प्रस्थापितविरोधी लेखकांचा उदय झाला आणि ‘सत्यकथे’ला ओहोटी लागली. १९८२ मध्ये आर्थिक चणचणींमुळे अखेर हे एक वेगळ्या धाटणीचं, दर्जाचं नियतकालिक बंद करावं लागलं.
स्वातंत्र्यानंतर गेल्या ५०-६० वर्षांत इतरही अनेक नियतकालिकं प्रकाशित होत आली आहेत. त्यापैकी काही काळाच्या ओघात अस्तंगत झाली, तर अन्य काही नेटाने प्रसिद्ध होत आहेत. पण ‘ललित’च्या मागे-पुढे जन्माला आलेल्या या साप्ताहिक-मासिकांचं मराठी वाचकाच्या मनात वेगळं स्थान आहे. त्या अर्थाने ही सारी जणू ‘ललित’ची भावंडं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा